Blog : मदर टेरेसांना मराठीत काय म्हणतात? उत्तर आहे सिंधुताई सपकाळ !!!

0

इंडियाला मराठीत भारत म्हणतात… मदर टेरेसांनाना मराठीत काय म्हणावं ? “सिंधुताई सपकाळ”…..!!!

ज्याला कोणी नाही त्याची आई… सिंधुताई सपकाळ…..!!! ज्याला समाजाने टाकून दिलंय त्याची माई सिंधुताई सपकाळ…..!!!

माईंना पहात आणि ऐकत मी मोठा झालो. माई माझ्या प्रेरणास्थान आहेत,  माझ्यासाठी देव आहेत… !

माणूस देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा, नवस आणि काय काय करतो… आता माझ्या या देवाला प्रसन्न करण्यासाठी मी कुठली पूजा मांडावी ? कसा आणि कुठे नवस बोलावा ? जेणेकरुन माझा हा देव मला प्रसन्न होईल…?

तसा भेटलोय त्यांना कित्येकदा भक्तांच्या गर्दीतलाच एक भक्त म्हणून, पण आयुष्यात एकदा तरी अशी संधी येईल का, की मला या देवाच्या पायाशी तासभर बसून बोलता येईल? माई म्हणून स्वतःचे लाड करुन घेता येतील ? मी जे काम करतोय, त्या कामाच्या प्रेरणास्थान तुम्ही आहात हे सांगता येईल?  आज जी चार लोकं भीक न मागता स्वाभिमानाच्या रस्त्यावर चालताहेत याचं श्रेय तुम्हाला आहे, त्यांना ते दाखवता येईल….! कधी आयुष्यात अशी वेळ माझ्या पदरात येईल का ? कि आयुष्य असंच संपून जाईल….?

….मागच्या आठवड्यात एक कॉल आला. मी विनय सपकाळ बोलतोय.  सिंधूताई सपकाळ आपल्याशी बोलू इच्छितात … मी उडालो… कोण माझ्या भावनेशी खेळतंय ? माझी अशी थट्टा करतंय असं वाटून वैतागुन आणि थोड्या जरबेने विचारलं… कोण बोलतंय हां….नाव काय तुमचं ?

तोच विनयशील आवाज… मी विनय सपकाळ बोलतोय, सिंधुताई सपकाळ आपल्याशी बोलू इच्छितात …!!!

आणि पुढचा आवाज माईंचा होता…. काय रे बेटा…? आईला असं रडवतं का रे कोणी ?

आयुष्य भर जपून ठेवलेल्या अत्तराचा सुवास मी ओळखणार नाही ? हो त्या माईच होत्या…. पायातली थरथर वाढली,  हात कापायला लागले… मी आता पडणार असं वाटायला लागलं…. मी जमिनीवर भिंतीला टेकून बसलो जिथे होतो तिथ्थे ….

आवंढा गिळत म्हटलं माई, खरंच तुम्ही बोलताय ? हो रे माझ्या सोन्या, माझ्या बाळा…. असं म्हणून ती माऊली रडायला लागली …. माझ्या कामाबद्दल त्यांना कळलं होतं…. हे अश्रू आनंदाचे होते, लेकरावरच्या मायेचे, कौतुकाचे होते….

भर उकाड्यात थंडगार पाण्याचा शिडकावा व्हावा, कुणी चंदनाचा लेप लावावा किंवा धीरगंभीर गाभा-यात घंटानाद उमटावा आणि त्या नादात सर्वस्व विसरुन जावं, किंवा पाण्यावाचून तडफडणा-याच्या तोंडात कोणीतरी मायेनं, पाण्यानं भरलेली ओंजळ धरावी असं माझं झालं होतं….. माईंच्या मायेनं ओथंबलेल्या शब्दांनी….!

त्यांच्या एका वाक्याने मी गलबलून गेलो,  म्हणाल्या, “लेकरा, जरा आधी जन्मला असतास, तर माझ्या आयुष्याची अशी परवड नसती रे झाली… तू त्यावेळी तुझ्या पदराखाली मला घेतलं असतंस आणि मी तुझं लेकरु म्हणून जगले असते रे …. कुठे हरवला होतास रे माझ्या सोन्या मी भिक मागताना….?”

पुढचा सर्व संवाद एकमेकांच्या हुंदक्यांनीच केला….!

फोन ठेवतांना म्हणाल्या, बाळा 28 तारखेला गुरुवारी आईला भेटायला येशील ?…ये रे बाळा…. मी स्वयंपाक करते… माझ्या हातचं खाशील ?

माझा होकार कदाचीत माझ्या हुंदक्यांनीच पोचवला असावा….!

गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर…. फोन झाल्यापासून क्षण अन् क्षण मोजत होतो… देव मी मानत नाही, पंचांग मी बघत नाही,  कॅलेंडर फक्त तारीख आणि वारासाठी….

पण आज उठून कॅलेंडर पाहिलं… नवरात्रातला दिवस,  दुर्गाष्टमी,  सरस्वती पुजनाचा दिवस…. म्हणजे ? माझी तपश्चर्या फळाला आली ? आज देवी मला पावणार …..?  माझा देव मला भेटणार ….?

