माय

माय

माय वाटे अन्नपुर्णा

जेव्हा भाजते भाकरी

माऊलीच्या हाताखाली

दैव करते चाकरी ॥१॥

माय गंगा चंद्रभागा

सारे तिर्थ चरणाशी

माय शितल निर्मळ

माय वाटते संतोषी ॥२॥

माय थोर जगतात

काय सांगावी महती

धडे ज्ञानाचे देताना

माय वाटे सरस्वती ॥३॥

माय महामाया माझी

घ्यावे चाळुनी पुराणं

माय ग्रंथराज गीता

माय ईश्वरी कुराणं ॥४॥

वाहे नेत्रात करूणा

माय त्रिपुरा सुंदरी

सारे विश्व सामावले

माझ्या मायेच्या अंतरी ॥५॥

कैक पुजले देव्हारे

कुणी पावलचं नाही

साऱ्या देवांपेक्षा श्रेष्ठ

माझी जन्मदात्री आई ॥६॥

जरी एवढं सांगुनी

उमगले न कुणाले

माय असतेया काय

विचारावे अनाथाले ॥७॥

सौरभ हिरामण आहेर, तिसगाव, नाशिक

9834347833

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com