दौंड-नगर-मनमाड दुहेरी रेल्वेमार्गाला मंजुरी

0

केंद्र सरकारचा निर्णय, पाच वर्षांत पूर्ण करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- दौंड-नगर-मनमाड या 247 कि.मी. रेल्वे दुहेरीकरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळ समितीने मंजूरी दिली आहे. या मार्गासाठी अंदाजित खर्च 2081.27 कोटी आणि पूर्णत्वाचा खर्च 2330.51 कोटी आणि वार्षिक 5 टक्के वाढीसह असेल, अशी माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. हा दुहेरी मार्ग पाच वर्षांत 2021-22 पर्यंत पूर्ण होण्याचा आशावादही व्यक्त करण्यात येत आहे.  

दौंड-नगर-मनमाड रेल्वेमार्ग एकीरी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुुळे दुहेरीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. निवेदने देण्यात आली. रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. वेळप्रसंगी आंदोलनेही झाली. त्यानंतर 2015 मध्ये केंद्र सरकारने दौंड-नगर-मनमाड रेल्वे दुहेरी व विद्युती करणाच्या सर्व्हेसाठी 9 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद केलेली होती आता केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत नगर-दौंड-मनमाड रेल्वे लाईनच्या 247 कि. मी. दुहेरी व विद्युती करणासाठी मंजुरी देण्यात आली.

हा दुहेरीमार्ग झाल्यास प्रवासी व मालवाहतूकीत सुलभता येणार आहे. या मार्गाच्या बांधकामाच्या निमित्ताने सुमारे 59.40 लाख मनुष्य दिवसांचा थेट रोजगार निर्माण होईल.नगरसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यालाही याचा लाभ होणार आहे. यातून आर्थिक उलाढालींना चालना मिळणार आहे. या मंजुरीमुळे या मार्गावरील रेल्वेच्या प्रवासात जवळपास 2-3 तासांची बचत होणार असून नवीन रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळणार आहे. या मार्गामुळे नगरकरांना आता रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. तसेच या मार्गावर नगर, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदा या तालुक्यांसह जिल्ह्यातील प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी फायदा होणार आहे. तसेच फळे आणि शेतीमाल मोठ्या शहरांतही पाठविण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.

साईबाबा, शनि भक्तांचा प्रवास सुलभ होणार
या दुहेरी मार्गामुळे नगर जिल्ह्यातील पर्याटनाला चालना मिळणार आहे. दक्षिणेच्या राज्यातील भाविकांना एकेरी मार्गामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पण दुहेरी मार्गामुळे आणखी रेल्वे सुरू झाल्यानंतर शिर्डीत साईबाबा आणि नेवाशातील शनि शिंगणापुरात शनि देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.

2330.51 कोटींचा खर्च अपेक्षीत
नगर, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदा तालुक्यांना होणार अधिक लाभ

LEAVE A REPLY

*