प्रश्‍न सुटणार असतील तर जरूर जिल्हा विभाजन करा

0
डॉ. सुजय विखे यांचे पालकमंत्र्याना आव्हान

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांना दिलेली कर्जमाफी अर्धवट आहे. ज्या शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली त्यांचे 300 कोटी रुपये जिल्हा बँकेत अद्याप वर्ग झालेले नाहीत. तलाठ्यापासून उपजिल्हाधिकार्‍यापर्यंतची पदे सरकार पैशामुळे भरू शकलेले नाही. जिल्हा विभाजनाने हे प्रश्न सुटणार तर जरूर विभाजन करावे. मात्र, त्यापूर्वी लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करावी, असे आवाहन काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी केले.

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने दि. 6 मे रोजी वाडिया पार्क क्रीडा संकुलात नगर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी डॉ. विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. विखे म्हणाले की, जिल्हा विभाजनाचा प्रश्न काही आताच उपस्थित झाला असे नाही. तो माझ्या जन्माच्या पूर्वीपासून घोंगावत आहे. या प्रश्नावर बरेच राजकारण झालेले आहे. मी विभाजनाबाबत काही बोललो तर पालकमंत्री म्हणतील टीआरपीसाठी बोलतो. मी म्हणतो जिल्हा विभाजन करा, अथवा करू नका, माझे काही म्हणणे नाही. परंतु हे विभाजन केल्याने प्रश्न सुटणार असतील तर ते जरूर करावे, असे म्हणत पालकमंत्र्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

जिल्ह्यात कोणत्या भागावर निधी वाटपात अन्याय केला जातो. हे पुराव्यानिशी दाखवून देऊ. जिल्हा नियोजन समितीमधून कसा निधी पळविला जातो आहे, याचेही पुरावे लवकरच आकडेवारीनिशी देणार आहे. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक प्रश्न आहेत. परंतु विरोधक म्हणतात, असे काही प्रश्नच शिल्लक नाहीत. मग लोक माझ्याकडे कसे येतात, असा सवालही त्यांनी विचारला.

विभाजन झाले तरी सत्ता आणून दाखवतो
जिल्ह्यात आमच्या प्रत्येक तालुक्यात संस्था आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजन झाले तरी आम्हाला सामाजिक काम करण्यास काही अडचण येणार नाही. विभाजन ही काही भारत-पाकिस्तानमधील बॉर्डर असणार नाही. मी तिकडेही राहू शकतो आणि इकडेही येऊ शकतो. राजकारणाचे म्हणाल तर विभाजनामुळे जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद विसर्जित होईल. काहीही झाले तरी दोन्ही ठिकाणी मी सत्ता आणून दाखवतो. या विभाजनाचा माझ्या भविष्यातील राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही, असे सांगत डॉ. सुजय विखे यांनी एक प्रकारे आव्हानच दिले.

LEAVE A REPLY

*