जुनं ते सोनं..

जुनं ते सोनं..

घरात माझ्या सामान आहे ठेवणीतले

देतात उजाळा वेळ प्रसंगी आठवणीने ||

दूध दुभत्याचे कपाट कडी कोयंड्याचे,

दूध दही लोणी तूप आजीच्या जिव्हाळ्याचे ||

लाकडी खुर्चीत वडील ऐटीत बसायचे,

टेबलावर पुढ्यात डस्टर ,खडू, छडी, पुस्तक असायचे ||

संगतीला रेडिओ टेबल फॅन टेबल लॅम्प ही खुलायचे 

अवांतर वाचन लेखन बाबांचे चालायचे ||

भेट म्हणून दिलेली फणेरपेटी आईला आजीने,

सौभाग्य लेणं तिचे त्यात एकत्र नांदायचे ||

आजोबांच लाकडी कपाट साहित्याने भरायचे,

 स्वच्छ काचेच्या दारातून पुस्तक हळूच डोकवायचे ||

 चौसोपी अंगणात झुले झोपाळा लाकडाचा,

देवांचे देवघर सुद्धा असे शिसवाचा ||

पण मला बाई आवडते आराम खुर्ची भारी,

दोन रूळ बसवलेली कापडी, झुलते जशी अंबारी ||

तिच्यात बसून अनेकदा परवचा, पाढे ,कविता तोंडपाठ होई,

आलाच कंटाळा तर सुखेनैव निद्राही घेई ||

आजही या वस्तू दिमाखात मिरवतात घरात,

आठवणीचा खजिना खुल जा सिम सिम म्हणत उघडतो मनात ||

पुराणातल्या वस्तू तरी अडगळ वाटत नाही,

वाड वडिलांच्या मायेची ऊब यातच मिळत राही.....!

- वि.  य. पाठक, अहमदनगर              

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com