एलिस इन वंडरलँड

एलिस इन वंडरलँड

लुईस कॅरोल यांची ही लहान मुलांसाठी लिहिलेली एक जगप्रसिद्ध कादंबरी आहे. यामध्ये अ‍ॅलीस नावाची एक लहान मुलगी असते. तिला नेहमी परीकथा वाचायला खूप आवडते. या परीकथांमधील जग किती सुंदर आहे. मात्र, ते खरोखर असते का याची तिला नेहमी उत्सुकता वाटत असते. एके दिवशी ती आणि तिची मोठी बहीण बागेत नदीकिनारी जातात. तिथे तिची मोठी बहीण पुस्तक वाचत बसते. अ‍ॅलीस तिच्या पुस्तकात डोकावून पाहते, पण तिला त्यात एकही चित्र नसल्याने ते निरस वाटते...

ती कंटाळते आणि बागेतील फुले तरी गोळा करूया म्हणून उठते. तेवढ्यात तिला एक पांढरा शुभ्र ससा तिच्या जवळून टुणटुण उड्या मारत जाताना दिसतो. हा ससा काहीतरी वेगळा असतो. त्याने अंगात जॅकेट घातले होते आणि जाकिटाच्या खिशातून घड्याळ बाहेर काढून त्याने वेळ पाहिली. ‘भलताच उशीर झालाय’ म्हणत तो घाईने निघून गेला. अ‍ॅलीसला नवल वाटले. तिने असा ससा कधीच पाहिला नव्हता. ती त्याच्या मागे धावत सुटली. त्याला तिने थोडे थांबण्याची विनंती केली. पण तो न थांबता पुढे धावतच राहिला. ती त्याचा पाठलाग करू लागली. ती पोहोचली एका बिळाजवळ. पण ते बिळ म्हणजे एक खोल अंधारी विहीर होती. अ‍ॅलीसने कोणताही विचार न करता या बिळात उडी घेतली. ती खोल खोल जातच राहिली. अगदी आपण तरंगत आहोत असे तिला वाटत होते. हे अंतर हजारो मैल होते. तिला खूप भीती वाटत होती.

एकदाचे विहिरीच्या तळाशी पोहोचल्यावर मात्र तिला छान गंमत पाहायला मिळाली. तेथे भिंतीमध्ये पुस्तकांची कपाटे होती. भिंतीवर चित्र होती. एका कपाटात तिला एक काचेची बरणी दिसली. त्यामध्ये ‘संत्र्याचा मुरंबा’ होता. येथे अ‍ॅलीसला डोंगरावरून खाली घरंगळत येण्याचा अनुभव येत होता. तिला यावेळी आपल्या दिना मांजरीची आठवण झाली. एवढे पडून तिला साधे खरचटलेसुद्धा नव्हते. तिने पाहिले पुढे अजून एक अंधार्‍या बोळातून तो ससोबा पुढे पुढे जातच आहे. ती त्याच्या मागोमाग जात राहिली.

पुढे गेल्यावर तिला तेथे एका मागे एक अशा बर्‍याच खोल्या दिसल्या. त्यांना दारेच दारे होती आणि ती कुलूपबंद होती. अ‍ॅलीस निराश झाली. तेवढ्यात तिचे लक्ष एका टीपॉयकडे गेले. त्यावर एक छोटीशी सोनेरी किल्ली पडलेली होती. तिने ती उचलली. एका कुलूपाला लावून पाहिले. मात्र ते काही उघडले नाही. तिला राग आला. तिने ती चावी भिरकावून दिली. ती एका पडद्यामागे पडली. तिने ती उचलली तेव्हा तिला तेथे एक छोटेसे दार दिसले. त्याला अगदी छोटेसे कुलूप होते. तिने ही चावी त्या कुलूपाला लावली. ते दार उघडले गेले. त्यातून तिने डोकावून पाहिले तर तेथे तिला एक सुंदर बाग दिसली. पण त्या दारातून तिला जाता येत नव्हते. तिला वाटले आपल्याला लहान होता आले तर...!

