मैथिली

मैथिली

वृषाली नरेंद्र खैरनार

मीराताई मला उद्या तुमच्या अंगणवाडी केंद्रावर यायचे आहे. फाट्यावर उतरू ना? हो मॅडम, मी तुम्हाला दाखवलं होतं ना ते दुकान... फाट्यावरचं! तिथेच उतरा. मी कुणाला तरी घ्यायला पाठवीन. ते उभे राहतील फाट्यावर.

चालेल तसं कर. कुणीतरी रस्ता दाखवणार असलं की बरं असतं. हो मॅडम, काळजी करू नका तुम्ही. फाट्यावर उतरा, पुढे पायवाट आहे. हरकत नाही मीरा. मला पायी चालायची सवय आहे आणि आपलं कामच आहे ते ! एवढा विचार नाही करत मी. ओके! ठीक आहे. बाय!

असं म्हणत तिने फोन ठेवला सकाळ पासून मीराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण कार्यक्षेत्रात रेंज नेहमीच असते असे नाही. त्यामुळे तिला सतत फोन लावण्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा कुठे आता संध्याकाळी फोन लागला होता. निदान येण्याचा निरोप मिळाला तरी बिनधास्त राहता येते. म्हणून हा प्रयत्न ! एरवी कधीही कॉल करून अंगणवाडी भेटीसाठी जाणं तिला पसंत नव्हतं पण या अतिदुर्गम भागात आत्ताच रुजू झाल्याने रस्ते माहीत नव्हते. त्यामुळे विचारून किंवा सांगूनच जावं लागत होतं. याशिवाय पर्याय नव्हता.

रात्रीचे जेवण झाले. घरी एकटाच असलेल्या नवर्‍याला तिने कॉल केला. नेहमीचा संवाद झाला जेवण केलं का? केव्हा आले ? कसे आहात ? काळजी घ्या. दोन्हीकडून हाच संवाद होता. इंजिनियरींगच्या दुसर्‍या वर्षाला असलेल्या एकुलत्या एक मुलीलाही कॉल केला. वरवरची विचारपूस केली आणि तिने मोबाईल चार्जिंगला लावला. गेल्या दोन महिन्यांपासून हेच रुटीन होते. सगळंच विस्कळीत झालेले होते पण तरीही त्याचा बाऊ न करता जे आहे ते स्विकारत तिचं काम करणं सुरू होते. नवीन तालुका, नवीन भाग, नवीन साहेब, नवीन कर्मचारी इतरांना जुळवायला हे थोडं कठीण गेलं असतं पण तिने मात्र इतकं मनावर घेतले नाही. कारण काही वर्षांपूर्वी अशाच अतिदुर्गम भागात काम करण्याचा अनुभव तिच्या पाठीशी होता.

तिने अंथरुणावर अंग टाकले. व्हाट्सअप चाळले. काही ठराविक लोकांचे स्टेटस बघितले. रिप्लाय केले. डेटा बंद करून मोबाईल बाजूला ठेवला. छताकडे नजर गेली. मन विचारांनी शून्य झालेलं होतं. असं झालं की तिची तिलाच भीती वाटत असे. विचारशून्य होणे म्हणजे संवेदनाच नष्ट होणे की, संन्यस्त वृत्तीत जाणे की, कुणाशी काहीच घेणं देणं नसणे ? झोप मात्र येईना.. वाचता वाचता झोप येईल असे वाटून तिने पुस्तक हातात घेतलं... आशा बगे यांची मभूमीफ कादंबरी... त्यातील ममैथिलीफ हे पात्र तिच्या मनात ठसलेलं होतं. परिस्थितीशी जुळवून घेतानाही स्वतःचं अस्तित्व स्वतंत्र ठेवणारी ममैथिलीफ..! पुस्तक वाचून अर्ध्यावर आलेले होते. वाचता वाचता डोळ्यावर झोप येऊ लागली तसं तिने पुस्तक बाजूला ठेवले आणि हळूहळू ती झोपेच्या स्वाधीन झाली.

सकाळच्या सहाच्या अलार्मने तिला जाग आली. सर्व आटोपून ती निघाली. या रस्त्याला बसेस क्वचितच होत्या त्यामुळे मिळेल त्या वाहनाने ...जास्तीत जास्त तर ट्रॅक्सने प्रवास करावा लागे. आजही ती ट्रॅक्सने निघाली होती. सकाळचा सुंदर निसर्ग ती न्याहाळत होती...सातपुड्याच्या डोंगर रांगा... किती सुंदर रूप दिसत होतं त्यांचं! रात्री विसाव्यासाठी डोंगराच्या कुशीत शिरलेले ढग अजूनही वर जाण्याचं नाव घेत नव्हते जणू ...! पक्षांचा किलबिलाट आणि झुळझुळ वाहणार्‍या नद्यांचे मंजूळ संगीत कानाला गोड वाटत होतं. त्यामुळे ते आत मनाच्या गाभार्‍यापर्यंत पोहोचत होतं. तिचे मन प्रसन्न झाले. मीराताईने सांगितलेल्या खाणाखुणांप्रमाणे फाटा आला. ती उतरली. तेवढ्यात एक तरुण पुढे आला.

