Blog : यंदाचे ‘दिवाळी गिफ्ट’; भिकाऱ्यांना पॅरामेडिकलला आणि योगशिक्षणाला प्रवेश;

0

ला नेहमी असं वाटतं की, ज्याला आपण जे गिफ्ट’ देतोय त्याला ते उपयोगी पडावं ख-या अर्थानं !  भिक्षेक-यांना फराळ फटाके नवे कपडे देणं ही वरवरची चैन ठरेल आणि आपल्याला मिळालेलं तात्पुरतं समाधान !

अन्न वस्त्र आणि निवारा ही त्यांची खरी आणि कायमस्वरुपी लागणारी गरज आहे,  माणसाने गरजा भागवून चैन करावी.  आणि त्यांना या गरजा स्वाभिमानाने भागविता याव्यात यासाठी त्यांना शारीरिक आर्थिक आणि मानसिक सक्षम करणं,  स्वावलंबी बनवणं हे आत्ताच्या प्रसंगी गरजेचं आहे…. पण, यांना शारीरिक आर्थिक आणि मानसिक सक्षम बनविताना खालील बाबी या मोठ्या अडसर ठरतात.

 

  1. शारीरिक

खांद्यातून हात आखडणे, संधीवातामुळे उठता बसता न येणे,  गुडघा,  मनगट, घोटा यांचे स्नायू आखडणे आणखीही ब-याच गोष्टी…. यामुळे यांना इच्छा असूनही कष्टाचं काम करता येत नाही.

  1. आर्थिक

अंगात कोणतेही कौशल्य असेल तर माणूस लाथ मारेन तिथे पाणी काढेल. पण हे लोक कौशल्य मिळवू शकत नाहीत कारण कोणतीही गोष्ट शास्त्रोक्त शिकण्यासाठी;  त्याचं शिक्षण घ्यावं लागतं… आणि अशा शिक्षणासाठी यांना कोणत्याही  कागदपत्रांशिवाय प्रवेश देणार कोण ? फी भरणार कोण ? उच्चभ्रू संस्थांमध्ये,  जिथं श्रीमंतांची मुलं शिकतात अशा ठिकाणी या  “भिकारी” लोकांना उभं करणार कोण ? …. म्हणजे कुठलेही कौशल्य मिळवण्याचा मार्गच खुंटला….

  1. मानसिक

या सर्व बाबींमुळे त्यांची मानसिकता अशीच झाली आहे की,  आम्ही भिकारी आहोत,  भीक मागणं हेच आमच्या नशीबात आहे. आम्ही कोणताही कामधंदा करु शकत नाही. आम्हाला दुस-याच्या दयेवरच आयुष्यभर जगायचंय … हे पक्कं बसलंय त्यांच्या डोक्यात…..

माफ करा, पण आपण सर्वजण यांना कपडे, फराळ आणखीही बरंच काही देऊन त्यांच्या या मानसिकतेला आणखी दृढ करतो, त्यामुळे भिकेवाचूनही जगता येतं, याचा विचारही त्यांना शिवत नाही….

आणि म्हणून कायमस्वरुपी त्यांना शारीरिक आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या उपयोगी पडतील अशा भेटी मी शोधून ठेवल्या आहेत.
  • माझे मित्र श्री. विकास उत्तेकर हे मेडिकल क्षेत्राशी संबंधीत असून कोणत्याही आखडलेल्या सांध्यास ते शास्त्रोक्त पद्धतीने उपचार देऊन 30 मिनिटाच्या आत त्या व्यक्तीस चालते करु शकतात. माझ्यासाठी विकास अशा लोकांना रस्त्यावर मोफत  उपचार देऊन कष्टाचं काम करण्यास सक्षम करतील.
  • बंधूसमान माझे मित्र डॉ. गणेश अंबिके यांचे मेडिकल क्षेत्राशी संलग्न म्हणजे नर्सिंग, पॅरामेडिकल असे विविध कोर्सेस चे शिक्षण देणारे बहुआयामी असे कॉलेज आहे. इथं प्रवेश मिळणं म्हणजे आयुष्याचं कल्याण असं समजलं जातं. या माझ्या दोस्ताने वाईटात वाईट सर्व शक्यता गृहित धरुनही भिक्षेक-यांना संपुर्ण मोफत प्रवेश देण्याचं कबूल केलंय…. अट एकच की, किमान अक्षरओळख हवी. संपूर्ण कोर्स झाल्यानंतर नोकरीची 100 टक्के हमी या पठ्ठयाने दिली आहे….
  • श्री. नितीनभाई शहा या सहृदय दात्याने पाणीपुरीच्या पु-या तयार करण्याचे यंत्र आमच्या सोहम्‌ ट्रस्टला द्यायचं ठरवलं आहे. मशीनवर पु-या तयार करुन स्वस्त दरात होलसेल मार्केटमध्ये विक्री केल्यास खप निश्चित वाढेल. पु-या तयार करण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत सर्व बाबी भिक्षेकरी सांभाळणार …. येणारा सर्व पैसा, भिक्षेक-यांत समान वाटला जाईल…..
  • माझी पत्नी डॉ. मनिषा सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स या प्रकल्पाचा “कणा”, जी स्वतः योग गुरु आहे…. तिला योगा कॉलेज काढण्याची नुकतीच परवानगी मिळाली आहे. या योगा कॉलेजमध्ये योगशास्त्राशी संबंधीत 12-15 प्रकारचे प्रॅक्टिकल कोर्सेस उपलब्ध असणार आहेत.

