डॉ. तनपुरे कारखान्यात कामगार झाले हजर!

0
राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – गेली साडेतीन वर्ष कारखान्याच्या गेट व धुराड्याकडे आशाळनभूत नजर असलेल्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या सुमारे 300 कायम कामगारांनी कार्यस्थळावरील श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा केली. कारखान्याच्या प्रवेशद्वाराला श्रीफळ वाहून नव्या उमेदीने कारखान्यात प्रवेश केला.
जिल्हा बँकेने कर्जाचे पुनर्गठण करून कारखाना संचालक मंडळाकडे सुपूर्त केल्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कायम कामगारांना काल दि.1 ऑगस्टपासून कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार काल मंगळवारी सकाळी लक्ष्मीनारायणाच्या पूजेनंतर ‘पुंडलिका वरदे, हरीविठ्ठल’च्या जयघोषात कारखान्यात प्रवेश केला. एकेकाळी सुबत्ता असणार्‍या डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांचा भलताच रूबाब होता. मात्र, जसजशी कारखान्याची परिस्थिती ढासळत गेली, तसतशी कामगारांचीही अवस्था बिकट झाली.
तब्बल 36 महिन्यांचे पगार थकल्यानंतर सन 2013-14 चा गळीत हंगाम कसाबसा पार पडल्यावर कारखान्याचे चाक पूर्णपणे थांबले. त्यानंतर 54 महिन्यांचे पगार थकल्यानंतर कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. पगार तर नाहीच, विमा, भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे कामगारांचे भविष्य अंधकारमय होऊन बसले.
त्या-त्या काळात सत्ताधारी राहिलेल्या पुढार्‍यांच्या काही बगलबच्च्या कामगारांनी मात्र, आपले उखळ पांढरे करून घेतले. काही बगलबच्चे तर संचालकांपेक्षाही ढवळे खादीचे कपडे घालून दिवसभर कारखान्याच्या कार्यालयात खुर्चीवर बसून दिवसभर झोपा काढताना सभासदांच्या निदर्शनास आले आहेत. मात्र, प्रामाणिकपणे काम करणार्‍या कामगारांची वाट लागली आहे.
आज तब्बल साडेतीन वर्षानंतर कारखान्याचे चाक फिरणार असल्याची आशा निर्माण झाल्याने कारखान्याच्या आवारात पाऊल ठेवताना कामगारांना आनंद झाला आहे. डॉ. सुजय विखे यांच्या रूपाने कामगारांना ‘पांडुरंग’ भेटल्याची प्रतिक्रिया एका कामगाराने दिली. दरम्यान, कारखाना प्रशासनाने कार्यकारी संचालकांच्या सहीने प्रवेशद्वारावर लावलेल्या ‘नोटीस’बाबत काही कामगारांमध्ये कुजबूज सुरू होती.

LEAVE A REPLY

*