शेवटचा निरोप

शेवटचा निरोप

रोहित प्लीज जरा समजून घे रे, प्रियंका खूप तळमळीने सांगत होती. पण रोहित काही समजून घेत नव्हता. तो सारखा एकच बोलत होता. प्रियंका, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही गं. खर तर प्रियंकाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पण एकाने भावनाशील झाले तर दुसर्‍याने होऊ नये या तत्त्वाची होती ती. रोहित आणि प्रियंका एकाच महाविद्यालयातील एकाच वर्गात शिकत होते. दोघांचे आचार-विचार, आवडी-निवडी आणि स्वभाव मिळतेजुळते होते. शिक्षण चालू असतानाच त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. कालांतराने याच मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले...

दोघेही एकमेकांवर खूप खूप प्रेम करत होते. त्याचप्रमाणे अभ्यासातदेखील ते फार हुशार होते. त्यांचा एकही दिवस असा जायचा नाही की ते एकमेकांना भेटले नसतील. त्या दोघांनाही ही प्रेमभेट म्हणजे जीव की प्राण वाटत होती. एकमेकांना पुन्हा कधी भेटतो असेच त्या दोघांना नेहमी वाटत असायचे. तरीही त्यांनी त्यांच्या या नि:स्वार्थी आणि आदर्शवादी प्रेमाला कोणत्याच वाईट गोष्टींचे गालबोट लागू दिले नाही किंवा त्यांच्या प्रतिमेला समाजात इजा पोहोचू दिली नाही. रोहित आणि प्रियंकाचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते आणि तेवढ्याच पटीने विश्वासदेखील होता.

खूप विचार करून आणि धाडस निर्माण करून एक दिवस ते एकमताने दोघांच्या घरच्या मंडळींना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगतात. पण दोघांच्याही घरातून स्पष्ट नकार आलेला असतो. त्याचे मूळ कारण म्हणजे ते दोघे भिन्न समाजाचे असतात. पुढे काय करायचे आणि काय नाही? हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो? ते दोघेही या गोष्टींचा सारखा खूप विचार करून त्रस्त होतात आणि काही प्रमाणात का होईना दोघांच्याही मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. दोघेही लहानपणापासून आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्याने कुटुंबांचे संस्कार आणि त्यांच्या विचारांचे पालन आजवर यांनी केले होते. कुटुंबांच्या निर्णयाविरोधात जाणे हेदेखील त्या दोघांना अमान्य होते.

घरच्यांचा कठोर विरोध असतानाही आणि बंधन असतानाही एक दिवस ते दोघेही एकमेकांना भेटतात. एकमेकांमध्ये चर्चा करतात आणि शेवटी दोघेही लग्न न करण्याचा निर्णय घेतात. ही चर्चा चालू असताना प्रियंकाचा भाऊ त्या ठिकाणी हजर होतो. रोहित आणि तिच्या भावामध्ये गंभीर स्वरुपात बाचाबाची होऊन तिचा भाऊ तिला त्या ठिकाणावरून जबरदस्ती घेऊन जातो. रोहित शांत स्वभावाचा असल्याने आणि परिस्थितीचा गांभीर्याने विचार केल्यामुळे नि:शब्द राहतो आणि पुढील प्रसंगाला सामोरे जातो.

रोहित आणि प्रियंका दोघांच्याही घरी वर आणि वधू पाहण्यासाठी खूप घाई गडबड चाललेली असते. दोघांच्याही कुटुंबातील सर्व सदस्य आनंदाने आणि उत्साहाने लग्नकार्यासाठी पुढाकार घेत असतात. पण मात्र रोहित आणि प्रियंका यांच्या चेहर्‍यावर नेहमीच निराशा असते. ते दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणावरून विवाहस्थळासाठी नकार देत असतात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करतात.

