टक्कर...!

टक्कर...!

सातेगावच्या बाहेर असलेले मैदान गर्दीने कसे फुलून गेले होत. जिकडे नजर टाकावी तिकडे माणसं, बाया, मुले यांची धावपळ सुरू होती. सर्वत्र गोंगाट होता कारण आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक आलेले होते. तेवढेच महत्त्वाचे कारण पण होते एवढी गर्दी जमण्यासाठी. सातेगावची अतिशय प्रसिद्ध असलेली जत्रा होती. यावर्षी काहीतरी वेगळा कार्यक्रम ठेवायचा असे सगळ्यांनी एकमताने ठरवले होते. सगळ्यांच्या मनात रेड्यांची टक्कर ठेवावी, असे होते. त्याप्रमाणे आजूबाजूच्या गावांत तशी जाहिरात करण्यात आली. पोस्टर्स, फ्लेक्स छापली गेली. बक्षिसांची भली मोठी घोषणा करण्यात आली. रेड्यांच्या टकरीच्या आकर्षणामुळे सर्वांमध्ये उत्साह आणि लगबग दिसत होती. कधी एकदा टकरीला प्रारंभ होईल याची सगळेजण आतूरतेने वाट बघत होते.

बघता बघता टकरीचा दिवस उजाडला. गावातले, परगावातले, जवळपासचे अनेक लोक तसेच रेड्याचे मालक आणि आणि त्यांचे समर्थक आपापल्या रेड्यांना सजवून झुंजीसाठी, टकरीसाठी घेऊन येत होते. लोकांची उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती. वातावरण सर्वत्र गुलालमय आणि ढोलताशांच्या आवाजाने निनादून गेले होते.

थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांच्या मोटारगाड्या धूळ उडवत आल्या. त्यांच्या स्वागतासाठी संयोजकांची एकच लगबग सुरू झाली. प्रमुख पाहुणे रुबाबातच त्यांच्या भल्या मोठ्या मोटारगाडीतून खाली उतरले. स्वागत समारंभ आटोपल्यावर पाहुण्यांनी लिहून आणलेले आपले भाषण अस्सल ग्रामीण शैलीत वाचून दाखवले.

टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात रेड्यांच्या टकरींना सुरुवात करण्याची रितसर घोषणा झाली आणि आयोजित स्पर्धेचे नारळ फोडून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले गेले. पहिली लढत लावण्यात आली. लाऊडस्पीकरवर धावते वर्णन चालू झाले. हा अमक्याचा रेडा, तो तमक्याचा रेडा. रेड्याच्या मालकाचे नाव आणि सोबत रेड्याचे आणि त्यांच्या मालकांविषयी माहिती सांगितली जात होती. दुष्काळग्रस्त भाग असूनही मालकाने रेडा कसा चांगला पोसला आहे, मालकाने रेड्यावर किती माया केली अशा शब्दांमध्ये त्यांचे कौतुक केले जात होते. रेड्याचे आणि मालकाचे कौतुक ऐकून उपस्थितांमध्ये प्रत्येकाला त्याक्षणी असे वाटले की, आपणदेखील असाच रेडा पोसावयास हवा होता.

रेड्यांच्या टकरी आता चांगल्याच रंगात येऊ लागल्या होत्या. थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या आरडाओरडीमुळे एक रेडा बिथरला आणि त्याने माघार घेऊन एकदम पळच काढला. त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी रेडा आपोआपच विजयी ठरला. विजयी रेड्याच्या मालकाने तर अत्यानंदाने रेड्यापेक्षाही जास्त उंच उडी मारली. स्पर्धेच्या आयोजकांनी विजयी रेडा आणि त्याच्या मालकाचा बक्षीस देऊन सन्मानित केले. पळून गेलेल्या रेड्याच्या मालकाला छोटसे बक्षीस देऊन त्याच्या चेहर्‍यावरील रडके भाव कमी करण्याचा चांगला प्रयत्न केला.