तेवढ्यात तिचे लक्ष एका काचेच्या बाटलीकडे गेले. त्यावर लिहिले होते, ‘मला प्या’. तिने त्या बाटलीतील गोड सरबत चाखून पाहिले. तिला ते खूप आवडले. तिने ते आणखी चाखून पाहिले. तेव्हा मात्र तिला आपल्या सभोवतालच्या वस्तू खूप मोठ्या झाल्याचे दिसू लागले. म्हणजे ती इटुकली पिटुकली होत चालली होती. एकदम छोटी म्हणजे दहा इंचाची झाली होती. मात्र तो दरवाजा उघडण्याची किल्ली तर टेबलावर राहिली होती. ती आता तर अगदी छोटी झाली होती. तिचा टेबलावर हात पुरत नव्हता.

आपण ती किल्ली जमिनीवर ठेवायला हवी होती याचा तिला पश्चाताप झाला. ती किल्ली मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. टेबलावर चढताना ती घसरून खाली पडली. तिला खूप रडू आले. तेवढ्यात तिला खोलीच्या एका कोपर्‍यात काचेची एक डबी दिसली. तिने ती उघडली. त्यात तिला एक छोटासा केक मिळाला. तिने तो केक खाल्ला आणि काय आश्चर्य. ती मोठी मोठी होत गेली. तिचे डोके जेव्हा छताला लागली तेव्हा तिला कळले आपण खूप मोठे झालो आहोत. ती आता एवढी लंबूटांग झाली होती की त्या छोट्या दरवाजाला फक्त एक डोळा लावून पाहू शकत होती. ती रडायला लागली. परत तिला तो ससोबा येताना दिसला. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून तिने ससेभाऊ म्हणून आवाज दिला. मात्र, तिचा हा आवाज ऐकून तो ससा दचकला व आणखी जोरात पळून गेला.

या गडबडीत त्याच्या हातातील पंखा व हातमोजा खाली पडला होता. तिने तो उचलला. ती पंख्याने हवा घेऊ लागली. ती आता एकटी राहून कंटाळली होती. तेवढ्यात तिच्या लक्षात आले. सशाचा हातमोजा तिच्या हातात बरोबर बसलाय म्हणजे ती लहान होऊ लागली होती. तिला कळले हातातील पंखा हलवला की, ती लहान होत चालली होती. आता अ‍ॅलीस त्या छोट्याशा दाराकडे पळाली. पण किल्ली तर टेबलावर राहिली होती.

पुन्हा धावपळ करत असताना ती पडली ते थेट पाण्यात. ते पाणी तिला खारट वाटले. क्षणभर तिला वाटले तो समुद्र असावा. पण लगेच तिच्या लक्षात आले. जेव्हा ती नऊ फूट उंचीची झाली होती, तेव्हा रडताना अश्रूंचे तळे तयार झाले होते. आता ती तिच्याच अश्रूंच्या या तळ्यात न्हात होती. या तळ्यात बेडूक, उंदीर, गरूड, कबूतर, कावळा, घुबड असे सगळेच प्राणी ओले झाले होते. कोरडे होण्यासाठी त्यांनी शर्यत लावली होती. कोणी कसेही आणि केव्हाही पळू लागले होते. मात्र, सर्वच जण शर्यत जिंकल्याचा दावा करू लागले. तेव्हा अ‍ॅलीसने त्यांना आपल्या खिशातील चॉकलेट वाटले. ती त्यांना आपल्या दिना मांजरीविषयी सांगू लागली तेव्हा मात्र उंदरासह सर्व पक्षी पटापट निघून गेले. आता पुन्हा अ‍ॅलीस एकटी पडली होती.

थोड्याच वेळात तिला सशाच्या पावलांचा आवाज आला. तोच तो ससेभाऊ आपला हरवलेला पंखा व हातमोजा शोधत आला होता. सशाने अ‍ॅलीसला पंखा व मोजा आणण्यासाठी हुकूम केला. त्याला वाटले ती त्याची नोकराणी आहे. अ‍ॅलीस ससेभाऊच्या घराकडे निघाली. तिला तिथे टेबलावर एक पंखा व हातमोजा मिळाला. तेथे तिला एक गुलाबी सरबताची बाटली दिसली. अ‍ॅलीस ते सरबत प्यायली. त्यानंतर ती मोठी मोठी होत गेली.