वर्षांमागे वर्षे निघून जातात. रोहित आणि प्रियंका या दोघांचेही आयुष्य अर्थहीन झाल्यासारखे होते. याचे मुख्य कारण म्हणजे कितीही चांगले स्थळ त्यांच्यासाठी आले तरीही ते दोघे त्यास नकार देत होते आणि स्वतःच्या मर्जीविना ते कोणतेही निर्णय घेत नव्हते. रोहित आणि प्रियंका दोघेही सुशिक्षित आणि हुशार असल्याने त्यांनी त्यांचे शिक्षण पुढेदेखील चालूच ठेवले आणि आपल्या व्यावसायिक कार्यक्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले. वर्षांमागून अनेक वर्षे गेली. मात्र दोघेही अजूनही त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अजूनही ते दोघे एकमेकांना विसरलेले नव्हते व इच्छा असूनही भेटत नव्हते.

काही वर्षांनी प्रियंकाला पोटाचा कॅन्सर उद्भवतो. ती त्यावर उपचार करण्यासाठी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घेत असते आणि त्यावर औषधोपचार चालू ठेवते. पण मानसिक ताणतणाव जास्त वाढत असल्याने प्रियंकाची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत जाते. प्रियंकालादेखील या गोष्टीची आता जाणीव झालेली असते. तिचा आजार हा दिवसेंदिवस वाढत जात होता आणि तो सहजासहजी बरा होणारा नव्हता. दुसरीकडे एक दिवस रोहित त्याच्या कामासाठी त्याची कार घेऊन बाहेर प्रवासासाठी पडतो. नेहमीप्रमाणे रोहित आपल्या कारचा वेग मर्यादित ठेवतो. पण त्याच रस्त्यावरून जाणारा डंपर अचानकपणे रोहितच्या गाडीला ठोकतो. हा अपघात एवढा भयंकर असतो की रोहितची अवस्था फार गंभीर होते. रोहितला जवळच्याच एका दवाखान्यात दाखल केले जाते.

योगायोग म्हणावा की ईश्वरी इच्छा हेच कळणे अशक्य होते. रोहित ज्या दवाखान्याच्या बेडवर असतो त्याच्या शेजारच्या बेडवर प्रियंकाला ठेवलेले असते. एवढ्या वर्षांनी आपल्याच शेजारच्या बेडवर रोहितला आणि ते पण रक्तबंबाळ अवस्थेत पाहून प्रियंकाला मोठा शॉक बसतो. प्रियंकाची प्रकृतीदेखील फार गंभीर असल्याने तिची दृढ इच्छा असतानाही ती तिच्या बेडवरून उठून त्याला जाऊन भेटू शकत नव्हती किंवा ती आवाज देऊन बोलूही शकत नव्हती. कारण तिच्या शरीरातही आता त्राण उरलेला नव्हता. एवढ्यातच रोहितची प्रकृती फार चिंताजनक होते.

डॉक्टर आणि परिचारिका त्याचे प्राण वाचवण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत असतात. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना अपयश येते आणि रोहितची प्राणज्योत विझते. हा क्षण पाहून प्रियंकाची प्रकृतीदेखील गंभीर होते. तिच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहतात. तिच्या शरीरातील उरलेला त्राणही आता संपतो आणि तिचीदेखील प्राणज्योत त्याक्षणीच विझते. अंतिम क्षणाला हे दोघेही प्रेमीयुगुल भेटतात पण संवाद न होताच दोघेही आयुष्याचा शेवटचा निरोप घेतात.

दोघांनीही जरी आयुष्याचा निरोप घेतला असला तरीही ते आजही एकमेकांच्या जवळ असून एकमेकांना पाहत आहेत. सुमन व शेखरच्या नजरेतून. हो, हे एक सत्य होते की त्या दोघांची इच्छा होती देहदान करण्याची आणि तसे त्यांनी त्यापूर्वीच ठरवलेदेखील होते. सुमन व शेखर हे नेत्ररोपणसाठी दवाखान्यात आलेले असतात व त्यांना रोहित व प्रियंकाचे नेत्र दान स्वरुपात मिळतात. यामुळे त्या दोघांना एक नवीन दृष्टी मिळते. रोहित आणि प्रियंका यांच्या अमर प्रेमकहाणीची दुसरी इनिंग चालू होते.

दोघांनीही प्रेम केले

शेवटच्या क्षणापर्यंत,

मरूनही अमर राहिले

जरी झाला त्यांचा अंत.!

- भूषण सहदेव तांबे, मुंबई.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com