नोटबंदी

नोटबंदी

डॉ.मिलिंद विनायक बागुल

मजुरी करीत करीत आयुष्याची लढाई लढत असताना संतोष सतत संघर्षमय जीवन जगत होता. आपल्या जगण्याच्या लढाईत त्याच्या सोबतीला पहिल्यापासून तर उतारवयापर्यंत सखुबाईची साथ त्याला मिळत होती. आज सखुबाईंना आपल्या झोपडीला सारून पोतारून स्वच्छ आणि नीटनेटक केलेल होत.

खाटीवर बसल्या बसल्याच संतोष आपली दाढी खाजवत व्हता, मध्येच सखुबाईचा आवाज आला, जेवण करी घेता का? संतोष म्हणला, तू भी जेवती का? व्हय, पण थोड्या येळाने, सखुबाई बोलत होती मध्येच संतोष तिच्या सुरात सूर मिसळत म्हणला,मंग म्या बी तव्हाच बसंन ज्यावेळी तू बसशीन जेयाले सखुबाई लगेच उत्तरली,व्हय मंग आपण थोड्या येळाने दोघी बसू हे थोडसं काम करि घेते मंग आपण जी घिहू

सकुबाई आणि संतोषच्या कष्टाला फळ मिळालेलं नव्हतं, आपल्या संसार वेलीवर एखादं छानसं फुलपाखरू बसावं असं स्वप्न अनेकदा त्यांनी पाहिलं होतं परंतु निसर्गाने निर्माण केलेल्या परिस्थितीला ते सामोरे गेले होते. आज उतारवयात ते आपापल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देत होते आणि वाटचाल करीत होते.आव चला आता जी घिवू सखूबाईनं घरातून आरोळी मारत संतोषला जेवणासाठी बोलावलं सखुबाईन दोघांचबी ताट तयार केल संतोष झोपडीच्या दरवाजातून वाकून आत आला जेवायला बसला लागलीच म्हणला, माह्या ताटातल जरा कमी कर सखुबाई म्हणली, आव केवढक हाय घ्या जेवा आता नाय माले आता जेवणबी जात नाय बघ संतोष बोलत होता, जेवणाचाबी मले त्रास व्हतुया असं कसं म्हणता, आपल्याला तर जगाव लागल अन् जगण्यासाठी खाव त लागल सखुबाई आपल्या मनातलं बोलत होती संतोष म्हणला, व्हय तुह्य म्हणणं खरं हाय पण गेलबीत पाह्यज भकरितूनबी आता जीव उडी गेला, काय करावं काय समजत नाय

दोनचार घास खाऊन संतोष जेवणाच्या ताटाला सखुबाई कडे सरकवून झोपडी बाहेर असलेल्या आपल्या खाटेवर झाडाच्या सावलीत येऊन बसला रोज झाडाखाली सावलीत बसणं शेजार पाजारचे कुणी आले तर त्यांच्याशी गप्पा टप्पा करणे हा संतोषचा नित्यक्रम होता. त्यातून त्याला आपल्या भूतकाळातल्या गोष्टी आठवत स्वतःशीच कधीकधी बोलण्याची सवय होती त्यावरून सखुबाई त्याला बोलायची.

बाबा अहो, बाबा जेवण झालं का? काय करताय आजी कुठे गेल्या झोपडीला खूप चांगलं ठेवले बघा तुम्ही.

पलीकडच्या गल्लीतला रघुनाथ संतोष जवळ येऊन बोलत होता. संतोषन आपल्या बोलण्यातून रघुनाथला परिस्थिती लक्षात आणून दिली, अरे बाबा रघु दोन चार घास खायचे अन् राहिलेले दिस मोजत बसायचे आणि या झोपडीचं म्हणतोया ते समध माही सखू करते म्या धेल्याचं काम करत नाय अन् मह्यांन आता व्हत नाय. रघुनाथ म्हणला,अहो बाबा तुमच्या कष्टांची आम्हालाबी जाणीव आहे आमच्या गल्लीतली अनेक माणसं तुमच्या कष्टाचा आणि चांगल्या स्वभावाचं नाव काढतात. आयुष्यभराच्या तुमच्या कष्टाची आम्हा समद्यांना जाणीव आहे आणि बाबा असं वाटलं ना काय लागलं बिगलं तर मला सांगजा मी तुम्हास्नी मदत करीन. रघुनाथचे हे बोल ऐकून सखुबाईंनी ऐकले झोपडीतून बाहेर येत म्हणली, अरे दादा तू एवढा बोलला तेवढंबी लय उपकार झाल्यात बघ आमचं काय बरं वाईट झालं तर तुमच्यासारखं लई चांगलं माणसं हायित आपल्या गावात, दादा चहा घिसिन का थोडी रघुनाथ आजीला म्हणलं, सखूमाय म्या चहा घेत नाय तू राहते झोपडीत पण तुह्य मन खूप मोठ हाय लोक बिल्डिंगमध्ये राहतात आणि मोठमोठ्या माड्यांमध्ये राहतात अन् मन कसं अगदी कंजूष करून ठेवत्यात द्यायची दानत नसते मोठ्यांची.

