राहुरीच्या कार्यक्षेत्रातून उसाचे टिपरूही बाहेर जाऊ देऊ नका- डॉ. सुजय विखे

0

 बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा 25 तारखेला ‘डॉ. तनपुरे’चा गाळप हंगाम सुरू होणार

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांनी त्यांची व परिवर्तन मंडळाने प्रयत्नांची पराकाष्टा करत आपली जबाबादारी पार पाडत कारखान्याचा बॉयलर पेटविला आहे. 25 तारखेच्या दरम्यान गळीत हंगाम सुरू होईल, आता सभासदांनी राहुरीला ऊस देण्याची मुख्य व महत्त्वाची जबाबादारी पार पाडावी, असे आवाहन करतानाच वेळप्रसंगी गळीत हंगामाची मोळी पडल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातून दुसर्‍या कारखान्यांना उसाचे टिपरू बाहेर जाऊ न देण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी कामगारांनी सज्ज राहण्याचे आवाहन डॉ.सुजय विखे यांनी केले आहे.
डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अ‍ॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
प्रारंभी उपाध्यक्ष शामराव निमसे व त्यांच्या पत्नी अनिताताई, संचालक महेश पाटील व माधुरीताई, संचालक भारत तारडे व वैशालीताई, संचालक दत्तात्रय ढूस व ज्योतीताई यांच्या हस्ते बॉयलरचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आ. कर्डिले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले.
डॉ.सुजय विखेंनी सांगीतले, आ. कर्डिले यांच्या साथीमुळे आपणास हा दिवस पहावयास मिळाला आहे. धोरणात्मक निर्णय घेत असताना पैशाचा विचार करावा लागतो. मात्र, त्यासाठी कर्डिले यांनी मोठी साथ दिली आहे. कारखाना सुरू होत असल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आत्तापर्यंत सर्वांची चांगली साथ मिळालेली आहे.
मागच्या एफ.आर.पी.चे पेमेंट थकीत असल्याने सरकारने कारखाना आपल्या नावावर करून घेण्यासाठीची कार्यवाही सुरू केली होती. त्यामुळे गाळप परवाना मिळणे अवघड झाले होते. मात्र, सहकार मंत्र्यांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आ. कर्डिलेंबरोबर भेटून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कामी ज्यांची एफ.आर.पी. थकली, अशा सुमारे 2200 शेतकर्‍यांनी नंतर पेमेंट घेण्याचा कबुलनामा दिल्याने मोठे सहकार्य लाभले आहे.
त्यामुळे गाळप परवाना नक्की मिळणार आहे. कारखान्याचे कामगार प्रामाणिकपणे काम करीत आहेत. प्रवरा व गणेशच्या कामगारांच्या सहकार्याने 20 ते 25 नोव्हेंबरपर्यंत गाळप सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. आम्ही आमची आजपर्यंतची जबाबदारी चोख बजाविलेली आहे. कामगारांना, सभासदांना दिलेला शब्द पाळत कारखाना सुरू केला आहे.
मात्र, आता ऊस उत्पादक सभासदांनी ही कामधेनू कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल तर आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मानसिकता बदलली नाही तर भविष्य अवघड आहे. हा कारखाना चालू व्हावा, ही खासदारांची इच्छा होती. त्यामुळे कारखाना चालू करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावले. सहकार टिकवायचा असेल तर धैर्य व विश्‍वास लागतो.
सभासदांनी यापुढेही विश्‍वास ठेवावा. जिल्ह्यातील इतर कारखान्यांप्रमाणे भाव नक्कीच दिला जाईल. ऊस गाळप सुरू झाल्यानंतर राहुरीच्या सभासदांनी राहुरी कारखान्यासच ऊस देण्याची मानसिकता ठेवावी. कामगारांनी संघर्ष करण्याची वेळ आली तरी, उसाचे टिपरूही दुसर्‍या कारखान्यास जाऊ देऊ नये. असे आवाहन त्यांनी केले.
आ. कर्डिले म्हणाले, राहुरी तालुक्याच्या दृष्टीकोनातून हा ऐतिहासिक व सुवर्णदिन आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळावा, यासाठी डॉ.सुजय विखेंनी निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घेतला. मात्र, त्यानंतर 300 कोटीचे कर्ज असल्याचे समोर आल्याने त्यांचीही संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व मी बैठक घेऊन राजकारण बाजूला ठेऊन सभासद शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी प्रयत्न केले. जिल्हा बँकेचे कर्जाचे पुनर्गठण होणे अवघड होते.
त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून पुनर्गठण करून घेतले. कारखाना सुरू होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील काही लोक देव पाण्यात बुडवून बसले होते. त्यामागे राहुरीचा ऊस कमी भावात लुटण्याचे षडयंत्र होते. बॉयलर पेटतो की नाही? याबाबतही अनेकांना शंका होती. मात्र, कारखाना सुरू व्हावा, ही आमची सुरूवातीपासूनची भूमिका होती. तनपुरेंनी माझ्यावर कमी शिकला असल्याची टीका केली. ते इंग्रजी शिकले असल्यानेच राहुरी कारखाना 300 कोटीच्या खाईत नेऊन त्यांनी ठेवला. तनपुरेंनीच खर्‍या अर्थी राहुरी कारखाना अडचणीत आणला, अशी टीका त्यांनी केली.
कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी स्वागत करत प्रास्तविकात कारखान्याने येत्या गाळप वर्षासाठी केलेल्या पूर्वतयारीची माहिती मांडली. राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी कामगार या गाळपासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमास उत्तमराव म्हसे, सोपानराव म्हसे, पंढरीनाथ पवार, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, तान्हाजी धसाळ, सत्यवान पवार, सुरसिंगराव पवार, शिवाजीराजे गाडे, केशवराव कोळसे, उत्तमराव आढाव, मधुकर पवार, विजय डौले, मच्छिंद्र तांबे, अशोक खुरूद, रवींद्र म्हसे, बाळकृष्ण कोळसे, शिवाजी सयाजी गाडे, नंदकुमार डोळस, अर्जुनराव बाचकर, संचालिका हिराबाई चौधरी,
पार्वतीबाई तारडे, कार्यकारी संचालक बी.एन.सरोदे, प्रा.सतीश राऊत, डॉ.धनंजय मेहेत्रे, राजेंद्र उंडे, सुभाष वराळे, मच्छिंद्र शिंदे, संदीप गिते, ज्ञानदेव निमसे, संजय म्हसे, ज्ञानेश्‍वर पोपळघट, अण्णा शेटे, चैतन्य उद्योग सुमहाचे अध्यक्ष गणेश भांड, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, बाजार समितीचे संचालक सुरेश बानकर, शामराव पटारे, गोपाळा कडू, उत्तम ढोकणे, योगेश देशमुख, सुखदेव कुसमुडे, सोन्याबापू जगधने, उत्तमराव कडू, रमेश निमसे, आदींसह सभासद शेतकरी, कामगार उपस्थित होते. आभार संचालक विजय डौले यांनी मानले.

