दिवाळी हरवली आहे का हो?

दिवाळी हरवली आहे का हो?

‘दीन दीन दिवाळी गायी मशी-ओवाळी’

‘बगळ्या, बगळ्या फुल घे दिवाळीला तेल दे’

असं म्हणत गल्लीबोळातून धावणारी मूल, किल्ले बांधण्यासाठी माती, शेण गोळा करणारी, त्याला सजवायला रंगीत काचेचे तुकडे, खडूचे तुकडे, घरी बनविलेल्या पताका दादा ताईच्या मागे लागून किल्ला बनवण्याचा खटाटोप केलेला एकच गलका आणी गोंधळ, आनंदाला कसं उधानं आलेलं असायचं.

१५-२० दिवस आधीपासून तयारी सुरु असायची तिथूनच दिवाळीला सुरवात व्हायची सर्व घरातील कुटूंब एकत्र येऊन घराची साफसफाई, आणि रंगरंगोटी चालायची, संपूर्ण घरातल सामान अंगणात काढून कमीत कमी चार-पाचच दिवस हाच कार्यक्रम चालायचा. पितळी व तांब्याची भांडी जुनी लोणच्याचे सार लावून घासून घासून उजळायची आणि कुनाची जास्त चकाचक व्हायची याची चर्चा सुरू असायचीं. अंगणात बसूनच स्वयंपाक जेवण हसी मजाक चालायची. सफाई करवाना एखादी वस्तू काकूच्या किंवा आईच्या माहेरातील असली की ती हाताळताना त्यांचा तो हळूवारपणा नजरेतूनच कळायचा. किती आनंदी होता त्यात तो शब्दात नाही सांगता येणार.

साफ सफाई नंतर किराण्याच्या याद्या व्हायच्या. आणी एक एक गोष्ट आठवून आईला सांगायची. शेव, लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली असे अनेक पदार्थ व्हायची. पण सगळी घरीच अगदी दळण्यापासून तर तळण्यापर्यंत. ओली गहू शेवांची दाळ सगळं आई जात्यावर दळत असे. भाजणी भाजून दळायची. आईची कामाची लगबग पहाटेपासून तर रात्री उशीरापर्यंत चालायची. जात्यावर दळण्याचा आवाज आला की, मी जावून तिच्या मांडीवर झोपायची. जात्यावर दळताना तिची हालचाल होईल तेव्हा मांडीवर आपोआपच झोका दिला जाई आणि तेव्हा गाढ झोप लागायची ते कळत नव्हतं. अलगत खाली जमीनीवर मला झोपवून दूसरं काम करी. इतकी सगळी कामं करून ती गप्प आणि शांतच राही. कसं जमायची तिला सगळं काय माहित. ती म्हणजे अगदी ग्रेटच आहे.

आमची मात्र वेगळीच धांदल असायची, दादा बांबूच्या काड्या शिलायचा त्याची भलीमोठी चांदणी करायचा. त्याला रंगीबेरंगी कागदं लावून छान सजवून आकाश कंदील बनवायचा. काळी माती, शेण एकत्र करून त्याचचा किल्ला बनवायचा. त्याला रंगीत खडूची भिंत करायचे, त्यावर झेंडा लावायचा, त्यावर एकीकडे तोफ, एकीकडे पहारेकरी असायचे. त्या किल्ल्याच्या बाजूलाच मी माझा मातीच्या भांड्यांचा घर संसार मांडायची. गुळ, शेंगदाणे, मुरमुरे, शेव, लाह्या असा खाऊ छोट्या छोट्या रांजणात ठेवायचा आणि भातुकलीचा खेळ रंगायचा. खुप मजा यायची. सगळीच आनंदाने खेळ खेळायची. आई-बाबा, आजी-आजोबा, आत्या-दादा, वहीणी सारी सारी अगदी कौतुकाने बघायची. तो आनंद कोणत्या शब्दात वर्णु मला कळतच नाही.

