अहमदनगर(कर्मयोगिनी) | डॉ.अर्चना आशुतोष माळी : आरोग्य प्रबोधनाचा जागर!

0

संगमनेर, जि. अहमदनगर
कार्य – 33 वर्षे संगमनेर येथे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत, शालेय मुलींसाठी आणि महाविद्यालयीन तरुणींसाठी प्रकल्प संगमनेर स्त्री संघटनेच्या माध्यमातून राबविला. आदिवासी महिलांच्या आरोग्याविषयक जनजागृती, गट : वैद्यकीय

स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून गेली 33 वर्षे वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉ. अर्चनाताई यांनी आदिवासी माहिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. नक्षलवादी भागातही त्यांनी आरोग्य शिबिरांमध्ये सहभाग घेत आरोग्याचे धडे दिले. शालेय मुलींसाठी आणि महाविद्यालयीन तरुणींसाठी ‘वयात येताना’ आणि ‘कॅच देम यंग’ हा संगमनेर स्त्री संघटनेच्या माध्यमातून राबविलेल्या प्रकल्पास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अहमदनगर येथे जन्म झालेल्या डॉ. अर्चनाताई यांचे शालेय शिक्षण कर्जत येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर कॉलेजमध्ये तर वैद्यकीय शिक्षण बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल येथे झाले. 1982 मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. अर्चनाताई यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी येथे वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर 1985 मध्ये त्यांनी संगमनेर येथे स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून सेवा सुरू केली. हजारो शस्त्रक्रिया आणि बाळंतपणं केली. ब्लड बँक आणि इतर सुविधा नसताना अनेक रुग्णांवर उपचार केले.

अनेक संस्थांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील ठिकठिकाणी फ्री मेडिकल कॅम्प घेतले. शालेय मुलींसाठी आणि महाविद्यालयीन तरुणींसाठी ‘वयात येताना’ आणि ‘कॅच देम यंग’ हा संगमनेर स्त्री संघटनेचा प्रकल्प उत्स्फूर्तपणे त्यांनी राबविला. या प्रकल्पाच्या माध्यमातून मुलींना वयात येताना होणारे शारीरिक बदलः घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र स्त्री संघटनेच्यावतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
घेतलेल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी झाला पाहिजे, या हेतूने त्यांनी तळागळातील महिलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आरोग्यविषयक प्रबोधन केले. विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या. महिला, मुली, तरुणी यांच्या शंकेचे निरसन त्यांनी केले. त्यातून या महिलांची आरोग्यविषयक जागृती झाली.

मालपाणी उद्योग समूह आणि सारडा उद्योग समूह या समूहातील असंख्य कामगारांची तपासणी आणि आरोग्य प्रबोधन विनामूल्य केले. 1985 पासून डॉ. अर्चनाताई वनवासी कल्याण आश्रमाच्या सक्रिय सभासद झाल्या. 1995 ते 2005 या कालखंडात त्यांनी शेंडी (भंडारदरा) येथे जाऊन दरमहा विनामूल्य आरोग्य सेवा दिली. आदिवासी महिलांचे आरोग्याविषयक प्रबोधन केले.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिलांसाठी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम, साडी चोळी ओटीभरण आणि मोफत औषधे या प्रकारचे कार्यक्रम राबवत त्यांनी आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्य केले. या विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.

कमलाबाई गाडगीळ बालिकाश्रमाच्यावतीने राबविल्या जाणार्‍या कन्या दत्तक योजनेत दरवर्षी त्यांचा सहभाग आहे. संगमनेर साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून त्या सदस्या आहेत. तर विजय नागरी पतसंस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात महिला बचत गटाच्या 2 हजारांहून अधिक महिलांना त्यांनी ऍनेमियाबाबत मार्गदर्शन केले.

वनवासी कल्याण आश्रमाद्वारे आयोजित छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बस्तर या नक्षलवाद बाधित परिसरात आदिवासींसाठीच्या आरोग्य शिबिरात त्यांनी सहभाग घेतला. तेथेही त्यांनी महिलांना आरोग्यविषयक प्रबोधन केले. 2016 पासून संगमनेर मर्चंट बँकेच्या त्या सदस्या आहेत. त्यांना वाचनाची आवड आणि कविता करण्यात छंद आहे. अनेक साहित्य विषयक कार्यक्रमांमध्ये कविता वाचन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर महिला, शालेय मुली, महाविद्यालयीन तरुणी यांच्या आरोग्याविषयक लेख विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांची वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवा अविरत सुरू आहे. त्याचे हे कार्य निश्‍चितच कर्मयोगीनीला साजेसे आहे.

 

LEAVE A REPLY

*