आ. कर्डिले व डॉ. विखे यांनी याप्रसंगी एकमेकांना गुगली टाकत विकेट घेण्याचा प्रयत्न केला. विखे यांच्याकडे मला इंग्रजी शिकण्यासाठी क्लास लावावे लागतील, असे कर्डिले म्हणाले. तर कर्डिले यांनी सभासदांच्या पेमेंटची जबाबादारी घेतल्याने माझे ओझे हलके झाल्याचे सुजय विखे म्हणाले.

आम्ही अत्यंत पराकाष्टा करून कारखान्याच्या चिमणीतून धूर काढण्याची जबाबादारी पूर्ण केली आहे.हा कारखाना कायम सुरू राहून गतवैभव मिळविण्यासाठी सभासदांना मानसिकता बदलावी लागेल. आमिषाला बळी पडून बाहेरच्या कारखान्यांना ऊस देऊ नका. बारागांव नांदुरच्या एका शेतकर्‍याने 5 रुपये जास्त भाव मिळाला म्हणून बाहेरच्या कारखान्याला ऊस देण्याचा प्रकार घडल्याचे सांगत अशी मानसिकता राहिली तर राहुरीच्या सभासदांना भविष्यात अत्यंत वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागेल. तुम्ही मला साथ दिली नाही तर मलाही नाईलाजाने तुम्हाला तुमच्या हालावर सोडून जावे लागेल. कारखाना चालविणे ही सामुहीक जबाबादारी आहे. साखर धंद्याला दूध धंदा समजू नका. गाळप परवाना मिळताच गटवार बैठका घेऊन सभासदांशी चर्चा करणार असल्याचे डॉ.विखे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*