विचारांच्या तंद्रीतच सौ. मनिषा आणि मी निघालो…

माई जिथे राहतात, ते मंदिरच माझं …. आधी पायरीला नमस्कार केला आणि धडधडत्या अंतःकरणाने माईंसमोर उभे राहिलो…. उभे कसले त्यांच्या पायावर दोघेही कोसळलो…. माईंनी पाठीवरनं हात फिरवत दोघांची मायेनं चौकशी केली…. स्थिरस्थावर झाल्यावर प्रत्यक्ष माईंच्या तोंडून त्यांचा जीवन प्रवास ऐकला… तिघांच्या डोळ्यात अश्रूचा महापूर..

किती सोसलंय तुम्ही माई,  मनिषा म्हणाली.

“अगं बाळा, मी ती भूक सोसलिये म्हणून तर दुस-याची भुक जाणू शकले,  नाहीतर हे आयुष्य असंच वाया गेलं असतं गं…, कितीवेळा आत्महत्या करायला गेले पण असं वाटलं की आयुष्य संपवण्यापेक्षा स्वतःबरोबरच इतरांचंही आयुष्य सावरण्यात खरी मजा आहे आणि मग तिथून खरी जगायला आणि जगवायला शिकले, ज्यावेळी हा विचार माझ्या डोक्यात आला तोच माझा जन्मदिवस, बाकीचे दिवस म्हणजे काय गं नुसत्या कॅलेंडरावरच्या तारखा…!!!”

हे बोलताना त्यांचे अगोदरचेच तेजस्वी डोळे मला आणखी तेजस्वी भासले…

मी फक्त ऐकत होतो, साठवत होतो.  शहाण्या बाळासारखा; जमिनीवर त्यांच्या खुर्ची जवळ बसून …..आणि माई माझ्या डोक्यावरुन हात फिरवत होत्या प्रेमाने , मायेने, आपुलकीने ….वाटलं हे आयुष्य इथंच आता संपलं तरी चालेल…!

एव्हढी माया मला मिळाली हे माझं भाग्य, कदाचित मी ज्या भिक्षेक-यांसाठी काम करतो त्यांचे आशिर्वाद !

ब-याच वेळाने माई उठल्या, म्हणाल्या जेवून घ्या बाळांनो….. आम्ही पोटभर जेवलो, जेवण कसलं ते… प्रसाद आम्हाला मिळालेला….

निरोप घ्यायची वेळ आली.  सून पहिल्यांदाच घरी आली म्हणून मनिषाला साडी चोळी आणि घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी माझ्या हातावर ठेवलं… आम्हां दोघांचे चारही हात कमी पडले…. जिला देणं आणि देणंच द्यायचं माहिती आहे अशा माऊलीकडून घेताना आमचा भला मोठा पदर ही अपुरा पडला…

निघतांना पुन्हा डोळ्यांत पाणी ठरेना…

या सिंधु – सागराने माझ्यासारख्या झ-याला सामावून घेतलं कुशीत….असे कितीक झरे इथंच येवून विसावतात, विलीन होतात…. माझं काय कवतिक ?

निघतांना मनिषाला म्हटलं, आज देवी पावली ना गं, ती म्हणाली, हो रे तुझ्याबरोबरच मलाही….!!!

येताना विचार करत होतो, माईंनी डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देताना, आई म्हणुन तिच्यातल्या शक्तीचा अंश माझ्यातही परावर्तीत केलाय…. तीचा योग्य वापर करायचाय, आता माईचा मुलगा आहे मी… तीला वाईट वाटेल असं काहीच करायचं नाही, करणार नाही …….माईशप्पथ !!!

– डॉ. अभिजीत सिंधुताई सपकाळ , डॉक्टर फॉर बेगर्स,  संपर्क क्रमांक 9822267357
डॉ. अभिजीत सोनवणे  
Doctor for Beggars

(डॉ. अभिजित सोनवणे (बीएएमएस) हे मुळचे सातारा जिल्ह्यातले. सध्या पुणे येथे शिवाजीनगर गावठा भागात त्यांचे छोटेसे क्लिनिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून काम करतात. सकाळचे काही तास भिकाऱ्यांवर मोफत उपचार ते करतात. त्या कामी त्यांची डॉक्टर पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा त्यांना मदत करतात. माझ्या लहानपणी भिकाऱ्यांनी, गरिबांनी माझ्यावर उपकार करून ठेवले आहेत, त्याची परतफेड आता या सेवेतून करतोय असे ते सांगतात. पुण्यातील वेगवेगळ्या मंदिर, मशीदीबाहेर ठराविक वारी ते जाऊन भिकाऱ्यांवर उपचार करतात. अनेक भिकाऱ्यांना त्यांनी भिक मागण्यापासून परावृत्त केले आहे. काही भिकारी फुलांचा किंवा असेच छोटे व्यवसाय आता करत आहेत. त्यासाठीचे छोटेसे भांडवलही डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून दिले आहे. असे हे अवलिया डॉक्टर त्यांचा अनुभव ब्लॉगद्वारे शब्दबद्धही करत आहेत. त्यांचे ते अनुभव ब्लॉगरूपाने आता देशदूतच्या वाचकांसाठी मागील आठवड्यापासून नियमितपणे देत आहेत.)

LEAVE A REPLY

*