आर दादा त्यांचं त्याईच्याजवळ आपल्याजवळ हेच भरपूर आहे माणुसकी शिवाय आणखी काय हाय, जाता येता तुम्ही दोन शब्द बोलत्यात, उभे राहत्यात याहून काय येगळं हाय माणसाचं माणसाशी माणसाने हेचं त केल पाहिजे तुम्ही जे करतात सखुबाई बोलत होती मध्येच संतोष म्हणला, अग ते चहा नाय घेत तर पाणी तरी दे त्यांनले रस्त्यान जाताना दरवेळी ते ख्याली खुशाली ईचारीत असतात सखुबाई झोपडीत गेली आणि ग्लासभर पाणी घेऊन आली. रघुनाथन पाणी घेतल म्हणला, आजी तुमच्यापाशी थांबलं की लई बरं वाटतं माह्या शेताच्या रस्त्यावर तुमचं घर म्हणजे माही वाटच मले तुमच्याकडे नेते. रघुनाथ पाणी पिऊन जायला निघाला सखुबाई म्हणली, दादा आपल्या लेकराइलेबी एखाद दीसी घी येजा, ताईलेबी घी येजा आम्हास्नी आमचं नातेवाईकच वाटत तुम्ही. रघुनाथ म्हणला, नक्की आणिन अन् तुमचा आशीर्वाद आमच्या लेकराला भेटीन आणि मी तुम्हालेबी नेईन माह्या घरी.

बोलता बोलता रघुनाथला गहीवरून आल. रघुनाथ निघून गेला. संतोष आणि सखुबाई आपल्या जीवनाची वाटचाल आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पगारावर करत होती. बर्‍याच दिवसापासून पगाराची वाट पाहण्यात जात होते अनेक महिन्यापासून पगार नसल्याने खाण्याची पंचायत झाली होती. संतोषला तब्येतीच्या थोड्याफार कुरबुरी असायच्या तर सखुबाई आपलं दुखणं अंगावर काढत स्त्रियांचा गुणधर्म पार पाडायच्या. संतोषला आता आपल्या स्वतःच्या झोपडी अन सखुबाईचा आधार खूप महत्वाचा वाटायचा ह्या आधाराशिवाय जगण्याला अर्थच नाही ही त्याची स्वतःची समजूत होती आणि ती रास्त अशी होती. सखुबाईंना आज आपल्या झोपडीसमोरच्या खाटीवर असलेले संतोषच्या अंथरुणाच्या गोधड्या धुवायला काढल्या होत्या. थकल्या भागल्या जीवाला अधिक थकवायचा सखुबाईचा प्रयत्न कायमचा चाललेला असायचा, तिच्या कष्टाला आणि श्रमाला अनेकदा अडथळे आले सगळ्याच अडथळ्यांना पार करीत सखुबाईंनी आपल्या संसाराला पुढे नेलं व्हत.

बस एवढं जास्त गोधड्या धुऊ नगस तरास व्हइल. संतोष बोलत होता. सखुबाईन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता ती आपल्या कामात गर्क होती. पुन्हा नंतर संतोष देखील काही बोलला नाही दुपारची वेळ होत आली सखुबाईची सारि काम आटोपली होती सखुबाई बोलली, आव जरा इकडं बसा चहा ठेवली हाय. व्हय थोडीशी घिन म्या, चहा जास्त नगू संतोष बोलला. सखुबाईन थोड्या वेळाने चहा आणून दिला संतोष चहा घेतच होता. तेवढ्यात पोस्टमन आला. पोस्टमन येताच आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या संतोषन घरात सखुबाईला आरोळी मारली, पोस्टमन दादा आल्यात सखुन आतूनच सांगलं, बसवा त्यास्नी चहा आणते म्या संतोषने सखुबाईच बोलन ऐकलं आणि पोस्टमन दादाला बसायला सांगितलं.

