मस्कार !  मी भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणून काम करतो.

पुण्यातील रस्त्यावरच्या / मंदिराबाहेरच्या अंध अपंग आणि ज्यांना नाइलाजाने भिक मागावी लागते अशा  वयस्कर माणसांना रस्त्यावरच तपासतो आणि लागेल ती मोफत वैद्यकीय सेवा देतो माझ्या सोहम ट्रस्ट नावाच्या छोट्याशा संस्थेच्या माध्यमातून …!

आपल्याला वाटत असेल की मी खूप काहितरी आगळंवेगळं  करत आहे, परंतु तसं काहीच नाही. मी यांना मोफत औषधी पुरवतोय, हे केवळ  निमित्त आहे ! मला खरंतर भिक्षेकऱ्यांचं समुळ उच्चाटन करायचं आहे.

मी यांना कायम मोफत औषधी देत गेलो, तर हे लोक कायम माझ्यावर अवलंबून राहतील, भिकारी ते भिकारीच राहतील….. हे असं झालं, तुम्ही भिकारीच राहून भिक मागत रहा, आणि बदल्यात मी तुमचा मोफत औषधोपचार करेन!

असं झालं, तर रोज नविन भिकारी तयार होतील ! जे मला अजिबात नकोय…..!!!

माझा मूळ हेतू हा आहे, की सध्या भिक्षेकरी म्हणुन आयुष्य जगत असलेल्या लोकांचे पुनर्वसन करायचं

आज ते दीनवाणेपणाने आपल्याकडे मागताहेत…, माझं स्वप्न आहे, उद्या ते दुसऱ्याला काहितरी देऊ शकतील , किमान स्वतःचं आयुष्य मानानं जगु शकतील इतकं त्यांना सक्षम बनवायचं …

पण असं करण्यासाठी मला त्यांच्याशी संवाद वाढवावा लागेल, त्यांच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण करावा लागेल, माझं ते काही ऐकतील अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल … आणि मग अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मी त्यांना हक्काने सांगेन, ” चला उठा आता, बास झालं भिक मागणं आणि दुसऱ्याच्या जीवावर जगणं… स्वाभिमानाने जगा”

पण असं सांगण्याअगोदर त्यांना पोटापाण्यासाठी काहीतरी रोजगार मला द्यावा लागेल आणि मी त्याही प्रयत्नात आहे.

माझ्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी मी आज त्यांचा मोफत औषधोपचार करतोय, माझं ते ऐकतील इतपत परिस्थिती निर्माण झाली की भिक मागणं मी त्यांना बंद करण्याची विनंती करेन ! तोपर्यंत रोजगाराच्या संधी शोधून ठेवेन….. शासनाच्या  सहाय्याने पुनर्वसन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन….

हा विश्वास निर्माण करण्यासाठी , त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मोफत औषधोपचार हे फक्त निमित्त आहे, माझं ध्येय नाही ….

नविन भिक्षेकरी तयार झाले नाहीत, तर मला हे काम थांबवावं लागेल… ज्या दिवशी माझं हे काम थांबेल तो दिवस माझा…. आणि हेच माझं ध्येय आहे

आणि म्हणुन माझ्या तपासणीदरम्यान मी या लोकांना विश्वासात घेऊन त्यांना भिक मागणं सोडण्यासाठी विनवतोय परंतु अजुन तरी सगळा “आनंदच” आहे.

या पार्श्वभुमीवर सांगायला खुप आनंद होतोय की, माझ्या या प्रयत्नांना हळुहळु यश येतंय…. खूप लोक मला सांगतात की, मी जर त्यांच्या हाताला काम दिलं तर ते भिक मागणार नाहीत …

आता त्यांच्या हाताला काम देणं , सोय करणं ओघाने आलंच….

मला हे आवर्जून सांगावसं वाटतंय कि आपल्या पाठबळामुळेच हे सर्व करण्याचं बळ मला मिळतंय…हे सांगण्यासाठीच आजचा हा लेखनप्रपंच …

फोटो प्रतीकात्मक

कशासाठी हा डॉक्टर भिक्षेकऱ्यांसाठी ???

1999 साली डाँक्टर म्हणून पास तर झालो…..दवाखाना टाकायला पैसे नाहीत ….. आणि घरातून पैसे मागायची लाज….पोट भरायचं कसं? काही दिशा सापडेना ……

अशात खडकवासला परिसरातले एका गावातील वयोवृध्द सरपंच भेटले; म्हणाले, ” दवाखाना कंदिबी हुईल, पाय हायेत ना तुला, आरे भर पिशवीत गोळ्या आन माज्या गावात घरोघरी फिर. मी सांगतो समद्यांना.”

झालं…… तेव्हा खरोखरच दोन पिशव्या भरुन औषधं घेतली……एक पिशवी पाठीवर आणि दुसरी घेतली पोटावर ……पोटासाठी…..!

खडकवासला धरण परिसरातल्या 12 वाड्या आणि 12 खेडी पायपीट करुन पिंजून काढायचो,  …..घरोघरी जाऊन ……कोणी पेशंट आहेत का विचारुन गोळ्या द्यायच्या ….पैसे घ्यायचे….पैशाबरोबरच कितीक वेळा अपमानही मिळायचे एकावर एक फ्री……!

