शहरातील राजकारण बदलाची वेळ

0

डॉ. सुजय विखे : शहरवासीयांनी साथ दिल्यास विकास घडवून दाखवितो

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहराचा विकास अनेक वर्षांपासून खोळंबला आहे. राजकीय इच्छा शक्तीच्या अभावमुळे हे घडत आहे. शहराच्या राजकारणात माझ्यासारखी सुशिक्षित मंडळी आली असून नगर शहरवासीयांनी साथ दिल्यास शहराचा विकास करू दाखवू असा विश्‍वास काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी नगरमध्ये व्यक्त केला.

माजी नगराध्यक्ष (स्व) कृष्णाभाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 13) साई द्वारका सेवा ट्रस्ट, आठरे पाटील हॉस्पिटल, गोरे डेंटल क्लिनिक व अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर, दंतरोग तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरांचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते विजय पाटकर यांचा हस्ते झाले. यावेळी डॉ. विखे बोलत होते. महापालिका सभापती सुवर्णा जाधव, माजी नगरसेवक निखिल वारे, उबेद शेख, राजू जाधव, माजी नगरसेवक धनंजय जाधव, स्वप्नील दगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, 15 वर्षापासून शहरातील उड्डाणपुलाचा विषय आहे तसाच आहे. माझ्या लहानपणापासून नगर शहरात उड्डाणपूल होणार असे मी ऐकत आलो आहे. नगर शहराला बाह्यवळण रस्ता आहे. मात्र, त्यांची अवस्था वाईट झाली आहे. नगरहून जेवढा वेळ पुण्याला जाण्यासाठी लागतो, तेवढाच वेळ नगरचा बाह्यवळण रस्ता कापण्यासाठी लागतो. वर्षानुवर्षे शहराचा विकास खुंटला असून माझ्यासारखी मंडळी शहराच्या राजकारणात आलेली आहेत.

शहरवासीयांनी साथ दिल्यास आपण शहराचा विकास करून दाखवू असा विश्‍वास डॉ. विखे यांनी यावेळी व्यक्त केला.
शहरातील जयंती, उत्सवावर बोलताना डॉ. विखे म्हणाले की, जयंती-उत्सवासाठी कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी येतात. जमा होणार्‍या वर्गणीतून डिजे लावण्यात येतात, मिरवणुक काढल्या जातात. मात्र, हे चित्र आता बदलण्याची गरज आहे.

उत्सवाच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांसारखे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात यावेत. शहरात दिवाळीच्या काळात निवडणुका आल्या की जनतेला घरपोच फराळ मिळते. तीच अवस्था गणेशोत्सव आणि दहीहंडीची झाली आहे. यासाठी आता जनतेनच बदलण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुने विचार काळाच्या पडद्या आड जात असताना नवीन विचारांचे लोक राजकारणात आले तर विकास शक्य असल्याचे ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*