Wednesday, May 8, 2024
Homeनगर‘डॉ.तनपुरे’च्या कामगारांचे थकीत पगारासाठी 17 पासून उपोषण

‘डॉ.तनपुरे’च्या कामगारांचे थकीत पगारासाठी 17 पासून उपोषण

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- एकेकाळी राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून लौकिक असणार्‍या डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना कर्मचार्‍यांचे मागील संचालक मंडळाच्या काळात 90 कोटी व नवीन संचालक मंडळाच्या काळातील 17.50 कोटी रुपये थकले असूनही थकीत रक्कम मिळावी, म्हणून येत्या 17 तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

याबाबत सुमारे 248 कामगारांच्या सह्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले, डॉ. तनपुरे कारखाना सुरू झाल्यानंतर परिवर्तन मंडळाने कामगारांना केवळ अत्यल्प अग्रिम देऊन काम करून घेतले. कारखाना सुरू असताना पद्मश्री विखे कारखाना व गणेश कारखान्याचे कामगार आणून त्यांना पूर्ण पगार व ग्रॅच्युईटी फंड देण्यात आले. सत्ताधारी संचालक मंडळाने सत्ता घेतल्यापासून कामगारांचे 17.50 कोटी रुपये थकविले असून त्यासाठी सर्व कामगार तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर 17 डिसेंबर रोजी उपोषण करणार आहेत.

- Advertisement -

डॉ. तनपुरे कारखान्याची सत्ता मिळण्यापूर्वी खा. डॉ. सुजय विखे यांनी कामगार व सभासदांना 100 कोटी रुपये उपलब्ध करीत कारखान्याचे सभासद व कामगारांची देणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवत परिवर्तन मंडळाला कारखान्यामध्ये एकहाती सत्ता दिली. सत्ताधारी परिवर्तन मंडळाने सन 2017-18 व सन 2018-19 साली कारखान्याचा गाळप हंगाम सुरू केला. त्यासाठी कामगारांनी मोलाची साथ दिली. कामगारांना सत्ताधारी परिवर्तन मंडळाने अत्यल्प अग्रिम देऊन काम करून घेतले. कामगारांनी 1 ऑगस्ट 2017 पासून ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले.

कामगारांना या काळात अत्यल्प अग्रिम देण्यात आले. त्याउलट या काळात गणेश कारखाना व पद्मश्री विखे कारखान्याच्या कामगारांनी तनपुरे कारखान्यामध्ये काम केले. त्या कामगारांचे वेतन प्रॉव्हिडंट फंडासह अदा करण्यात आले. परंतु तनपुरे कारखान्याच्या कामगारांचे वेतन व प्रॉव्हिडंट फंड देण्यात आले नाही. तसेच सेवानिवृत्त कामगारांचेही प्रॉव्हिडंट फंड जमा करण्यात आले नाही. व त्या संचालक मंडळाच्या काळातील कामगारांचे वेतन 9 कोटी रुपये, त्यावरील प्रॉव्हिडंट फंड 2.5 कोटी व सेवानिवृत्त कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड रक्कम 6 कोटी असे एकूण 17.50 कोटी रुपये थकीत झाले असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.

यासाठी खा. डॉ. सुजय विखे व संचालक मंडळाची कामगारांनी वेळोवेळी भेट घेतली. परंतु सत्ताधारी संचालक मंडळाने कामगारांकडे दुर्लक्ष केले. असा आरोप कामगारांनी केला आहे. संचालक मंडळाने सन 2019-20 चा गळीत हंगाम बंद ठेवत कामगारांना ले ऑफ देण्याचा निर्णय घेतला. कार्यकारी संचालक यांच्या तोंडी आदेशाने फलकावर ले-ऑफची माहिती ऐन दिवाळी सणापूर्वी देण्यात आली. यामुळे कामगारांची काळी दिवाळी साजरी झाली. यामुळे जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या मागणीची दखल घ्यावी, कामगारांचे थकीत वेतन व प्रॉव्हिडंट फंड अदा करण्यात यावे या मागणीसाठी समस्त कामगार तनपुरे कारखाना कार्यस्थळावर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे कामगारांनी जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे.

समस्त कामगार वयोवृध्द असून उपोषण काळात कामगारांच्या प्रकृतीचे बरे वाईट झाल्यास सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असाही इशारा देण्यात आलेला आहे. याबाबाबत सत्ताधारी संचालक मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या