संपूण गल्लीतून जाताना कुठे खमंग चीवड्याचा सुगंध, भाजलेल्या भाजणीचा सुगंध, तळल्या जाणाऱ्या शेवयांचा, कुरडया कुठे खुसखुशीत अनारसे आणि गोड वासाने जिभेला पाणी आणणारे शंकरपाढे हे सगळं कसं हवहवसं वाटणार. विशेष म्हणजे हे सगळे पदार्थ घरीच केली जात, आणि तेही आनंदाने एकमेकांच्या मदतीने.

किती मज्जा असायची सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान त्यासाठी घरी तयार केलेली उटणी आणि उबाळलेला चंदन व खोबऱ्याचे तेल अंगाला चोळून अंघोळ सडा-रांगोळी देवपूजा शंख घंटी नाद आरती मंत्र यांच्या उल्हासित करणारा आवाज, सगळ घर कसं हसायचं जणू. प्रफ्फुल्लीत व्हायचं सगळीकडे कसं पवित्र पवित्र वाटायचं या सगळ्यासाठी लेकी-सुनांची कामाची चाललेली लगबग.

संध्याकाळी कोणते कपडे घालायचे, कोणते फटाके फोडायचे याची तयारी आधीच केलेली, त्यात दादाने हा फटाका फोडला की आपण कुंडी फोडायची नंतर भुईचक्र फोडायचे. ते संपेपर्यंत टाळा वाजवत आनंदाने उड्या मारायच्या. चोरून दादाचा वाटेतील एखादी कुंडी हळूच चोरून काय मजा यायची. ते संध्याकाळी चार वाजले की सगळीकडे अंगणात झाडायचा सरंसरं आवाज यायचा त्यावर शिंपडलेला शेणाचा सडा, येणारा मातीचा सुगंध मनाला धुंद करायचा आणि ओसंडून वाहणारा सगळ्यांचा उत्साह हा आनंद काही औरचं. कोणती रांगोळी काढायची, कसे आणि कोणते रंग भरायचे, त्याला बॉर्डर मात्र दादानेच द्यायची, हे सगळं करत असताना बाबा ओट्यावर बसून आमच्याकडे कौतुकाने पहात आम्ही खुप सुंदर मोठी रांगोळी काढायचो. सगळे जण वाड्यात येवून रांगोळीचं कौतुक करत. सगळ्या गल्लीत रंगीबेरंगी रांगोळ्या, लटकणारे कंदील, किल्ल्यांची आरास, करआठव, वसुबारस, धनतेरस, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा हा दिवाळी सण. आनंदाचा, उत्साहाचा नावीन्याचा सण, प्रत्येकाच्या अंगात वेगळाच उत्साह आनंद असायचा. कारण प्रत्येकात एक माणूस असायचा. त्यात भावनांचा ओलावा आणि जाणीव असायची. एकमेकांपासूनचा आदर, सन्मान असायचा. तो कृतीतूनच स्पष्ट व्हायचा आणि तो कृतीतून स्पष्ट होणं किती आवश्यक आहे हे आज कळतं. कारण आज फक्त जगमगाट आहे. महागड्या वस्तुंची देवाण-घेवाण आहे, पण खरा आनंद अनुभवायलाच कुणाजवळ वेळ नाही.

बगळ्या बगळ्या तेल दे म्हणत खेळणारी, बागळणारी मुलं कुठं दिसतच नाहीत. ही मुलं फक्त पुस्तकातच किंवा मोबाईलमध्ये तोंड खुपसून असताता. क्रियाशील जीवन, स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी त्यांच्या हातात शिक्षणाच्या बेड्या पडतात आणि सर्व आनंद हिरावून घेतात. आम्ही जो अनुभव अनुभवला तो आनंद आणि प्रफुल्लीत करणार ते वातावरण एका चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर आज खरचं खुप छान होते ते दिवस. एखदा जूना चित्रपट तरी पुन्हा पाहीला जाईल पण अनुभवलेले ते क्षण फक्त आठवले जातील. पुन्हा अनुभवायचे म्हटले की, जमनार नाही. ते अनुभवायचे असेल तर एकत्र कुटूंब पध्दतीनेच ते शक्य आहे, म्हणून विचारते की, दिवाळी हरवली काहो?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com