व्यासपीठावरच भरविला डॉ. विखेंनी जनता दरबार

0
कोल्हार (वार्ताहर) – पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पा. असो अथवा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची जनता दरबाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांचे निराकारण करण्याची जुनी पध्दत आहे. त्यापाठोपाठ युवानेते डॉ.सुजय विखे यांनीही तीच पध्दत अंगिकारली.
कोल्हार भगवतीपूर येथे डॉ.सुजय विखे यांनी कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर लागोलाग व्यासपीठावरच खाली अंथरलेल्या मॅटवर ठाण मांडून बसले आणि जमलेल्या शेकडो जनसमुदायाचे प्रश्‍न समजावून घेत त्यांना आश्‍वासीत केले. ना खूर्ची, ना  टेबल. केवळ हातात माईक पकडून त्यांनी आलेल्या माता भगिनींचे विविध प्रश्‍न ऐकले आणि मार्गदर्शन केले.
त्यांचा हा भरलेला आगळावेगळा जनता दरबार सर्वांच्याचदृष्टीने लक्षवेधी ठरला. सोमवारी कोल्हार भगवतीपूर येथे लाभार्थ्यांना मोफत उज्वला गॅस कनेक्शनचा वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला. सदर कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ डॉ.सुजय विखेंनी घेतलेला हा पवित्रा सर्वांनाच अवाक करणारा ठरला. डॉ. विखे आपल्या समस्या ऐकण्यासाठी स्टेजवर खाली बसलेले पाहून असंख्य महिला पुरुष मंडळींनी त्यांना गराडा घातला.
आपले विविध प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडले. त्यात बहुतांशी प्रश्‍न रेशन कार्ड, स्वस्त धान्य दुकान, गॅस कनेक्शन संबंधी होते. सर्व प्रश्‍न ऐकून, समजावून घेताना त्यांनी कार्यक्रमप्रसंगी भाषणात केलेल्या घोषणांचा संदर्भ पुन्हा पुन्हा देऊन 1 जानेवारीपासून या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्याकरिता आपण समक्ष जातीने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
जनसामान्यांना येणार्‍या अडचणी सोडविण्याकरिता गावोगावी कॅम्प भरवून तेथे तुमच्या गावाला येणार असल्याचा भरवसा त्यांनी लोकांना दिला. काहींना आक्का मावशी ताई तर काहींना काका असे आपुलकीने संबोधीत, मी तुमचे सर्व प्रश्‍न सोडविणार असल्याचा निर्वाळा त्यांनी उपस्थितांना दिला. सर्वांनी प्रवरा यंत्रणेतील संबंधित व्यक्तींशी संपर्क करून आपापले प्रश्‍न अर्जाव्दारे लेखी मांडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
डॉ.सुजय विखेंनी लगेचच घेतलेल्या या अनोख्या जनता दरबारामुळे व्यासपीठावर जमलेल्या असंख्य मान्यवरांना तसेच थांबून राहावे लागले. काहींची पंचाईत झाली. प्रारंभी काहींना तर काय करावे ते समजेनाच. बरं एवढ्या गर्दीत डॉ.सुजय विखेंना नमस्कार घालून निघणेही अनेकांना कठीण बनले.
व्यासपीठावर महसूल विभागाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पुढारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एरवी कार्यक्रम संपल्यानंतर ताबडतोब रिकामे होणारे व्यासपीठ या जनता दरबारामुळे बराच काळ भरून राहिले होते. एक मात्र नक्की, कामाच्या एवढ्या प्रचंड व्यापात डॉ.विखेंनी घेतलेला हा जनता दरबार सर्वसामान्यांना मात्र सुखावून गेला.

LEAVE A REPLY

*