आरती, बकऱ्या आणि शाळा

आरती, बकऱ्या आणि शाळा

डॉ.कुणाल पवार

साधारणपणे सोळाव्या शतकात युरोप मधील इटालियन चित्रप्रबोधनकारलिओनार्दोदाविंची या चित्रकाराने मोनालिसाचे अजरामर सुंदर पोर्ट्रेट तयार केले. सतत युद्ध व अशांतीच्या छायेत असणार्‍या काळात पहिल्यांदा काहीतरी गूढ सुंदर व स्मित हास्य दर्शवणारी प्रसन्न भावमुद्रा जगात चित्रित झाली होती. मोनालिसाच्या चित्रावर आजपर्यंत अनेक संशोधक व अभ्यासकांनी आपले मत मांडले यात सर्वात जास्त चर्चा झाली. ती तिच्या सुंदर स्मित हास्यची. आपण प्रत्यक्ष युरोपात जाऊन ते चित्र पाहू शकत नाही. पण, तशीच सुंदर गूढ स्माईल हल्ली आमच्या नशिबी आहे आणि रोज पाहायलाही मिळतेय. ती म्हणजे आमच्या आरतीची.

होय, ही तीच आरती जी झोपडी अन् गोठा कम घरात राहते. आपण तिच्या घरी पोहोचलो की ती जाम खुश होते. मग तिची लगबग सुरु होते शाळेचा ड्रेस घालायची. अर्थातच त्यांच्या घरात खाली चकचकीत स्टाईल नाही, फिनाईलने फरशी पुसण्याचा संबंधच नाही. कारण, खाली मातीच आहे. नुसती माती नाही त्यावर बकर्‍यांच्या लेंड्या, मूत्र वगैरे विखुरलेले वाहिलेले असते. कारण बकर्‍या आणि आरती एकत्रच राहतात. आणि म्हणून साहजिकच आरतीचा ड्रेस धुवूनही मळकटलेला असतो. कारण, स्वच्छ धुवायला साबण किंवा सर्फ एक्सल सारखे पावडर नसते. पण त्याने आमच्या ह्या मोनालिसाला कवडीचाही फरक पडत नाही.

ती तिचं सुंदर स्मित सहजच उधळत असते अगदी चौफेर. तिच्याकडे डोक्याला लावण्यासाठी बजाज, जॅस्मिन किंवा जॉन्सन जॉन्सनचे तेल नक्कीच नसते. पण, गावातल्या टपरीवरून दहा पंधरा रुपयात छटाकभर आणलेले सुटे अशुद्ध तेलही ती काळजीपूर्वक आनंदाने लावते. आणि ती केसांना तेल लावून शाळेत येते. याचा मात्र मनोमन मोठा अभिमान बाळगते. कारण, डोक्याला तेल लावायला मिळणे ही सुद्धा तिच्यासाठी तिला खूप मोठी गोष्ट वाटत असावी.

आरतीला अजूनही मोकळं व स्पष्टपणे बोलता येत नाही. मी मायेने प्रेमाने आणि विश्वासाने जवळ घेत जेव्हा एकच गोष्ट तिला चारवेळा विचारतो, तेव्हा कुठं मलाही तिची अडचण कळते. खरं म्हणजे तिचा हा आवाज दारिद्र्य, परिस्थिती आणि तिचं कौटुंबिक अस्थिर वातावरण यात दाबला गेला आहे. तो येईलही वर हळूहळू. पण, वेळ लागेल. एक मात्र नक्की ती जेव्हा जेव्हा स्मित हास्य करते, मला त्या युरोपियन बाईचे म्हणजेच मोनालिसाचे स्मितही आरतीच्या स्मित हास्यापुढे फिके वाटते.

आधुनिक संशोधनानुसार पेंटिंग किंवा फोटोंचे विश्लेषण करणारे सॉफ्टवेर वापरून जेव्हा मोनालिसाच्या चित्राचे विश्लेषण करण्यात आले तेव्हा ती 83 टक्के आनंदी, 9 टक्के नाराज व 6 टक्के घाबरलेली वाटते असा निष्कर्ष आहे. पण आमची आरती मात्र 100 टक्के आनंदी वाटते. अत्यंत विपरीत आणि प्रतिकूल कौटुंबिक वातावरणातून येऊन, आमच्या झेड पीच्या शाळेत शिकणारी आमची आरती मोनालिसा एवढी नक्कीच गाजणार नाही. पण, तिचं आणि कुटुंबाच्या भविष्याला नक्कीच पुढे बदलून टाकेल, इतका आत्मविश्वास तिच्या गोड नाजूक हास्यात मला जाणवतो. मला मनोमन इतकंच फील होतं की मआरती तुझं हे सुंदर हास्य नक्कीच त्या निर्जीव काल्पनिक मोनालिसालाच्या स्मित हास्यालाही भविष्यात असच लाजवणारं ठरवेल. काय सांगावं, या आरतीतही एखाद देवरुप असावं. अदृष्य. जे वाट पहात असावं योग्य वेळेची. संधीची. परमेश्वर आरतीला ती संधी देवो.

- डॉ.कुणाल मुरलीधर पवार (अमळनेर)

- 9403589970

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com