Thursday, April 25, 2024
Homeनाशिक‘बार्टी’कडून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

‘बार्टी’कडून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

नाशिक । प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास संस्थेने (बार्टी) राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठीची शिष्यवृत्ती योजना बंद केली आहे. सन 2017 नंतर अनेक शिष्यवृत्तींची जाहिरात काढल्यानंतरही विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. तसेच एम.फील., पीएच.डी करण्यासाठीही शिष्यवृत्ती देण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

या प्रश्नी महाराष्ट्र स्टुडंटस् युनियन या संघटनेमार्फत लवकरच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेण्यात येणार आहे. बार्टी संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती, जोतिराव फुले राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येतात.

परंतु संस्थेने सन 2017 नंतर अनेक शिष्यवृत्तींची जाहिरात काढली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ज्या जाहिरातींनुसार परीक्षा घेण्यात आल्या त्यांच्या मुलाखतीही अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. दरवर्षी किमान 100 विद्यार्थ्यांना एम.फील., पीएच.डीसाठी शिष्यवृत्ती देणे अपेक्षित आहे. मात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने आर्थिक संकटात असलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेण्यात येत नसल्याने अखेर सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात येईल, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या