झोपडीच्या दरवाजातून वाकून सखुबाई बाहेर आली एका हातात चहाची कपबशी, एका हातात ग्लासात पाणी आणून तिने पोस्टमन दादाला दिल. पोस्टमनदादांन पाणी घेऊन सखुबाईच्या हातातला चहा घेत म्हणला, आजी कशाला त्रास घेतला कशाचा त्रास किती महिन्यांनी आलात तुम्ही तूम्हाले सांगू खरं पटणार नाय, पण दादा आम्ही तुमचीच वाट पाहत बसत्यात. पोस्टमन हसला त्यांन आठ महिन्याचा संजय गांधी निराधारचा पगार सखुबाईच्या हातात दिला. ज्यात दोन हजारांच्या काही नोटा, काही पाचशे काही शंभराच्या होत्या समाधानानं पैसे घेत पोस्टमनच्या हातात दहा रुपये देत सखुबाईन संतोषकड नजर टाकली बर्‍याच दिवसापासून संतोषच्या चेहर्‍यावर हास्य नव्हतं.

आज खुललेला चेहरा पाहून सखुबाईलाही बरं वाटलं. पोस्टमन निघून गेल्यानंतर संतोष अन सखुबाई आपापसात बोलू लागले. सखुबाई बोलली, बर्‍याच दिसपासन पगाराची वाट बघत व्हती अडचणच्या वेळीच पगार आली. सरकारचं भल व्हइन माय गोरगरिबांचा आशीर्वाद राहीन. मध्येच संतोष म्हणला, आता बाजार काय आणायचा ते पाह्य बरं लई दिस झालं तोंड कसं लई कडू सारखं झाल्यागत व्हत्य, कोरड्या भाकरी खाऊन श्यान.

मले बी समजतं म्या आता बाजारातून बाजार करून आणते सखुबाई म्हणली बाजारातून सखुबाई आणलेलं काही भातकुल संतोषला खायला दिल संतोषने समाधानाने खाल्ले दोघांनी रात्री छान पैकी जेवण केलं दोन-चार दिवस आनंदात गेली.

सखुबाई म्हणली,म्या म्हणते ह्या पैश्याईच थोड कपडलत्त घ्यावं तुम्ही दाढी करी घ्या, चप्पल घ्या

मले घेण्या अगोदर तुला पातय घे ठीगय मारून मारून किती दिस घालशील संतोष बोलत होता तेवढ्यात रघुनाथ आला म्हणला, बाबा आजी काय चाललंय संतोष म्हणला, बर्‍याच दिसांनी आला रे बाबा तू.

व्हय म्या बाहेरगावी जात व्हतू कामासाठी रघुनाथ बोलत होता तेवढ्यात सखुबाई पाणी घेऊन आल्या पाणी देता देता म्हणल्या, भाऊ लय धावपळ चालली हाय तूही.

रघुनाथ म्हणला,व्हय आजी कालच दोन हजाराच्या नोटा बंद केल्या सरकारन,लागलीच संतोष म्हनला,काय सांगतोय.

व्हय बाबा कालच जाहीर केलय सरकारनं बंदी आणलीय दोन हजाराच्या नोटांवर, बँकेतून बदलून देण्यास काही दिस दिलया त्यामुळे धावपळ चाललिय. रघुनाथ बोलता बोलताच निघून गेला. काळजी पडल्यागत चेहरा करत सखुबाई म्हणली, काय करता ह्या नोटांइचं पोस्टमनन दोन हजाराच्या नोटा दिल्यात काय काळजी नग करू बँक मध्ये जाऊन बदली घेऊ संतोष समजावण्याचा सुरात सखुबाईला सांगत होता. एक-दोन दिवसांनी सखुबाई आणि संतोष तालुक्याच्या गावात बँकेत गेले भली मोठी रांग पाहून सखुबाईला काळजी वाटली सखुबाई संतोषला म्हणली ,आठी किती दिस लागता काय मत म्या रांगेत उभी राहते तुम्ही घरी जा. संतोष म्हणला, म्या जाणार नाय तुझ्यासोबतच राहीन.

रांग पुढे पुढे सरकत होती भली मोठी रांग अजून वाढत होती संतोष पलीकडे जाऊन आणलेली भाकरी खात होता. थोड्या वेळाने संतोष रांगेत उभा राहिला अन सखुबाईंन भाकरी खाल्ली बराच वेळ होऊन सुद्धा रांग पुढे सरकत नव्हती अचानक गोंधळ झाला गोंधळाचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले संतोष कुठे तर सखूबाई कुठे रांगेतले अनेक लोक कुठल्या कुठे पळत होते नोटबंदीमुळे आता सखुबाईचा आता हातबंदी केला होता. संतोष धावत कसातरी उठबस करत तिच्याजवळ आला डोळे सुकलेले हात जायबंदी अशाही अवस्थेत सखुबाईच्या मुठीतली नोट मात्र जगण्यासाठी घट्ट पकडलेली होती.

- मिलिंदालय, प्लॉट नंबर 14,

निसर्ग कॉलनी, पिंप्राळा जळगाव.

भ्रमणध्वनी 9423185505

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com