तुम्ही, अंगणवाडीच्या सुपरवायझर मॅडम ना?

होय. मीरा ताईंनी पाठवलं का तुम्हाला?

हो मॅडम, चला.. मी रस्ता दाखवतो. तुमची बॅग द्या माझ्याकडे

नको दादा, राहू द्या. उगाच माझं ओझं तुमच्याकडे नको. तिने नकार दिला.

तसं नाही मॅडम. रस्ता खराब आहे. उताराचा आहे. आम्हाला सवय आहे. तुम्हाला मोकळे चालता येईल. म्हणून द्या. त्याने आग्रह केल्याने तिने जवळची बॅग त्याच्या हातात दिली. तिला खरंच ते सोयीचं झालं.

तीन चार किलोमीटर अंतर पायी चालून गेल्यानंतर ती अंगणवाडी केंद्रात पोहोचली. छोटे छोटे बालगोपाल गोलाकार बसलेले होते. मीराताई त्यांच्यासोबत गाणं म्हणत होती. थोडा वेळ ती दारातच उभी राहिली. गाणं संपलं आणि मुलांनी टाळ्या वाजवल्या. मीराताई उठून उभी राहिली.

नमस्कार मॅडम, या ना, आत या.

मिराने खुर्चीवर ठेवलेले रजिस्टर खाली ठेवले. तिला बसण्यासाठी खुर्ची मोकळी केली. तिने आजूबाजूला नजर टाकली. खोलीत सर्वत्र कोंदट वातावरण होते. कुडाच्या चार भिंतींमध्ये अंगणवाडी भरत होती. कुडाच्या मोकळ्या असलेल्या भागातून प्रकाशाचे काही किरण आत येत होते तेवढाच उजेड..! त्यामुळे तिच्या मनावरही एक प्रकारचे मळभ दाटून आल्यासारखे तिला क्षणभर जाणवले. त्या वातावरणाची मुलांना व मीराताईला सवय झाली होती. त्यांच्यासाठी हे नित्याचेच होते. तिला मात्र अस्वस्थ झालं.

मिराताई, तुमच्याकडे मुलांची उपस्थिती छान आहे. तुमचं कामही छान आहे. तरीही अंगणवाडीसाठी इमारत का नाही ?

मॅडम इमारत मंजूर आहे. अर्धवट काम करून सोडून दिलेले आहे. गेल्या पाच वर्षात दोन वेळा ग्रामसभा झाल्या. त्या ग्रामसभेतही मी विचारले. सरपंच ग्रामसेवक यांनाही सतत विचारते. पण मकरून देऊफ मपाहू नंतरफ असे उडवा उडवीचे उत्तरे मिळतात. मग काय करणार ? मदतनीसच्या मदतीने ही कुडाची खोली तयार केली. येथेच मुलांना बसवते.

बाई गं, मला कळत नाही असं का करतात ही लोकं ? गाव आपला, मुले आपली, हेच उद्याचं भविष्य आहे. त्यांच्यासाठी अत्यावश्यक असणारे हे ज्ञान मंदिर ! येथे सुद्धा हा भोंगळ कारभार ! तिने आपली अस्वस्थता प्रकट केली.

आपण काय करणार मॅडम, पण मी माझ्या पातळीवर मार्ग शोधला. इमारत नाही, इतर अनेक अडचणी आहेत तरीही जितकं शक्य होईल तितकं मी करते.

हो मीराताई, या दोन तीन महिन्यात मला तुमची क्षमता लक्षात आली. कामाची पद्धत कळाली. खूप छान काम सुरू आहे तुमचे ! बरं, मी सांगितल्याप्रमाणे काही मातांना बोलावलं आहे का ? आज मला माता बैठक घ्यायची आहे.

