Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखनिव्वळ नकारात्मक भूमिका नको !

निव्वळ नकारात्मक भूमिका नको !

चालू शैक्षणिक वर्ष ‘करोना’च्या सावटात पुरे होणार, अशी चिन्हे आहेत. गेले सहा महिने सर्व शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यावर ‘ऑनलाईन’ अध्यापनाचा सुरक्षित पर्याय अवलंबला गेला.

शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना घरबसल्या देण्याचा तो एक स्वागतार्ह पर्याय म्हणून बरा प्रयत्न झाला, पण ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा लाभ किती विद्यार्थ्यांच्या पदरी पडला असेल? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादासाठी शालेय वर्गात अध्ययन-अध्यापनाला पर्याय नाही. ती गरज ओळखून दिवाळीनंतर शाळा, विद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू होतील. शालेय शिक्षण विभागाने तशी माहिती दिली आहे. त्या करता आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे. शाळांना सुरक्षा साधने पुरवण्याची जबाबदारी महापालिका आणि जिल्हा परिषदांवर सोपवली गेली आहे.

- Advertisement -

शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची आरोग्यविषयक तपासणी सुरू झाली आहे. शाळा, विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालये आता विद्यार्थ्यांनी गजबजतील, अशी अपेक्षा आहे. तथापि अनेक पालक याबाबत फारसे उत्सूक दिसत नसावेत. त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. ‘करोना’ अजून संपुष्टात आलेला नाही. किंबहुना देशात दुसर्‍या लाटेचा संभव्य व्यक्त केला जात आहे; तर काही ठिकाणी ‘करोना’ची तिसरी लाट येऊ पाहत आहे, अशाही बातम्या झळकत आहेत. अशावेळी पाल्यांना शाळेत धाडायला पालक तयार नसल्याचे सांगितले जात आहे. सरकारी आदेशाचे पालन करून शाळा उघडल्या जातील, पण विद्यार्थी शाळेत येणार नसतील तर रिकाम्या वर्गांत शिक्षक शिकवतील तरी कोणाला? परस्पर संपर्क आणि गर्दीमुळे ‘करोना’ संसर्ग वाढतो, एका बाधितापासून अनेकांना ‘करोना’ची बाधा होऊ शकते, असे तज्ञ सांगतात.

हा धोका लक्षात घेता आपापल्या मुला-मुलींच्या सुरक्षेची काळजी पालकांना वाटत असेल तर ती अनाठायी कशी म्हणावी? शासन-प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असताना पालकांनी पाल्यांच्या सुरक्षेच्या भीतीपोटी नकारात्मक भूमिका घ्यावी का? ‘करोना’ची भीती अजून पूर्णपणे संपलेली नाही हे खरे! तथापि त्या भितीने सर्व समाजाचे दैनंदिन व्यवहार सतत बंद राहणे योग्य ठरेल का? बर्‍याच अंशी आता ते टप्प्याटप्प्याने सुरूही झाले आहेत. खरेदीसाठी बाजारात जाणे, नोकरीवर जाणे, व्यवसाय-धंदे चालू करणे, सकाळचा फेरफटका, मुलांचे खेळ आदी गोष्टी आवश्यक ती काळजी घेऊन चालू झाल्या आहेतच ना? मग फक्त शाळांच्या बाबतीत तरी ‘करोना’ची धास्ती किती बाळगावी? आतापर्यंत विद्यार्थ्यांचे बरेच शैक्षणिक नुकसान झाले आहे.

ते आणखी होऊ नये म्हणून शाळा उघडणे आवश्यक आहे. पालकांचा अनुकूल प्रतिसाद मिळाला तरच सरकारने दाखवलेली कळकळ सार्थकी लागू शकेल. पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत नकारात्मक भूमिका घेऊन पुढच्या पीढीचे भवितव्य पालकांनी टांगणीला लावावे का? आणखी किती दिवस मुलांना संसर्गाच्या भीतीने घरात डांबून ठेवणार? व्यवहार बंद झाल्याने अनेकांच्या मानसिकतेवर नैराश्याचे प्रतिकूल परिणाम जाणवू लागतील, अशीही शक्यता जाणते व्यक्त करीत आहेत. याचाही विचार पालकांनी केला पाहिजे. दसरा-दिवाळीसारखे सण जमेल तसे साजरे केले गेलेच ना? आता तर देवालये आणि प्रार्थनास्थळेही उघडली आहेत. केवळ शाळा-महाविद्यालये बंद राहिल्याने तरुणाईवर त्याचे काय परिणाम होतील? या सर्व प्रश्नांचा साधक-बाधक विचार व्हावा. ‘करोना’ला प्रतिबंध करण्यासाठी सुचवलेले सर्व निर्बंध आणि उपाय कसोशीने पाळले जातील यावर पालकांनी जरूर नजर ठेवावी. मात्र निव्वळ नकारात्मक भूमिका टाळावी हेच बरे!

- Advertisment -

ताज्या बातम्या