Wednesday, April 24, 2024
Homeनगरजीवघेणी डबलट्रॉली ऊस वाहतूक देतेय अपघातांना निमंत्रण

जीवघेणी डबलट्रॉली ऊस वाहतूक देतेय अपघातांना निमंत्रण

परिवहन विभागाचे दुर्लक्ष; नेवासा बुद्रुक ग्रामस्थांचा रास्तारोकोचा इशारा

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- टेप लावून गाण्याच्या तालावर बेधुंद चालणारी ऊस वाहतूक करणारी वाहने आपघाताला निमंत्रण देत असून चाळणी झालेल्या नेवासा- श्रीरामपूर रस्त्यावर अशा वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून नेवासा बुद्रुक परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग व शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने लवकरच रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर तसेच नेवासा बुद्रुक, बहिरवाडी, भालगाव, सुरेगाव, पुनतगाव, पाचेगाव या भागात डबलट्रॉलीच्या ट्रॅक्टरद्वारे उसाची सर्रास वाहतूक सुरू आहे. यात अपघात झाल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. नेवासा बुद्रुक परिसर गंगाथडीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन आहे. येथून ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून पंधरा ते वीस टन उसाची वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर टेप लावून बेशिस्तपणे चालत असल्याने इतर वाहनांना अपघताचा धोका निर्माण होतो.

टॅ्रक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस कुठल्याही प्रकारची रेडियम पट्टी किंवा साईड लाइट लावलेले नसतात. याकडे परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येतात. यापूर्वीही रस्त्यावर लहान मोठ्या अपघातात हकनाक अनेकजण बळी गेले आहेत. या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भरधाव वेग, कर्णकर्कश हॉर्न, टेपरेर्कार्डरच्या गाण्यांचा मोठा आवाज आणि डबलट्रॉलीने उसाची नियमबाह्य वाहतूक करणार्‍या या ट्रॅक्टरला ओलांडून दुचाकीस्वार व अन्य वाहनचालक भीतभीतच पुढे जातात. दुचाकी, चारचाकी वाहन चालवणे म्हणजे मरणाला सामोरे जाणे अशीच परिस्थिती आहे.

डबलट्रॉली ट्रॅक्टर चालकांत बहुतेक जणांकडे वाहन परवाना व वाहनांची कागदपत्रेही नसतात. वाहनांना रिफ्लेक्टरही नसते. अशी वाहने बंद पडली किंवा टायर पंक्चर झाले तर रस्त्यावर आहे तिथेच दोनदोन दिवस वाहन सोडून चालक निघून जातात. रात्रीच्या वेळी अशा वाहनांना धडकून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.

वाहन परवाना नियमावलीनुसार ट्रॅक्टरचालकांना वाहतुकीसाठी फक्त एकाच ट्रॉलीचा वापर करता येतो. त्याचबरोबर पाठीमागील बाजूस परावर्तक पट्ट्या बसवाव्या लागतात. वाहनाचा वेग ताशी दहा किमी वेगाचा असावा व क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करू नये. ट्रेलरसहित ट्रॅक्टरची लांबी 18 मिटरपेक्षा अधिक असू नये. हे सर्व नियम असले तरी मात्र परिवहन अधिकारी यांनी हे नियम धाब्यावर बसवले असल्याचे दिसते.

नेवासा श्रीरामपूर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर चाळणी झाली असून सदरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे देखील पडले आहेत .सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.
– नवनाथ मारकळी, ग्रामपंचायत सदस्य, नेवासा बुद्रुक

डबल ट्रॉलीची वाहने एकामागे एक धावतात. मागच्या वाहनांना अशा वाहनांना ओलांडून पुढे जाताना (ओव्हरटेक) अपघात घडतात.रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार समोरच्या वाहनांना धडकतात. अशा बेशिस्त वाहतुकीला लगाम घालावा.
– संभाजी ठाणगे, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -

ताज्या बातम्या