Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या सार्वमत

अयोध्या अन् शिर्डी दिव्यांनी लखलखले

Share

लखनऊ – संपूर्ण देशभरात आज दिवाळी आनंद, उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामनगरी येथे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलीत करून एक नवा विक्रम रचण्यात आला. या दीप प्रज्वलनासाठी मोठ्या प्रमाणात येथे राम भक्त उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. दीप प्रज्वलन केल्यामुळे रामाची नगरी प्रकाशमय झाली होती. भारताच्या कानाकोपर्‍यातून येथे राम भक्त हजर होते. यावेळी राम भक्त समितीकडून श्रीराम आणि रामायणाचे 11 प्रसंग प्रस्तुत करण्यात आले. रामाचीनगरी येथे एकूण पाच लाख 51 हजार दीप प्रज्वलन केले होते. तसेच इतर दीड लाख दीप मठ आणि मंदीर येथे लावण्यात आले होते. रामाच्या परंपरेवर सर्वांना गर्व असला पाहिजे. मोदी सरकारमध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांचा विकास होत आहे. यापूर्वीचे सरकार अयोध्येच्या नावाखाली घाबरत होते. पण माझ्या कार्यकाळात मी अनेकदा येथे आलो, असं यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी 226 कोटींच्या परियोजनांचे लोकार्पण केले. तसेच मोठ्या प्रमाणात येथे लोक दीपोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

शिर्डी शहर प्रतिनिधी )- साईबाबा संस्थानच्यावतीने दीपावलीनिमित्ताने लक्ष्मीपूजनाला साईबाबांच्या खजीन्यातील अलंकारांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली असून साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे तसेच हजारो दिव्यांच्या लखलखाटाने लेंडी बागेसह मंदिर परिसर तेजोमय झाला असल्याचे चित्र बघायला मिळाले.  

दरम्यान साईबाबा संस्थानच्या वतीने वर्षभरात साजरे करण्यात येणार्‍या प्रमुख उत्सवात दीपावली हा उत्सवही मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दीपावलीला साईबाबांनी पाण्यावर दिवे पेटवून संपूर्ण जगाला चमत्कार दाखवून दिला असल्याचे चरित्रात वर्णन आहे. दरम्यान या फकिराच्या घरचेलक्ष्मीपूजनाच्या या आगळ्यावेगळ्या सणाला राज्यातूनच नव्हे तर जगभरातून भाविक साईदरबारी हजेरी लावतात. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते साईबाबांच्या सोन्या चांदीच्या अलंकाराची तसेच खतावनीची विधिवत पूजा अर्चा केली. समाधी मंदिरासमोर पुरोहितांकडून मंत्रोपचार करून लक्ष्मीपूजन करण्यात आले. ग्रामस्थ व भाविक यांचेकडील धनाचेहि पूजन करण्यात आले. यावेळी सदर पूजा बघण्यासाठी ग्रामस्थांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांनीही द्वारकामाईसमोर जावून फटाक्यांची आतिषबाजी करीत साईबाबांच्या समवेत दीपावली उत्सव साजरा केला. यावेळी लेंडीबागेत दिवे पेटविण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. हजारो दिवे पेटवून भाविकांनी आपली श्रद्धा साईबाबांच्या प्रती व्यक्त करून साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिराला आकर्षक फुलांची तसेच विद्युत रोषणाई केल्याने व दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसर उजाळून निघाला होता.  दरम्यान, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तावर साईनिर्माणच्या वतीने साई मंदिरास 1 लाख 32 हजार 316 फुलांच्या सजावटीची संकल्पपूर्ती करण्यात आली.

 

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!