Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या 3 डॉक्टर, 16 नर्सेससह 25 जणांना कोरोनाची लागण

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या 3 डॉक्टर, 16 नर्सेससह 25 जणांना कोरोनाची लागण

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील कोरोना व्हायरसचा फास दिवसेंदिवस अधिकाधिक आवळला जात आहे. नागरिकांबरोबरच पुण्यातील नामांकित रुबी हॉल क्लिनिकच्या 3 डॉक्टर, 16 नर्सेस आणि सहा कर्मचारी अशा 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे तर पोलीस दलातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 800 पेक्षा जास्त झाल्याने पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 52 झाला आहे. तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत नविन 42 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर 19 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

- Advertisement -

रुबी हॉलमधील या सर्व कोरोनाबाधित कर्मचार्‍यांचे रिपोर्ट काल (20 एप्रिल) रात्री उशिरा आले. या अगोदर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील काही नर्सचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि सुमारे 1 हजार कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 19 नर्स आणि इतर 06 कर्मचारी असे 25 कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहे. या 25 जणांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यांच्यावर सध्या उपचार सुरु करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या 25 कर्मचार्‍यांच्या सहवासात किती लोक आले आहेत, याची माहिती घेण्याचं काम प्रशासन करत आहे.

दरम्यान, पुणे शहर पोलिस दलातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या पोलिस कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या संपर्कातील 14 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत पुणे पोलिस दलातील तीन कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. पुण्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचा इशारा केंद्र सरकारने सोमवारी दिला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड येथे कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी व परिचारिकांना कोरोनाची लागण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडत असल्याचे चित्र आहे.

शहरातील मध्यभागात असलेल्या एका पोलिस ठाण्यात नेमणुकीस संबधित पोलिस चालक म्हणून नेमणुकीस आहेत. संबंधित पोलिस कर्मचार्‍याला सर्दी, खोकला तसेच ताप अशी लक्षणे आढळून आल्यानंतर त्याची वैद्याकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेली पत्नीचीही चाचणी करण्यात आली. दोघेजण करोनाबाधित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली. त्यानंतर आता याच पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

ससून, नायडू आणि भारती रुग्णालयांमधील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल
दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ससून, नायडू आणि भारती रुग्णालयांमधील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आता काही खाजगी रुग्णालयांच्या शोधात आहे. सध्या ससूनमध्ये 100, नायडूत 120 आणि भारती रुग्णालयात 135 बेड्सची व्यवस्था आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे रुगणालयांमधील बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. खासगी रुग्णालये मिळाले नाहीत तर प्रशासनाकडून वसतिगृहही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या