Friday, May 3, 2024
Homeधुळेकाळ्या बाजारात मिळतेय...रेमडेसीवीर

काळ्या बाजारात मिळतेय…रेमडेसीवीर

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

सगळीकडेच करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जीव वाचविण्यासाठीच्या धडपडीत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची कमालीची धडपड सुरु आहे.

- Advertisement -

यातूनच काळाबाजार फोफावला असून दोंडाईचात जास्तीच्या दराने इंजेक्शन विकण्याचा गोरखधंदा कॅमेरात कैद करण्यात आला आहे.

पोलीस मित्र संघटनेचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रशांत गिरासे आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक दिग्विजयसिंग राजपूत यांनी याबाबत स्ट्रिंग ऑपरेशच्या माध्यमातून भांडाफोड केला आहे.

दोंडाईचा सरकारी रुग्णालयात मनिषाबाई सिसोदिया या महिलेवर कोरोना संदर्भात उपचार सुरू असतांना तिला रेमडीसीवीर इंजेक्शनची गरज भासली.

जिल्ह्यात कुठेही हे इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने तिच्या मुलाने मनविसेचे पदाधिकारी द्विगविजयसिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही शोधाशोध सुरु केली.

दोंडाईचात आशिष नामक व्यक्तीकडे इंजेक्शन मिळू शकते अशी माहिती मिळाल्याने त्यांनी संपर्क सुरु केला. सुरुवातीला नाही नाही म्हणता म्हणता उपलब्ध करुन देण्याची हमी मिळाली.

त्यानुसार इंजेक्शनचे दर आणि उपलब्ध करुन देण्याचे ठिकाण व वेळ निश्चिीत झाली. नंदुरबारहून मागवून देत असल्याचे सांगत शहरातील राम मंदिरामागे इंजेक्शन घेण्यासाठी येण्याचे निर्देश मिळाले.

ठरलेल्या वेळेत, नियोजित ठिकाणी या आशिष नामक व्यक्तीने येवून प्रत्येकी अडीच हजार या प्रमाणे पाच हजार रुपयात दोन इंजेक्शन उपलब्ध करुन दिलेत.

या व्यक्तीशी भ्रमणध्वनीने झालेला संवाद रेकॉर्ड करुन तसेच या संपूर्ण प्रकाराची छुप्या कॅमेराने चित्रफित करुन ऑडिओ, व्हीडीओसह प्रशांत गिरासे यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी स्वरुपात तक्रार केली आहे.

या तक्रारीत त्यांनी दोंडाईचातील खान्देश मेडिकल एजेन्सी या अस्थापनेचा उल्लेख केला असून आशिष नामक व्यक्ती त्यांचाच मुलगा असल्याचेही नमूद केले आहे.

तसेच संबंधितांचा परवाना रद्द होवून कारवाई करण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

यांना उपलब्ध होतच कसे ?

रेमडिसीवीर इंजेक्शन हे कोरोनावर रामबाण उपाय म्हणून वापरले जाते आहे. बाधितांची वाढती संख्या आणि इंजेक्शनची गरज विचारात घेता प्रचंड मागणी वाढल्याने काळाबाजार सुरु झाला आहे.

याबाबत अनेक तक्रारीनंतर शासन-प्रशासनाने संमित्या निश्चित करुन इंजेक्शन वाटपाचे स्वरुप देखील ठरविले आहे. आता त्या-त्या हॉस्पिटलच्या गरजेनुसार त्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जात आहे.

एकीकडे मेडिकल स्टोअर्सवर रेमडिसीवीर मिळणार नाही असे सांगितले जात असतांना मग जास्तीच्या दरात काळ्या बाजारात ते उपलब्ध होते कसे ? त्यांना मिळतात कुठून? हॉस्पिटलची जबाबदारी नाही काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

यासंदर्भात पालकमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनीही केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या