गावाकडची दिवाळी आणि आताची दिवाळी

गावाकडची दिवाळी आणि आताची दिवाळी

मिलींद मधुकर चिंधडे

तुम्ही जे वर्तमानात करता त्याची बीजे भूतकाळात लावलेली असतात, असे म्हणतात ते अगदी खरे आहे. आजच्या दिवाळीत मोतीलाल ओसवाल यांच्याकडे मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. संगीतमय सुरेल पाडवा पहाट होते. नातेवाईकांना भेट देण्याकरता दिवाळी अंक आणले जातात. जवळचे नातेवाईक अगर मित्र मंडळींकडे आवर्जून फराळाचे गोडधोड पदार्थ पोहोचवले जातात. या सगळ्या गोष्टींची शिकवण पूर्वीच्या दिवाळीमधून मिळाली आहे. कोरोनाचे अजूनही सावट असल्यामुळे या वर्षाची दिवाळी आणखी वेगळी असणार आहे. या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग ऑनलाईन करायला लागेल. पाडवा पहाट आणि संगीत ऑनलाइन ऐकावे लागेल. तिथला प्रत्यक्ष आनंद उपभोगता येणार नाही. कदाचित काही कार्यक्रम खुले होतील. मित्रमंडळी,नातेवाईक येणार नाहीत किंवा आपल्याला त्यांच्याकडे जाता येणार नाही, गेलो तरी काळजी घ्यायला लागेल. सुदैवाने यावर्षी कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे तरी त्याबद्दलची काळजी सर्वांना घ्यायला लागणार आहे.

दिवाळी आली की अपरिहार्यपणे माझ्या वयोवृद्ध आजी-आजोबांची आठवण होते. आजोबा म्हणजे मालेगाव येथील सुप्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी स.गो. चिंधडे वकील. दिवाळी करता आम्ही मनमाडहून मालेगावला जायचो. वडील मनमाडला सरकारी वकील होते.

आजोबा फटाके आणायला हाताला धरून बाजारात घेऊन जायचे. बोहरी समाजातील त्यांच्या पक्षकारांची दुकाने असायची. आजोबांच्या पक्षकारांनामुळे घरात भरपूर फटाके यायचे. लहान मंडळीत फटाक्यांचे वाटप व्हायचे. एकदा माझा हात भुईचक्र लावताना भाजल्याचे मला आठवते आहे. वय वाढत गेले तशी फटाक्यांची ओढही कमी झाली. आजोबांना साहित्याची आवड असल्याने दिवाळी अंक यायचे.

माझी आजी सौ. गंगुताई फार उत्साही होती. सगळ्यात पहिल्यांदा उठून घरासमोर सडा रांगोळी काढायची. तीही फुलबाज्या उडवायची. तशीच लक्ष्मीनारायण मंदिरासमोरही तिच्या समवयस्क मैत्रिणींबरोबर फटाके वाजवायची, फुलबाज्या उडवायची. वसुबारसेच्या दिवशी अग्निहोत्री यांच्याकडील गोठ्यात जाऊन गाय गोऱ्हा पूजन करायची. काळाच्या ओघात गोठेही राहिले नाही जवळ. तिच्या हातची पुरणपोळी, साटोरी आणि चोट्याचे लाडू फारच छान असायचे.

आता सर्वच फराळाचे पदार्थ घरी करणे निरनिराळ्या कारणाने शक्य होत नाही. अशावेळी बाहेरील दुकानातला फराळ आणि गोड पदार्थ आकर्षित करतात. असे करायचे असेल तर घरगुती फराळ विकत घ्यावा. कारण त्यालाही घरची चव आणि स्पर्श असतो. जाहिरातीमुळे बाहेरील साबण न घेता घरगुती उटणे विकत घ्यावे. पूर्वीआकाश कंदील घरी केले जायचे, आता स्वदेशी बनावटीचेच विकत घ्यावे. रंगीबेरंगी लाईटच्या माळा देखील आवर्जून स्वदेशी बनावटीच्या आणाव्यात.

पूर्वी सर्व जाती धर्मातील बाहेरची मंडळी घरच्या मंडळींसोबत जेवायला असायची. त्यामुळे समतेच्या आणि बंधुत्वाच्या वेगळ्या शिकवणीची गरज पडली नाही. कैलासवासी गोविंद स्वामी यांचे कीर्तन असायचे त्यामुळे रेडीओ टीव्हीवरील कीर्तनाची गरज भासली नाही. काळानुसार दिवाळी साजरी करण्याचे बदलले आहे. पण कुटुंबियांनी एकत्र येणे आणि आनंद साजरा करणे हा दिवाळी सणातील आत्मा कायम राहिला आहे.

सामाजिक संस्था ही दिवाळी साजरी करत असतात. त्यातील दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या कार्यक्रमाला मी अनेक वर्षे उपस्थित राहिलो. अंध बांधवांना फराळ कपडे आणि इतर मदत संस्था करते. अरुण भारस्कर स्वतः अंध असून सातत्याने संस्थेचे धडपडीने काम करीत असतात. त्यांच्यामुळे माझा दरवर्षी दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हायचा. कोरोनामुळे अगदी पूर्वीचे, लगतच्या दहा-पंधरा वर्षांपूर्वीचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. मधल्या काळात दिवाळीला कौटुंबिक सहल काढली जायची आता त्या लोकांना तेही करता येणार नाहीये. नातेवाईकांना भेटणे, खाण्यापिण्याची चंगळ, प्रवास हे सगळे दुरापास्त झाले आहे. या वर्षाची दिवाळी साजरी करताना कोरोनामुळे अनेक मर्यादा आल्या असल्या तरी चंगळवादाला मर्यादा घालून तळागाळातल्या लोकांच्या करता अधिक काही करावे लागणार आहे.

विसरू म्हटले तरी अशी दिवाळी आणि पूर्वीच्या व्यक्तींच्या आठवणी विसरता येणार नाहीत. त्याचा कायमचा ठसा माझ्या मनावर आजही कायम आहे. पूर्वीच्या दिवाळीची शिदोरी आमच्या पिढीतील मंडळींना पुरतअसली तरी अशीच चांगल्या गोष्टींची शिदोरी आणि शिकवण आपल्याला पुढच्या मुलाबाळांना द्यायची आहे, याचे भान ठेवून प्रकाशाचा उत्सव आपण सर्वजण साजरा करू या.

मो. नं. 9423968964

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com