Thursday, May 2, 2024
Homeनगर‘डॉ. तनपुरे’च्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर

‘डॉ. तनपुरे’च्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे मंजूर

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. बा.बा. तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील तसेच व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. काल सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दोन्ही पदाधिकार्‍यांचे राजीनामे एकमताने मंजूर करण्यात आले.

- Advertisement -

डॉ.तनपुरे कारखान्याची निवडणूक होऊन जवळपास चार वर्षे पूर्ण झाली आहेत. खा. डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाला सभासदांनी मोठ्या बहुमताने कौल देऊन सत्ता खासदार विखे यांच्या ताब्यात दिली. निवडणुकीनंतर विखे घराण्याचे विश्वासू सहकारी ज्येष्ठनेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांच्या गळ्यात चेअरमनपदाची तर मियासाहेब पतसंस्थेचे संस्थापक शामराव निमसे यांच्या गळ्यात व्हाईस चेअरमन पदाची धुरा टाकण्यात आली.

बंद पडलेला डॉ.तनपुरे कारखाना सुरू करण्याचे मोठे आव्हान संचालक मंडळापुढे होते. जिल्हा बँकेच्या सहकार्याने कर्जाचे पुनर्गठन करून तनपुरे कारखाना सुरू करण्यात डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला यश आले. मागीलवर्षी उसाच्या कमतरतेच्या कारणाने कारखाना बंद ठेवण्यात आला.

यावर्षी आता पुन्हा कारखान्याचे धुराडे पेटणार असल्याने कारखाना पदाधिकार्‍यांच्या निवडीकडे सभासदांसह तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

उंबरे गटातील ज्येष्ठ संचालक नामदेवराव ढोकणे यांच्या नावाची चेअरमन पदासाठी चर्चा असून तर व्हाईस चेअरमनपदी मात्र, नेमकी कोणाची वर्णी लागते? याबाबत उत्सुकता आहे. उपाध्यक्षपदासाठी नंदकुमार डोळस, विजय डौले, दत्तात्रय ढूस, रवींद्र म्हसे यांच्या नावाची चर्चा आहे.

डॉ. तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपदाची जबाबदारी सभासद, संचालक, कामगार यांच्यासह सर्वांच्या आशिर्वादाने यशस्वीरित्या पार पाडली. चार वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे श्रेष्ठींच्या आदेशानुसार दि.28 जुलैला मी व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी राजीनामा दिला. काल सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामे मंजूर झाले आहेत.

– उदयसिंह पाटील, अध्यक्ष डॉ. तनपुरे साखर कारखाना.

- Advertisment -

ताज्या बातम्या