काहीवेळा  स्वतःची चीड यायची….पण पोटातल्या भुकेला अपमान आणि चीड सुध्दा त्यावेळी गोडच वाटायची.

पण काहिवेळा याच रस्त्यावरून फिरतांना वाटेत कितीतरी भिकारी भेटायचे…..डाँक्टर आहे म्हटल्यावर माझीच विचारपूस करायचे…..आजार सांगायचे ….. गोळ्या घ्यायचे …… आठ आणे / एक रुपया गोळा करुन मला खर्चायला द्यायचे, त्यांच्यातलं चांगलं अन्न उरवुन मला खावु घालायचे ….विचार यायचा ……भिकारी कोण ? देणारे ते कि घेणारा मी …….???

त्यावेळी ते मला म्हणायचे, बाबा, आमचं हे कर्ज हाय तुज्यावर आसं समज….तु जवा मोटा हुशील, तवा तुला जसं जमंल ,जेवा जमल ते फेड, मंग तर झालं ?

2017 संपत आलंय, या 17 वर्षात तेच आठ आठ आणे आणि एक एक रुपया साठवून भरबाजारात स्वतःची दवाखान्याची जागा, फ्लॅट आणि मोठ्ठी गाडी घेतलीये.

पैशाने आज नक्कीच त्या वेळेपेक्षा मोठा झालोय, पण आजही त्या फ्लॅटवर गेलो कि त्या रस्त्यावर भेटलेल्या भिकार्यांचे हसरे चेहरे भिंतीवर दिसतात.कोपऱ्या कोपऱ्यात देणारे ते हात दिसतात.वाटतं, खरंच आपला काय वाटा आहे यांत ….? अजून आपण कर्ज कुठं फेडलंय यांचं ….?

गाडीची चाकं पुन्हा त्याच वाटेवर वळतात……

पूर्वीच्या त्या वळणावर आजही भिकारी तसेच तिथेच उभे असतात. पण मी शोधतोय रस्त्यावरची त्यावेळची ती जुनी श्रीमंत माणसं ज्यांनी माझ्यासारख्या भिकार्यांला गाडीत बसवलं…. आणि स्वतः गेली दुसऱ्यांना आनंद वाटायला.

लायकी नसतांनाही मी येत असतो दरवेळी इथं परतफेड करायला….. पण ती कुठंच नसतात…..कुठंच नसतात…..किती क्रुर चेष्टा !!!

……. आणि मी असतो माझ्या AC गाडीत घामेजुन बसलेला निर्ल्लज्जपणे …..

खरंच मला जमणार आहे का आठ आठ आण्यांची ही त्यांची कर्जं फेडायला……?

वाटतं, कुठल्या फुशारकीने आपण इथे येतो?

खरंच, आजतरी ते आठ आठ आणे फेडण्याची ऐपत आहे आपली ???  …..

आता वाटतं , या 17 वर्षात मी मोठा झालोय कि आणखी खुजा …….? आता मात्र मला आणखी खुजं नाही व्हायचं माझ्याच नजरेत , आणि म्हणून मी  निर्णय घेतलाय;  पुन्हा तशाच दोन पिशव्या घ्यायच्या, एक पाठीवर आणि एक पोटावर……एक दिशा धरुन चालत रहायचं…. वाटेत भेटणाऱ्या रस्त्यावर, मंदिराबाहेर जे भिकारी दिसतील त्यांची विचारपुस करुन , आजारी असतील तर तिथल्या तिथे औषधं द्यायची , सेवा करायची अगदी मोफत….

यांच लोकांत ती जुनी माणसं शोधायची….  बघू भेटले तर भेटले, नाहितर कुठुनतरी पहात असतीलंच कि……. मी कर्ज फेडतोय की नाही…..🙏

  • डॉ. अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, पुणे

Email : abhisoham17@gmail.com

डॉ. अभिजीत सोनवणे  
Doctor for Beggars

(डॉ. अभिजित सोनवणे (बीएएमएस) हे मुळचे सातारा जिल्ह्यातले. सध्या पुणे येथे शिवाजीनगर गावठा भागात त्यांचे छोटेसे क्लिनिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून काम करतात. सकाळचे काही तास भिकाऱ्यांवर मोफत उपचार ते करतात. त्या कामी त्यांची डॉक्टर पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा त्यांना मदत करतात. माझ्या लहानपणी भिकाऱ्यांनी, गरिबांनी माझ्यावर उपकार करून ठेवले आहेत, त्याची परतफेड आता या सेवेतून करतोय असे ते सांगतात. पुण्यातील वेगवेगळ्या मंदिर, मशीदीबाहेर ठराविक वारी ते जाऊन भिकाऱ्यांवर उपचार करतात. अनेक भिकाऱ्यांना त्यांनी भिक मागण्यापासून परावृत्त केले आहे. काही भिकारी फुलांचा किंवा असेच छोटे व्यवसाय आता करत आहेत. त्यासाठीचे छोटेसे भांडवलही डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून दिले आहे. असे हे अवलिया डॉक्टर त्यांचा अनुभव ब्लॉगद्वारे शब्दबद्धही करत आहेत. त्यांचे ते अनुभव ब्लॉगरूपाने आता देशदूतच्या वाचकांसाठी नियमितपणे ते देणार आहेत. त्याचा आजपासून शुभारंभ करत आहोत.)

LEAVE A REPLY

*