Monday, April 29, 2024
HomeUncategorizedबहीण करते यमराजाची पूजा

बहीण करते यमराजाची पूजा

स्वाती भाऊसाहेब पुरी

बहीण – भाऊ हे नमुने जन्मालाच यावे लागतात. पोतंभर पैसे घेऊन बाजारात गेलात तरी दुकानात हे नग…. नगाने मिळायचे नाहीत. प्रेम, जिव्हाळा, हेवा, स्पर्धा, काळजी असे सगळे भाव या एका नात्यात सामावलेले असतात. थोडक्यात हे नातं अगदी पाणीपुरी सारखं असतं. भांडणाचा तिखटपणा, चेष्टेचा आंबटपणा, प्रेमाचा गोडवा, काळजीचं मीठ, कुरकुरीत खिल्लाडपणा असं सगळं ह्यात असतं. पण ह्यात न कडवटपणाला मात्र जागा नसते.

- Advertisement -

हिंदू धर्मियांचा सर्वांत महत्त्वाचा व सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. त्यातीलच येणारा भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. यालाच यमद्वितिया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण नमुना हिच्या घरी जेवायला जातो व नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो, म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्यावे. अशी एक पौराणिक कथा आहे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस असतो. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे, म्हणून या दिवशी प्रत्येक बहीण यमराजाची पूजा व मनोभावे प्रार्थना करते.

असे म्हणतात की, या दिवशी स्रियांमध्ये देवीत्व जागृत होते. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने, तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो. या दिवशी बहिणीने भावाला तेल, उटणे लावून अंघोळ घालावी. भावाच्या आवडीचे पदार्थ बनवून खाऊ घालावेत. बहिणीने टिळा लावून, त्यावर तांदळाच्या अक्षदा लावाव्यात. त्यानंतर ताटातील पैसा, सुपारी, सोने भावाच्या कपाळाला लावून मनोभावे औक्षण करावे व शेवटी आरती ओवाळून त्याच्या चिरंजीव आयुष्याची मागणी करावी. कपाळावर लावलेला टिळा बहिणीच्या नि:स्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिने किंवा एखादी भेटवस्तू बहिणीला ओवाळणी म्हणून टाकत असतो. ज्या बहिणींना जवळचा किंवा दूरचा भाऊ नसतो, त्यांनी चांदोबास ओवाळण्याची पध्दत आहे.

बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये. अशी ती देवाजवळ प्रार्थना करते. या दिवशी 14 नावांनी तर्पण करण्याची पध्दत आहे व यमाला दीपदान देखील करतात. अपमृत्यू निवारणासाठी ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पण करिष्ये’ या मंत्रांचा वारंवार उच्चार करतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात.

भाऊबीज म्हणजे आई-वडील, भाऊ-वहिनी, भाचे मंडळी यांच्यासाठी जणूकाही एक पर्वणीच असते. जसं पोत भर पैशांत भाऊ- बहीण विकत मिळत नाहीत. तसे ते तीळभर अभिमानाने मात्र कायमचे दूर होऊ शकतात. लहानपणी आईने कान पिळला की, आपोआप शहाणपण यायचं आणि भांडण मिटायचं. पण आई-बाप काही जन्मभर पुरत नाहित आणि भाऊ-बहीण काही विकत मिळत नाहीत.

मो. नं. -9421701087

- Advertisment -

ताज्या बातम्या