‘एसएमबीटी’ आरोग्यसेवेतील सेवाव्रती – डॉ. प्रकाश आमटे

0

नाशिक | ‘आरोग्यसेवेत रचनात्मक कामांची आवश्यकता आहे, हेतू शुद्ध ठेऊन केलेले काम कायम श्रेष्ठच असते. एसएमबीटी आरोग्यसेवेत सेवाव्रती भूमिकेतून करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले. ‘तसेच उत्तम व्यवस्थापनामुळे भविष्यात वैश्विक स्तरावर या संस्थेचा लौकिक वाढेल’ असेही याप्रसंगी आमटे म्हणाले.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाताई व डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबतचा ह्रदयस्पर्शी संवाद एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या नंदिहील्स येथील शैक्षणिक संकुलात पार पडला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आ. डॉ. सुधीर तांबे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे रजिस्ट्रार कालिदास चव्हाण, माणिकराव कोकाटे, दुर्गा तांबे, शरयू देशमुख, डॉ. हर्षल तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मुलाखतकार शुभम हिरेमठ यांनी आमटे दाम्पत्याला बोलते केले.

‘समाजापासून अलिप्त राहत वंचित समाजासाठी कार्य करण्याचा निर्णय हा मोठे मानसिक समाधान देतो. संघर्ष किंवा अडचणी असतात, मात्र त्यातून मार्ग काढतच पुढे जायला हवे, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांची त्या अर्थाने मोठी जबाबदारी वाढलेली आहे, असा संदेश देतांनाच डॉ. आमटे यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला.

ते म्हणाले, ‘हेमलकसाच्या जंगलात काम करण्याचा निर्णय सर्वथा माझा होता, बाबा आमटे आणि डॉ. विकास यांचे त्याला पाठबळ होते, मात्र या जंगलानेच मला घडविले, मी कधीही माझे काम पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही, शांतपणे कार्य करत राहिलो, पुढे ते लोकांपर्यंत पोहोचले. आज ऐकणारे, प्रेम करणारे लोक भेटतात तेव्हा त्या संघर्षाची सार्थकता अनुभवायला मिळते.’

डॉ. आमटे पुढे म्हणाले, ‘कामाला सुरुवात केली त्यावेळी आदिवासी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा यांसोबत आम्हाला पहिला संघर्ष करावा लागला, डॉक्टरपेक्षाही मांत्रिकाला त्या समाजात महत्व होते, मात्र अत्यंत शांतपणे आम्ही कार्य करत राहिलो. या कामात बाबा आमटे यांची शिस्त आणि डॉ. मंदाकिनी यांचे समर्पण अत्यंत मोलाचे होते.’

‘एसएमबीटी हॉस्पिटल अत्यंत चांगला हेतू घेऊन कार्यरत आहे, येथील व्यवस्थापन रचनात्मक कार्य करू इच्छित आहे, मला खात्री आहे, भविष्यात ही संस्था वैश्विक स्तरावर आपला लौकिक वाढवेल.’ असेही आमटे म्हणाले.

डॉ. मंदाताई यांनी हेमलकसा येथील कार्याच्या अनेक आठवणी सांगितल्या, कौटुंबिक भावजीवना बद्दलही त्या भरभरून बोलल्या, ‘साधनाताई आमटे यांनी मला कायम आईची माया दिली, मी जेव्हा डॉ. प्रकाश यांना भेटले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या जीवनाची सर्वात मोठी प्रेरणा तेच आहेत.

आदिवासी व्यक्ती हा प्रचंड सहनशील असतो, त्यांची वेदना ते व्यक्तही करू शकत नाही, आशा परिस्थितीत त्यांच्यासोबत काम करणे हे आव्हानात्मक होते. त्यांच्याप्रतीची माणूस म्हणून संवेदना समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. तुम्हीही आपापल्या जागी जबाबदारी पार पाडू शकता फक्त त्यासाठी संयम आणि निर्धार आवश्यक आहे.’

यावेळी डॉ. हर्षल तांबे यांनी, ‘वंचित समाजासाठी विनम्रपणे कार्य करण्याची एसएमबीटी परिवाराची भूमिका आहे, आम्ही खरी गरज असलेल्या भागात माफक आरोग्यसेवा देण्याचे कार्य निभावतो आहे, आमच्या भूमिकांना बळ मिळावे व ज्यांनी खूप पूर्वी आणि अधिक खडतर परिस्थितीत आरोग्यसेवा आणि जागृती उभी केली त्या आदर्षांसोबत जोडले जाण्यासाठी आम्ही या कर्मयोगी आमट्या दाम्पात्यासोबत संवाद केला आहे. एसएमबीटी एका आरोग्य मंदिराचे स्वप्न बघते आहे, जेथे कोणताही रुग्ण आनंदाने उपचार घेऊ शकेल.’

आमटे दाम्पत्याने यावेळी एसएमबीटी हॉस्पिटललाही भेट देऊन आरोग्यसुविधांची माहिती घेतली आणि मार्गदर्शनही केले. याप्रसंगी डॉक्टर व विद्यार्थ्यांसोबत संवादही आयोजीत केला होता.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी-कर्मचारी, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. श्रीराम कुऱ्हे यांनी यावेळी आभार व्यक्त केले.

नाशिकच्या आठवणींना उजाळा : नाशिक येथील आठवणींनाही आमटे दाम्पत्याने उजाळा दिला, ‘वयाच्या चाळीसाव्या वर्षी कुसुमाग्रज यांनी गोदावरी गौरव पुरस्कार देऊन लोकबिरादरी प्रकल्पाचा सन्मान केला. इतक्या मोठ्या स्तरावरील तो आमचा पहिलाच सन्मान होता. कुसुमाग्रज यांची ती भेट आजही मला जशीच्या तशी आठवते.’

विद्यार्थ्यांसोबत मुक्तसंवाद : आमटे दाम्पत्याने मुलाखती नंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला, यावेळी आमटे यांच्या लग्नाचा प्रसंग किंवा मंदाकिनीताई यांच्यासारखी समजदार सहचारिणी कशी भेटणार? अशा खुमासदार प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली.

LEAVE A REPLY

*