Blog : एकेकाळी हप्ते वसूल करायचा…आता झाला चहावाला

0

त्ता सांगतोय या प्रसंगाची सुरुवात झाली साधारण पाच महिन्यांपुर्वी….. एका मंदिराबाहेर एक सडकछाप मवाली असायचा. तो स्वतः काही काम करायचा नाही आणि भिकही मागायचा नाही… हा फक्त म्हाता-या भिक्षेक-यांकडुन, त्यांच्या भीकेतला हिस्सा रोज घ्यायचा…

मला हे भिक्षेकरी त्याला समजावुन सांगायला सांगायचे, मी तसा प्रयत्नही केला… पण त्याला हे कसं आवडेल ?

खरं नाव सांगत नाही पण राजु म्हणुया याला… तर या राजुला माझाही राग यायला लागला त्या दिवसापासुन…

माझं येणं बंद व्हावं म्हणुन मलाच त्रास द्यायचा नवीन फंडा शोधला याने…

मी गेलो तीथे की, माझ्याभोवती भांगडा करणे, चिकनी चमेली, हलकट जवानी आणि वाट माजी बगतुय रिक्षावाला यासारखी सुमधुर गाणी तो माझ्याशेजारी उभा राहुन जोरजोरात म्हणायचा… पेशंट काय बोलतोय हे सुद्धा ऐकु द्यायचा नाही.

सतत दारुच्या तारेत… जाताना मुद्दाम लाथ लागेल मला, असं चालायचा, रागानं बघितलं तर जोरात हसुन म्हणायचा; रस्त्त्यात बसतो कशाला ? तुज्या दवाखान्यात न्हेकी…!

सगळ्या बघ्यांची मस्त करमणुक व्हायची, लोक हसायचे तसा त्याला आणखी चेव यायचा. एकुण त्याने माझा जोकर केला होता…

लोकांनी मला इकडे न येण्याविषयी पण सुचवलं, पण प्रश्न आता माझा एकट्याचा नव्हता, तक्रार केली त्याची; म्हणुन तो भिक्षेक-यांना दामदुपटीने अजुन त्रास द्यायचा…

असं वाटायचं एखादी लावुन द्यावी कानाखाली, पण, डॉक्टरचा अँप्रॉन घालुन रस्त्त्यात असं करणं मला शोभलं नसतं…

मला कळत नव्हतं की नेमकं करावं काय …?

पोलिसांना सांगावं तर त्याला ते चार फटके मारुन सोडुन देणार आणि हा पुन्हा नव्या दमाने आमचा बदला घेणार.

मंडळाच्या मुलांना सांगावं तर ते त्याचे हातपाय मोडुन ठेवणार- आणि ते ही मला नको होतं…

खुप विचार करायचो; याचं नेमकं करावं काय? विषारी साप पण मरेल आणि माझी काठी पण तुटणार नाही असा इलाज मी शोधत रहायचो…, या बाजुला जाताना मी कायम नर्व्हस व्हायचो…!

एक कळलं, याच्याशी दुश्मनी करण्यात फायदा नव्हता, झाला तर मैत्रीत काहीतरी फायदा होईल…

मी माझा अँप्रोच बदलला….

एके दिवशी त्याचं त्रास देवुन झाल्यावर, तो जिथे बसतो तिथे गेलो… म्हटलं राजु, तु कुठली पितो रे ?

का …? तो गुरगुरला…

म्हटलं सांग की…मला स्वस्तात मिळाली तर देत जाईन तुला फुकट …

त्यानं अविश्वासाने पाहिलं आधी पण नंतर हरखला…

म्हटला आपल्याला बडीशेप लागते. (बडीशेपच्या स्वादाची ही देशी दारु असते)

ओके, मला स्वस्त कुठं मिळाली तर आणेन मी तुझ्यासाठी… त्याच्या डोळ्यांत अजुनही अविश्वासच होता….

त्याच्या “आवडीचे” आणखी बरेच विषय बोलल्यावर तो मोकळा झाला.

म्हटलं राजु, तुझं गाव कोणतं रे ?
मी सालप्याचा …

सालप्याचा ? मी शक्य तितकं आनंदी होत, आश्चर्यचकित झाल्याचा अभिनय केला, आणि दिलं ठोकुन… येड्या माज्याच गावचा तु….

तो ही उडाला, म्हणाला खरं सांगताव काय ?

आता खरंतर हे गाव माझ्या आख्ख्या आयुष्यात मी पहिल्यांदाच ऐकत होतो…

मग येड्या, सालप्याच्या पुढचं गाव माझं… दुसरी थाप… आता त्याने गावाचं नाव विचारु नये म्हणुन मी मनोमन प्रार्थना करु लागलो पण तो प्रश्न त्यानेच सोडवला…

म्हंजे, तुमी काचुरीचं ?