एवढी की ती आता त्या घरात अडकून पडली. सारे प्राणी तिला बाहेर काढण्यासाठी खडे मारू लागले. तेव्हा त्या खड्यांचा केक झाला. तो केक खाल्ल्यानंतर अ‍ॅलीस पुन्हा लहान होत गेली. एवढी की कावळ्याच्या छत्रीखाली ती उभी राहू शकली. तेवढ्यात त्या छत्रीवर बसलेला सुरवंट तिच्याशी बोलला. तिने छत्रीचे दोन भाग केले. उजवा भाग खाऊ लागली तर काय आश्चर्य ती मोठी होत होती. दुसरा डावा भाग खाल्ला तर ती पुन्हा लहान होत होती. असे करता करता ती पुन्हा पूर्वी होती तेवढीच तिच्या उंचीची झाली.

यानंतर ती स्वयंपाकगृहात गेली. तेथे तिला सरदार कन्या वगैरे लोक भेटले. इराणी मांजर भेटली. तिने त्यांना मार्च ससोबा व हॅटरचा पत्ता विचारला. पुढे गेल्यावर तिला बागेत पत्त्यांच्या पॅकमधील पत्ते माणसांप्रमाणे खेळताना दिसले. किलवरची राणी, इस्पीकचा एक्का, बदाम राणी, राजा हे सर्व एकमेकांना नावाने हाक मारत होते. बदाम राजा व राणीची शाही मिरवणूक तिने पाहिली. ती त्यांच्याशी बोलली.

बदामच्या गुलामाने राणीचे गुलाबजाम चोरल्याचा आरोप होता. त्यासाठी कोर्टात खटला चालवला गेला. अनेकांना साक्षीदार म्हणून बोलावले गेले. सर्वात शेवटी अ‍ॅलीसला बोलावण्यात आले. मात्र अ‍ॅलीस पूर्वीप्रमाणे मोठी होत गेली, तेव्हा ते सर्व न्यायाधीश, राजा, राणी, सैनिक सर्वजण घाबरले. बदामाच्या राणीने अ‍ॅलीसला पकडण्याचा हुकूम सोडला. मात्र तिला पकडण्यासाठी कुणीही सैनिक पुढे आला नाही. कोर्टातील सर्व गर्दी पळाली. जुरी पाटी घेऊन बसले होते, त्यावर आता लिहिलेले होते, ‘केवळ खेळातील पत्ते....’ .

अ‍ॅलीस मोठ्याने हसली.

हे सर्वजण खेळातील पत्ते होते तर....

ते सर्व पत्ते तिच्या अंगावर कोसळू लागले. जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा ती आपल्या बहिणीच्या मांडीवर बागेत डोळे लावून झोपली होती. तिच्या अंगावर झाडांची पाने टपटप पडत होती. म्हणजे या सार्‍या गोष्टी तिने स्वप्नात पाहिल्या होत्या तर....!

अ‍ॅलीसच्या बहिणीने तिला घरी जाण्यासाठी उठवले. ते दोघेही घरी निघाले. मात्र, अ‍ॅलीसचे मन अजूनही या अद्भूत स्वप्नामध्ये गुंतून पडले होते...

अशा प्रकारची ही लहान मुलांसाठी एका अद्भूत जगाची सफर घडवणारी अद्भूतरम्य अशी कथा आहे. छोट्या मुलांचे जग नेहमीच कल्पनारम्य असते. या पुस्तकातील लेखिकेने केलेली सुंदर कल्पना मुलांना खूप आनंद देऊन जाते. त्यांचे भावविश्व क्षणभर फुलवून टाकते, हेच या कथेचे श्रेष्ठत्व आहे.

- किरण दशमुखे, सटाणा (नाशिक).

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com