आता गर्दी वाढू लागली होती. सर्वांचे लक्ष आता दुसर्‍या लढतीकडे लागले. दुसर्‍या दोन्ही रेड्यांची टक्कर जोरात सुरू झाली. वातावरणात सर्वत्र धूळ आणि गोंगाटच होता. कोण काय बोलतंय काहीच कळत नव्हते. दोन्ही रेडे एकमेकांना ढकलत जवळच असलेल्या पाण्याच्या छोट्याशा डबक्यात जाऊन चढाई करू लागले. दोन्ही रेडे पूर्णपणे चिखलाने माखलेले होते. अशी आगळीवेगळी टक्कर बघायला लोकांना पण मजा वाटायला लागली. थोड्याच वेळात दोन्ही रेडे डबक्यातून बाहेर येऊन दोन दिशांना पळायला लागले.

लोकांची चांगलीच करमणूक होत होती. फेटे म्हणा, मुंडासे म्हणा आकाशात उडवून जत्रेचा आणि स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेत होते. आता सूर्यदेव पण आपली ड्युटी संपवण्याच्या मूडमध्ये होते. त्यामुळे सगळयांनाच शिल्लक राहिलेल्या टकरीची उत्सुकता होती. लागलीच दोन दणकट पण अतिशय तुकतुकीत कांती असलेल्या रेड्यांची टक्कर सुरू झाली. टक्कर आता चांगलीच रंगतदार होईल, असे वाटत होते. तेवढ्यात दोन्ही रेडे टक्कर सोडून लोकांच्याच दिशेने सुसाट पळत सुटले. सर्वदूर एकच धावपळ, पळापळ सुरू झाली. कोणाच्या टोप्या, फेटे, पटके पडले. लहान मुले धडपडत होती, त्यांचे आई-बाप त्यांना डोक्यावर बसवून सुरक्षित ठिकाण शोधत होती. एवढ्या सगळ्या गोंधळात समालोचक आणि आयोजक कुठे पसार झाले हे कळलेच नाही. एकूण काय आनंदी आनंद होता.

थोड्या वेळाने वातावरण निवळले आणि लोक हळूहळू पुन्हा जमायला सुरुवात झाली. उरलेल्या टकरी आता लावायच्या की नाही याबाबत स्पर्धेच्या आयोजकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. बर्‍याच वादविवादानंतर राहिलेल्या टकरी लावण्याचा निर्णय घेतला गेला. झालेल्या गोंधळामुळे गर्दी कमी झाली होती. ज्यांना खरेच आवड होती ते थांबले. बाकीचे नसता डोक्याला ताप नको म्हणून निघून गेले. चहावाले, पान-तंबाखूचे विक्रेते, आईस्क्रीम विकणारे अधिक जास्त नुकसान व्हायला नको म्हणून त्यांनी केंव्हाच आपल्या दुकानाचा गाशा गुंडाळला होता.

पुन्हा रेड्यांची टक्कर सुरू झाली. उपस्थित प्रेक्षक आणि सर्व संबंधित जरा सावधपणेच टक्कर बघत होत. कारण रेडे कोणत्या क्षणी अंगावर धावून येतील याचा काही नेम नव्हता. त्यामुळे सगळेजण रेडे अंगावर धावून आले तर सुरक्षित जागी कसे पळता येईल याचा अंदाज घेऊन बसले होते. एकाएकी टक्कर सुरू असलेले दोन्ही रेडे उधळले आणि शेजारीच असलेल्या उसाच्या शेतात घुसले. दोन्ही रेड्यांचे मालक आणि आयोजक ती टक्कर सोडवता सोडवता चांगलेच बेजार झाले.

तोपर्यंत त्या शेतातल्या उभ्या उसाचे चांगलेच नुकसान झाले होते. त्या शेताचा मालक तावातावाने त्याची माणसे घेऊन भांडायला आला. गावतील काही प्रतिष्ठित मंडळी समजूत काढण्याचे प्रयत्न करू लागले, कारण नुकसान झालेल्या शेताचा मालक हादेखील स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये होता आणि आतापर्यंत झालेल्या सर्व टकरी बघत होता, आनंद घेत होता. यादरम्यान दोन्ही रेड्यांचे मालक आपल्या रेड्यांना घेऊन तिथून केंव्हाच निघून गेले होते. नुकसान झालेल्या शेताच्या मालकाची कशीतरी समजूत काढण्यात सर्वांना यश आले.

