3500 रुपये ऊसदरासाठी बेमुदत उपोषण : नवले

0
अकोले (प्रतिनिधी) – उसाला राज्यभर पहिली उचल 3500 रुपये द्यावी व ऊस दराचे एकच राज्यव्यापी धोरण ठरवावे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील लोणी येथील सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर 4 डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. उपोषण आंदोलनाच्या तयारीसाठी संघर्ष समितीच्यावतीने जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात येत आहेत. काल सोमवारी या विषयासाठी अकोले शासकीय अतिथीगृहावर अकोले तालुक्याची बैठक पार पडली.
राज्यभरातून विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारीही उपोषणास बसणार आहेत. 30 नोव्हेंबर रोजी या राज्यस्तरीय नेत्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातून विविध सामाजिक संघटनाही आंदोलनास पाठिंबा देत आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.
उपोषणास बसणार्‍या तालुक्यातील कार्यकर्त्यांची यादी बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यातील ज्येष्ठ नेते कारभारी उगले, माजी प्राचार्य शांताराम गजे, डॉ. संदीप कडलग, सुभाष येवले, आर.डी. चौधरी, बाळासाहेब मालुंजकर, प्रकाश आनंदा मालुंजकर, भाऊसाहेब शेणकर, सोमनाथ नवले, भाऊसाहेब सावंत यांनी उसदराचा निर्णय लागेपर्यंत शेतकर्‍यांसाठी आपण बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे कालच्या बैठकीत घोषित करत उपोषणार्थींची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ केला.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालुजी दळवी, रोहिदास धुमाळ, विलास नवले, लक्ष्मण नवले, आनंदराव नवले, सुरेश नवले, निलेश मालुंजकर, निखिल जगताप, भाऊसाहेब सावंत, भाऊसाहेब नवले, शुभम माने यांनी उपोषणस्थळी बसून उपोषणार्थीना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. लक्ष्मण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल आरोटे व विशाल पगारे यांनी उपोषण सुरू असेपर्यंत कला पथक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारत आंदोलनास योगदान देणार असल्याचे जाहीर केले आहे.
राजेंद्र भांगरे, सुरेश नवले व उपस्थित इतरांनी उपोषण दरम्यान रस्त्यावर उतरत पाठिंब्याच्या कृती करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उपोषणार्थींची नावनोंदणी सुरू असून डॉ. संदीप कडलग व रोहिदास धुमाळ यांच्याकडे इच्छुकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारे बैठका होणार असून 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील रेहमत सुलतान हॉलमध्ये राज्याची नियोजन बैठक होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*