हो मॅडम, आता येतीलच माता, तोपर्यंत तुम्ही हे दप्तर तपासता का? असे म्हणून मीराने काही रजिस्टर तिच्यासमोर अदबीने ठेवली. तिने रजिस्टर तपासले. समाधान कारक होते. किरकोळ दुरुस्ती तिला सुचवली. मीराचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. काही माता येऊन समोर बसत होत्या. मध्येच मीरा थोडा वेळ बाहेर जाऊन आली. आता मात्र परत आल्यावर तिच्या चेहर्‍यावर मघाशी होता तसा उत्साह दिसत नव्हता. मकाय झाले बरे बाहेर ? विचारावे का तिला ? नको.. आता नको, नंतर बोलू.फ असं मनाशी ठरवून तिने मातांशी संवाद सुरू केला. मीरा थोड्यावेळाने संवादात सहभागी झाली. दुभाषिताचे काम करू लागली. दोघींनी मिळून छान माता बैठक घेतली. माता समुपदेशन केले. बालकांच्या वजन वाढीसाठीचे काही उपाय सांगितले. मातांच्या समजण्याचा आवाका बघून तिने आता आटोपते घेतले. मातांच्या चेहर्‍यावरील आनंद बघून मीरासह तीही खुश झाली. माता व बालके आता निघून गेले.

मॅडम छान झाली माता बैठक ! तुम्ही आज आल्या ते छानच झालं. आमचं सांगणं आणि तुमचं सांगणं यात फरक पडतो.

अगं तसं काही नाही मीरा. तुम्ही पण असं छान मार्गदर्शन करू शकतात फक्त मनाची तयारी हवी. ती म्हणाली.

हो मॅडम करू शकतो पण तुमच्यासारखं जमेलच असं नाही. अगं जमेल. का नाही जमणार .तू तर ग्रॅज्युएट झालेली आहे. किती छान काम आहे तुझे ! तुला तर नक्कीच जमेल.

मीराचा चेहरा ख़रकन उतरला. डोळ्यात थोडं पाणी तरळल्यासारखं तिला जाणवलं. तिच्या नजरेतून ते सुटले नाही. तिने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि मीराचा बांध फुटला. मीरा रडू लागली. तिने मीराला रडू दिले. नंतर शांत केले.

सॉरी मॅडम ! स्वतःला सावरत मीरा म्हणाली,

अगं सॉरी काय ! काय झाले ? मला सांगशील का ? मी मघाशीच तुला विचारणार होते. तू मध्येच बाहेर गेली नंतर आत आली. तेव्हा तुझा चेहरा मी वाचला. काहीतरी नक्कीच झाले आहे. काय झाले ते सांगितले तर मी तुला काही मदत करू शकते. तिने काळजीने विचारले.

आजूबाजूला कुणीही नव्हते मदतनीसही उठून चालली गेली. अंगणवाडीत आता त्या दोघीच होत्या.

मॅडम मी शिकले. ग्रॅज्युएट झाले. नोकरी करते, मला थोडे फार ज्ञान आहे. त्यामुळे गावात थोडा मान आहे. नेमकं हेच माझ्या नवर्‍याला नको आहे. त्याला हे काहीच सहन होत नाही. शिवाय तो नेहमी दारूच्या नशेत असतो. माझ्यावर संशय घेतो. नोकरी सोड म्हणतो. कधी कधी तर रात्रभर झोपू देत नाही अशावेळी जीव मुठीत घेऊन बसून राहते. त्यामुळेच दोघी मुलींना होस्टेलमध्ये शिकायला टाकले आहे. नवर्‍याचा जाच सहन करीत जगते आहे.

मीरा, अगं सोडून दे ना मग त्याला. कशाला सहन करते एवढे ? तिने आपली रोखठोक भूमिका मांडली.

नाही मॅडम ! सोडून देणं हे त्यावरचे उत्तर नाही असं मला वाटतं. माझ्या दोन मुली आहेत त्या मोठ्या होत आहेत. जोडीदाराला सोडून देणे हे आमच्या समाजात सहज घडत असते, पण मी तसं करणार नाही. माझे सासू-सासरे चांगले आहेत. त्यांचा आधार आहे मला.

अगं पण किती दिवस हे सहन करशील ?

जितके दिवस होईल तितके दिवस. पण मी नोकरी सोडणार नाही. नोकरीच माझी ओळख आहे. माझं बलस्थान आहे. मी माझं अस्तित्व असे मिटवू शकणार नाही. असं बोलताना मीराच्या डोळ्यात आता पाणी नव्हतं तर नवी चमक होती.

तिने मीराकडे पाहिले. आशा बगेंच्या मभूमीफ कादंबरी मधील ही ममैथिलीफ असल्याचाच भास तिला होत होता.

- वृषाली नरेंद्र खैरनार, ‘संवेदन’ प्लॉट नं.11,

नयना सोसायटी, साक्री जि.धुळे 424304

भ्र. 9420199501.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com