मंग येड्या, मला वाटलंच होतं मला, म्हणुनच आज तुला विचारलं…

पण पुन्हा साशंक होत विचारलं, काचुरीत कुटं राहताव न्येमकं ?

म्हटलं, मंदिर नाय का आमच्या गावातलं, तीथनं पुढल्या अंगाला जावुन मोटं झाड लागतंय त्याच्या मागची गल्ली ना रे…!

मी खेड्यातला असल्यामुळे गावातल्या वहिवाटी आणि रितीभाती माहिती असल्याचा फायदा …!

त्याला ते पटलं, आता तो उठला… आणि प्रेमानं माझा हात हातात घेतला…. मंग तुमी कैल्याला वळकतंच आसणार ?

आता मागं फिरण्यात अर्थच नव्हता, पडलेल्या आवाजात नजर चुकवत हो म्हणालो….

कैल्या माजा जिगरी दोस्त…..

होय का ? मी आवंढा गिळत बळंबळंच बोललो….

हा कैल्या आता जर इथं आला तर दोघं मिळुन माझी वाट लावणार ….. मी चांगलाच अडकलोय याची मला जाणिव झाली…. मी बॅग घेवुन सटकायची तयारी केली…

पण तुमी मला कधी दिसला नाय वो काचुरीत ? त्याचा रास्त प्रश्न….मी धीर करुन म्हटलं, आरे मी शिकायला ल्हानपणीच घर सोडलं ना…

आयला खरंच की, म्हणत त्यानं हसत टाळी दिली…

आणि आमचं आता तिथं कुणी नाही, घरदार विकुन पुण्याला आलो, आमाला आता तीथं कुणीच वळखत नाही…. पुढचे सर्व प्रश्न टाळण्यासाठी मी एका दमात सांगुन टाकलं ….

मी जाम टरकलो होतो आणि हा बाबा भरभरुन बोलत होता…

गाव लहानपणीच सोडलं तर कैल्या कसा वळकीचा तुमच्या? हा सुद्धा योग्यच प्रश्न… आणि माझ्याकडे उत्तर नाही…. आता काय उत्तर द्यावं याचा विचारच करत असतांना, पुढचा प्रश्न…. आत्ता कुठंय त्यो माहित हाय का ?

मी इकडेतिकडे पहात घाबरत विचारलं…. कुठंय ?

पडलेल्या चेह-यानं म्हणाला, येरवडा जेलात, मर्डरच्या गुन्ह्यात जनमठेप झाली त्येला…. नेमका मी त्या दिशी नव्हतो, नायतर आज मी बी आत आस्तो….

आता हरखण्याची पाळी माझी होती…. चला म्हणजे कैल्या या राजुला भेटणार नाही…. माझ्या सगळ्या थापा पचणार…..

एक बॉल आणि पाच रन जिंकायला हवेत आणि शेवटच्या बॉलवर षटकार बसावा तसं माझं झालं….

माझ्यातल्या आणि राजुमधली भिंत आता गळुन पडली…. मला त्रास देणं सोडलंच उलट कामातही ब-याच वेळा तो मदत करु लागला….

माझा त्रास कायमचा गेला म्हणुन मी खुष होतो…. हा पठ्ठ्या मनोभावे मैत्री निभवायचा. ब-याच वेळा बडीशेपचा आग्रह पण व्हायचा ….माझ्या शब्दाखातर भिक्षेक-यांना त्रास देणंही त्याने कमी जरुर केलं पण त्यांच्या कमाईतला हिस्सा तो घेतच होता…..

मी धर्मसंकटात सापडलो, हप्ता घेणं थांबवलं तर राजु गुन्हेगारीचा दुसरा मार्ग शोधणार, नाही थांबवलं तर भिक्षेक-यांना राजुचा त्रास आहेच….काय करावं काही सुचेना….

यातुन एकच मार्ग होता- राजुलाच कामाला लावायचं…. एव्हाना राजु माझा जिगरी दोस्त झाला होता, हप्ता घेणं सोडुन त्याने माझी प्रत्येक गोष्ट ऐकली…. तरीही काम कर म्हटल्यावर तो करेलच यावर माझा विश्वास नव्हता….!

याला कामाला लावणे हे आता नवीन शिवधनुष्य माझ्यासाठी….!!!

एकदा रस्त्त्यात भांग पाडत असताना मला एक आयडीया सुचली…. म्हटलं राजु, एक सांगु ? तु दिसायला खुप देखणा आहेस गड्या…. तुला जर कुणी बघीतला ना, कुणीपण पिक्चर मध्ये घेईल यार…. तुला माहित आहे का … मिथुन, रजनीकांत हे तुझ्यागतच होते…. तु थोडा नीट राहिलास तर …?

