जरी काढले होते तेव्हा हसून फोटो

जरी काढले होते तेव्हा हसून फोटो

जरी काढले होते तेव्हा हसून फोटो

भरून आले डोळे आता बघून फोटो

फोटोमधल्या व्यक्ती आता बदलुन गेल्या

होते फोटो तसेच आहे अजून फोटो

बट ही गाली ,तिळ ही ओठी, घारे डोळे

आहे इतके,नकोस काढू,नटून फोटो

इंस्टा,एफबीमधले फोटो फिके वाटले

असा ठेवला गादीखाली लपून फोटो

त्याच्या सोबत फोटो दिसले, लाइक केले

तुझे पाहिले तेव्हा मी ते जळून फोटो

त्या नंतर मग किती तुला पस्तावा झाला

केले होते डिलीट सारे चिडून फोटो

समोर असल्यावरती आपण बोलून घ्यावे

काय फायदा गेल्यावरती असून फ़ोटो

नंतर त्या फोटोची होते छान आठवण

म्हणून आपण ठेवावे ते जपून फोटो

ती गेल्यावर वळली नाही हृदयामध्ये

गोष्ट वेगळी काढायाची वळून फोटो

समोर आहे सुंदर क्षण तो जगून घेणा

काढत बसला कशास वेड्या दुरून फोटो

तुझी आठवण मिठीत घेऊन तिथेच बसलो

जिथे काढले होते आपण बसून फोटो

फोटोमधल्या मुखड्यावरती हात फिरवला

आणि म्हणालो सहज घेतला पुसून फोटो

प्रेमाचे तू फिल्टर वापर नात्यामध्ये

फुलून येते नाते ,येतो खुलून फोटो

पैसा अडका नाती गोती सारे गेले

काय राहिले मागे अपुले मरून....फोटो

एक कोवळा पासपोर्ट फोटो आठवतो

हृदयामध्ये बसलाया तो रुतून फोटो

गझलकार - आकाश कंकाळ

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com