मला सांगायला खूप अभिमान वाटतो की डॉ. मनिषाने भिक्षेक-यांना मानवेल असा स्वतंत्र अभ्यासक्रम स्वतः तयार केला आहे. ज्यात त्यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय ॲडमिशन मिळेल,  अक्षरओळख असणे जरुरी नाही,  संपूर्ण शिक्षण हे केवळ प्रॅक्टिकल पद्धतीचे….

कोर्स झाल्यानंतर, सर्टिफिकेट !  आणि योग शिक्षक म्हणून इतर संस्था किंवा स्वतःच्या कॉलेजात हमखास पगारी नोकरी….!

वरील भेटी जर भिक्षेक-यांनी स्वीकारल्या तर निश्चिंतपणे शारीरिक आर्थिक आणि मानसिक स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने एक पाउल पुढे पडेल….

दिवाळीत पेशंट्स तपासणीपेक्षा या “गिफ्टच्या” ऑफर्स घेऊन मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे, त्यांना या गिफ्टस् स्विकारण्याची विनंती करणार आहे….!  मला माहिती आहे की, पहिल्या फटक्यात मला यश येणार नाही, आणि मला ते नकोय सुद्धा !!!  पण प्रयत्न करायला, सुरुवात करायला काय हरकत आहे…?

50 वर्षापुर्वी मोबाइल / काँम्प्युटर याचं नाव कोणाला माहिती तरी होतं का ? पण आज काय परिस्थिती आहे ? कोणीतरी स्वप्न पाहिलं,  म्हणून तर ते अस्तित्वात आलं….!

मी पण स्वप्न पाहतोय भिक्षेक-यांच्या स्वावलंबनाचे. श्री.विकास, डॉ. गणेश, श्री. नितीनभाई आणि डॉ. मनिषा यांसारख्या “वेड्या” लोकांच्या जोरावर आणि अर्थातच तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाच्या बळावर ….!!!

आयुष्यात पहिल्यांदाच कोणाला काहीतरी वेगळं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतोय…. बघू या…. आणि हो, आपणां सर्वांस दिवाळीच्या शुभेच्छा !!!

डॉ. अभिजीत सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स ( संपर्क क्रमांक : 9822267357)
डॉ. अभिजीत सोनवणे  
Doctor for Beggars

(डॉ. अभिजित सोनवणे (बीएएमएस) हे मुळचे सातारा जिल्ह्यातले. सध्या पुणे येथे शिवाजीनगर गावठा भागात त्यांचे छोटेसे क्लिनिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून काम करतात. सकाळचे काही तास भिकाऱ्यांवर मोफत उपचार ते करतात. त्या कामी त्यांची डॉक्टर पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा त्यांना मदत करतात. माझ्या लहानपणी भिकाऱ्यांनी, गरिबांनी माझ्यावर उपकार करून ठेवले आहेत, त्याची परतफेड आता या सेवेतून करतोय असे ते सांगतात. पुण्यातील वेगवेगळ्या मंदिर, मशीदीबाहेर ठराविक वारी ते जाऊन भिकाऱ्यांवर उपचार करतात. अनेक भिकाऱ्यांना त्यांनी भिक मागण्यापासून परावृत्त केले आहे. काही भिकारी फुलांचा किंवा असेच छोटे व्यवसाय आता करत आहेत. त्यासाठीचे छोटेसे भांडवलही डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून दिले आहे. असे हे अवलिया डॉक्टर त्यांचा अनुभव ब्लॉगद्वारे शब्दबद्धही करत आहेत. त्यांचे ते अनुभव ब्लॉगरूपाने आता देशदूतच्या वाचकांसाठी  नियमितपणे देत आहेत.)

LEAVE A REPLY

*