त्याचे डोळे चमकले ….त्याला मी खुप मोठं (कदाचीत खोटं) स्वप्न दाखवत होतो….मला माहिती आहे. पण यात त्याचंच भलं होणार होतं….

यानंतर तो खरंच चांगला रहायला लागला आहे त्या परिस्थितीत …..

मी म्हटलं हप्ता मागुन दारु आणि जेवण सुद्धा भागत नाही… चांगली कपडे येणार कशी ? त्यापेक्षा थोडं काम कर…. यानंतर मी 5-6 व्यवसाय त्याला सुचवले…..

शेवटी चहा विकायचा धंदा फिरुन करायचा हे ठरलं… आम्ही दोघे गाडीवर गेलो – 12 तास गरम राहिल चहा असा मिल्टनचा थर्मास, चहासाठी उत्कृष्ट भांडं, चहाचे कप, गाळणी, दुध, साखर आणि चहा पावडर सगळं झालं… पण शेगडी / सिलेंडरमध्ये गाडी अडकली… हा फिरस्ता….सिलींडर ठेवणार कुठं….?

पुन्हा नवीन आयडीया …. म्हटलं भावा, हल्ली चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटन, चुलीवरचं जेवण फेमस आहे, आपण पण तीन दगड मांडुन चुलीवरच चहा करु आणि चुलीवरचा चहा फेमस करु पुण्यात आहेस कुठं…. !!!

तो टाळी देत गडगडुन हसला, मला म्हणाला, चालंल……

येक विचारु का ? सगळ्यात साथ दिली डॉक्टर, आता चहा विकायला मी येकटाच जावु काय ?

मी चपापलो, म्हटलं… म्हणजे …? मी तुझ्याबरोबर चहा विकायला यावं असं वाटतंय का तुला ?

म्हणाला, मग ? एवड्यावर मला आणला आणि  साथ सोडणार का ? दोस्त हाय ना ? कैल्यानं साथ सोडली, आता तुमी पण ?

मी विचार केला थोडावेळ, तो माझ्या डोळ्यात पहात होता, मी म्हटलं, राजु येईन मी तुझ्याबरोबर चहा सुद्धा विकायला….

त्याला भडभडुन आलं असावं… पायाशी झुकला; म्हणाला, फकस्त मन पायलं तुमचं, मी कसा घिवुन जाईन माज्या मोठ्या भावाला च्या ईकायला….

आयबाप गेले, कैल्या हुता त्योबी गेला, आसं वाटत हुतं की आपलं कोणंच न्हाई…. पन भेटला मला माजा भाउ, असं म्हणुन गळ्यात पडुन रडायला लागला…..मी फक्त पाठिवर हात फिरवुन थोपटत होतो त्याला…. मला तरी कुठं काही बोलता येत होतं….

ब-याच वेळानं शांत झाल्यावर म्हणाला, या जन्मात तरी तुमचं उपकार फिटत्याल का ?

म्हटलं हो… फिटत्याल की, उद्या तु मोठा माणुस झाल्यावर मला तुझ्या हातचा एक कप “चुलीवरचा च्या” फुकट पाजायचा……!!!

 

डॉ. अभिजीत सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स ( संपर्क क्रमांक : 9822267357)
डॉ. अभिजीत सोनवणे  
Doctor for Beggars

(डॉ. अभिजित सोनवणे (बीएएमएस) हे मुळचे सातारा जिल्ह्यातले. सध्या पुणे येथे शिवाजीनगर गावठा भागात त्यांचे छोटेसे क्लिनिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून काम करतात. सकाळचे काही तास भिकाऱ्यांवर मोफत उपचार ते करतात. त्या कामी त्यांची डॉक्टर पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा त्यांना मदत करतात. माझ्या लहानपणी भिकाऱ्यांनी, गरिबांनी माझ्यावर उपकार करून ठेवले आहेत, त्याची परतफेड आता या सेवेतून करतोय असे ते सांगतात. पुण्यातील वेगवेगळ्या मंदिर, मशीदीबाहेर ठराविक वारी ते जाऊन भिकाऱ्यांवर उपचार करतात. अनेक भिकाऱ्यांना त्यांनी भिक मागण्यापासून परावृत्त केले आहे. काही भिकारी फुलांचा किंवा असेच छोटे व्यवसाय आता करत आहेत. त्यासाठीचे छोटेसे भांडवलही डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून दिले आहे. असे हे अवलिया डॉक्टर त्यांचा अनुभव ब्लॉगद्वारे शब्दबद्धही करत आहेत. त्यांचे ते अनुभव ब्लॉगरूपाने आता देशदूतच्या वाचकांसाठी  नियमितपणे देत आहेत.)

LEAVE A REPLY

*