आता फक्त एक शेवटची टक्कर राहिली होती. नाईलाजानेच ती टक्कर लावली गेली. शेवटचे दोन्ही रेडे आधीच्या रेड्यांपेक्षा फारच ताकदवान आणि मजबूत होते आणि म्हणूनच ही टक्कर सर्वात शेवटी ठेवली होती. शेवटची टक्कर असल्यमुळे लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. हा कोणाचा रेडा, तो कोणाचा रेडा आणि त्या रेड्याचे मालक आणि या रेड्यांच्या टकरीवर किती बक्षीस आहे हे जाहीर करून ही टक्कर कशी निर्णायक ठरणार आहे, हेसुद्धा सांगण्यात आले.

दोन्ही रेडे अतिशय मजबूत असल्याने एकमेकांना जोरदार धडका देऊ लागले. पूर्ण ताकदीनिशी लढू लागले. कोणीच माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आता आयोजक, प्रेक्षक आणि दोन्ही रेड्यांच्या मालकांच्या चेहर्‍यावर आणि हो अगदी रेड्यांच्या चेहर्‍यावसुद्धा तणाव दिसत होता. परंतु माघार घ्यायला कोणीच तयार नव्हते. बघता बघता रेड्यांचे मालक आणि पाठीराखे यांच्यातच बाचाबाचीला सुरुवात झाली.

बाचाबाचीनंतर मारामारीला केंव्हा सुरुवात झाली कोणाला कळलेच नाही. प्रकरण वाढायला लागण्याची शक्यता दिसताच स्पर्धेच्या आयोजकांनी कशीबशी मध्यस्थी करून मारामारी थांबवली. पण इकडे रेड्यांची टक्कर मात्र संपता संपत नव्हती. काय करावे हे कुणाला लक्षात येत नव्हते. त्या दोन मस्तवाल आणि रंगात आलेल्या रेड्यांच्या टकरीमध्ये जाऊन टक्कर थांबवण्याचे धाडस त्या ठिकाणी हजर असलेल्या कोणतही नव्हते.

त्या स्पर्धेला अनेकजण आपापली वाहने घेऊन आले होते. कोणी जीप, ट्रक, मोटारसायकल अशी बरीच वाहने होती. त्यातच एका जीप ड्रायव्हरला एक युक्ती सुचली. तो पटकन आपल्या जीपजवळ गेला आणि जीप चालू केली. ती जीप घेऊन तो टक्कर देणार्‍या रेड्यांच्या अगदी जवळ गेला. तो काय करणार हे कोणालाच कळत नव्हते. त्याने आपली जीप बरोबर दोन्ही रेड्यांच्या जवळ आणली आणि जोराने वेग वाढवून त्यांच्या मध्ये घुसवली.

दोन्ही रेडे अचानकपणे झालेल्या हल्ल्याने बाजूला झाले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पळून गेले. रेड्यांच्या मालकांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी अथक प्रयत्न करून त्या रेड्यांना पकडले तेव्हा सगळ्या उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. आयोजकांनी त्या जीपचालकाच्या कार्याचे जाहीर कौतुक केले आणि शेवटची टक्कर बरोबरीत सुटली, असे घोषित केले.

आयोजकांनी बक्षिसाची रक्कम दोन्ही विजेत्यांंमध्ये बरोबरीत वाटून दिली. कुणाचीच चूक नसताना आपण विनाकारणच भांडत होतो या गोष्टीचा खेद संबंधितांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मात्र, शेवट गोड झाला या गोष्टीचे समाधान सर्वांना वाटले. पुढच्या वर्षीच्या जत्रेत काय कार्यक्रम ठेवायचा याची चर्चा सगळे करू लागले. पुन्हा कुठेही आणि कोणाच्याही टकरीचा कार्यक्रम असला तरी लोक मात्र आजही सातेगावच्या रेड्यांच्या टकरीची कथा रंगवून रंगवून सांगतात..

- श्रीपाद टेंबे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com