राघू आणि मैना

राघू आणि मैना

प्रा. सुभाष शेलार

एक होता राघू,

एक होती मैना.

राघू बसला या फांदीवर,

मैना बसली त्या फांदीवर.

सर सर सर सर पडला पाउस,

राघूला आली खेळायची हौस.

‘मैनाताई, मैनाताई,

चलता का अमराईत?

पाउस पडतो धो धो,

आपण खेळू खो खो.’

‘नाहीरे बाबा, राघू दादा,

मला नाही आवडत खेळायला सदा.’

‘चलग ताई, रडूबाई,

आपण फार खेळायचे नाही.

खेळून घेऊ,न्हाऊन घेऊ,

मग रानात चरायला जाऊ.’

‘हो रे बाबा, आलेच आता,

तुझी माझ्यावर फारच सत्ता.’

राघू -मैना निघाले,

तळ्यावर येवून थबकले.

पाय बुडविले, चोच धुतली,

बुडी मारली, पिसे धुतली.

राघु-मैना त्यातच रमली.

पाउस थकला,

उन पसरले.

फडफड करुनी, पंख पसरले.

रघुला मग भूख लागली.

राघुदादा निरखून पाही,

जवळपासतर काहीच नाही.

‘मैनाताई,मैनाताई,

येथे आता थांबायचे नाही,

दोघेमिळून जेवायचे,

पोटभर पेरू खायचे.

पेरुच मनात भरले,

दुसरे नाही खायचे!’

‘जिकडे तिकडे हिरवेगार,

तू बाबा हट्टी फार,

आंबे खाऊ, चीकू खाऊ,

पेरूची बाग आहे लांब.

पेरुसाठी थोडे थांब.’

‘नाही ग ताई, मैना ताई,

खाईनतर पेरुच खाईन!’

दोघांनी मग पंख पसरले,

भर भर भर भर उडू लागले.

आले दोघे पेरूच्या बनात,

पेरू ठसले राघूच्या मनात.

अहाहा! पेरुच पेरू!

लहान पेरू, मोठे पेरू,

कसे खाऊ? किती खाऊ?

पोट गच्च भरून घेऊ!

राघू फिरला झाड झाड,

पेरू तोडले खाड खाड!

मैनेचे पटकन आटोपले,

तिने राघूला हटकले.

‘राघू दादा, राघू दादा,

वेळ झाली, आटोप आता.’

राघू दादा बोलेना,

हालेना कि चालेना.

खूप खूप खाल्ले,

त्याने पोट फुगले.

तेथेच लोळू लागले.

मैनाताई घाबरल्या,

राघू जवळ बसल्या,

पोट चोळू लागल्या.

राघू मग बोलू लागला,

‘मैनाताई,मैनाताई,

पेरू छान लागले,

हावऱ्यासारखे खाल्ले,

काहीतरी कर बाई,

नाहीतर मी मारून जाईन.’

मैना गेली कावळ्याकडे,

‘कावळेदादा, कावळेदादा,

राघूचे पोट फुगले बघा,

पेरू खाऊन झाली बाधा.’

‘मला काही सांगू नका,

माझा वेळ जातोय फुका.

बोलतो कसा मिठू,मिठू!

आठव म्हणव आता विठू!’

समोर दिसले मोरू काका,

‘मोरू काका,मोरू काका,

तुम्ही थोडे थांबता का?

फुगले पोट राघूचे,

आता काय करायचे?’

मोरू काका थांबले,

ऐटीत उभे राहिले,

‘मैनाताई,मैनाताई,

मला आहे फार घाई,

मला येणे जमायचे नाही.’

मैनानाताई निराश झाली,

चिमणीकडे आली.

‘घरी आहेत का आमचे भाऊ?

फुगले राघू काय लावू?’

‘मी बाई काय सांगू?

असा कसा ग तुझा भाऊ?

बकाबका खाल्ले,

म्हणून पोट फुगले.’

मैना बिचारी वाट पाही,

चिमणाकाही आला नाही.

मैना तेथून निघाली.

मनीमाऊला भेटली.

‘मनीमाऊ,मनीमाऊ,

आजारी आहे माझा भाऊ.

इलाज काही करायचा,

नाहीतर तो मरायचा.’

म्याव, म्याव, म्याव, म्याव,

मनीमाऊ गुरकली,

माघारी फिरली,

मैनेवरच झडप घातली,

मैना तेथून निसटली.

नदीत बसला बगळा

मासा गिळला सगळा.

मैना त्याला भेटली,

राघूची गोष्ट सांगितली.

‘जाते कि नाही इथून आता,

नाहीतर देईन दोन लाता.’

मैना खूप खूप हिंडली,

फिर फिर फिरली,

भेट भेट भेटली,

उडून उडून थकली,

माघारी फिरली.

इकडे राघोबा फुगला,

मेल्या सारखा पडला,

राघूदादा बोलेना,

हलेना कि चालेना.

तिकडून आला साधू,

त्याने केली जादू,

झाडाचे पान पीळले,

रघूने ते गिळले,

पेरू झाले फस्त,

राघू झाला मस्त.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com