वावीमधील शाहीर परशरामांची समाधी

वावीमधील शाहीर परशरामांची समाधी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी हे शाहीर परशरामांचे स्थान आहे. या गावी त्यांची समाधी आहे .पेशवाईच्या काळातील या शाहिराचे स्थान वेगळे होते. त्यांस विठ्ठलाचा वरदहस्त लाभला होता, असा सामान्यांचा विश्वास होता. संपूर्ण भारतभर विशेषतः मराठी भाषिकांच्या मुलुखात त्यांनी स्वच्छंद मुलुखगिरी केली. राजे रजवाड्यांबरोबर सामान्य जनांनाही तितक्याच प्रभावीपणे रिझविले. वावी येथे परशरामांचे घराणे वाढले. या गावाच्या आसपास असलेल्या दहिवाडी, मायगांव, बेलापूर, चास, मोर्वीस, उजणी, पंचाळे, धामोरी, सांगवी, मंजूर इ. गावात शाहिरांच्या लावण्या म्हणणारे काही लोक आजही असल्याचे दिसतात.

परशरामांचा जन्म वावी येथे सन 1754 मध्ये झाला असे सांगतात. परशराम वयाच्या 90 व्या वर्षी वारले. परशरामही आपला वडिलोपार्जित शिंपी व्यवसाय करीत होते असे चरित्रकार सांगतात. ‘सुई दोन्याला हयात’ या लावणीतही ते आपल्या पेशाचा उल्लेख करतांना दिसतात. परशरामांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले असे सांगतात. परशरामांनी मराठी महाभारत, रामायण, तुकाराम, नामदेवांच्या रचनांचे वाचन केलेले होते. त्यांच्यात बहुश्रुतता होती.

वावी जवळच्या मंजूर गावानजिकच्या जंगलात एक विठ्ठलाचे पडके मंदिर होते. त्या मंदिरात जाऊन त्यांनी कडकडीत उपोषण केले. त्यावेळी त्यांचे वय 15-16 वर्षाचे असावे. तिथेच त्यांना साक्षात्कार झाला अशी आख्यायिका आहे. परशराम आपल्या प्रत्येक लावणीच्या शेवटी स्वतःच्या नावाच्या आधी ‘नामी विठ्ठल’ ’नामे विठ्ठल’ किंवा ‘वरदी विठ्ठल’ असा उल्लेख करतात.

शालिग्राम यांनी परशराम यांच्या गुरुसंबंधी आणखी एक माहिती दिलेली आहे ती अशी देवपूरकर (ता. सिन्नर) बाबा भागवत हे परशरामांचे गुरु. भागवतांचा अनुग्रह झाल्यावर काही अभंग, पदे करावीत असे परशरामांच्या मनात आले. श्री पांडुरंग हे परशरामाचे उपास्य दैवत. पंढरपूरचे वाटेवरील पाय परशरामांस अत्यंत प्रिय. गुरुकृपेमुळे परशरामांस दृष्टांत झाला की अभंग झाले आहेत. लावण्या पोवाडे करावेत’ नंतर ते लावण्या, पोवाडे करू लागले. सध्या उपलब्ध परशरामांच्या लावण्या व पोवाड्याची संख्या 140 आहे.

प्रारंभीच्या काळात वीणेच्या साधीवर ते स्वतःच लावण्या म्हणत होते. कोल्हारकर संपादित संग्रहातील चरित्रात असे म्हटले आहे की परशरामांनी तमाशाच्या धंद्यात शिरावे हे त्यांच्या आईला पसंत नव्हते. ते स्वभावतःच कविवृत्तीचे होते. त्यांचे गुरु बाबा भागवत. त्यांच्या सहवासाने व संत वाङमयाच्या परिशीलनाने त्यांच्या काव्य शक्तीला घुमारे फुटले. परशरामांच्या वरदी अधिकारामुळे ते पारशाहिरात अधिक मान्यता पावू लागले.

शाहिरीमध्ये कलगीतुरा असे पक्ष असतात. परशराम हे कलगी तुर्‍याचा समन्वय साधणारे आहे असे त्यांच्या लावणीवरुन दिसते. त्यांची राहणी अगदी साधी होती. परशरामांची लोकप्रियता त्यांच्या परिसरात झपाट्याने वाढत गेली. वीणा हाती घेवून पदाच्या सुंदर चालीने कर्णमधुर सुरात लावण्या म्हणत. त्यांच्या लावण्या ऐकण्यासाठी हजारो लोकांचा जमाव जमत असे. परशराम कधी कधी डफ वाजवित असत. बाबा सातभाई, मलु राज हे परशरामांस जोडीदार होते..

1818 पासून मृत्युपर्यंत म्हणजे 1844 पर्यंत त्यांनी उत्तरेतल्या बर्‍याच वार्‍या केल्या. ग्वाल्हेरच्या वारीत तीन हजार रुपये रोख, नऊ दुपट्टे आणि बागेतली दोन घोडी त्यांना मिळाली. इंदूरला ते दोन वेळा गेले. एकदा मल्हारराव होळकरांच्या कारकिर्दीत, दुसरे हरिहररावांच्या कारकिर्दीत.

बडोद्यास तर दरसाल जाण्याचा त्यांचा शिरस्ता होता. थोरल्या सयाजीराव महाराजांनी त्यांना एक भारी दुपट्टा व पागोटे तिथल्या तिथे बक्षीस दिले होते. आज वावीस परशरामांचे निवासस्थान म्हणून एक पडके घर दाखवितात, ते गावाबाहेर आहे. तिथे परशराम भजनासाठी व चिंतनासाठी बसत असे सांगतात. इतर शाहिरांपेक्षा परशरामांची पहिली लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे ते ‘वरदी’ होते. गुरुकृपेने त्यांना संतत्व प्राप्त झाले होते, ते इतर लावणीकारांपेक्षा वेगळे होते, त्यांच्याभोवती अद्भूततेचे वलय होते.

परिसराचा अभिमान

परशरामांना आपल्या गावाचा व परिसरचा सार्थ अभिमान होता. ते त्यांच्या रचनेत खूपदा वावी गाव परिसराचा उल्लेख करतांना दिसतात. त्यादृष्टीने पुढील उल्लेख लक्षात घेण्यासारखे आहेत. वावी गाव कुठे आहे व त्याची प्रसिद्धी काय ते सांगतांना ते म्हणतात

‘वावी गाव धनवटी परशरामी महशूरी

विठू परशराम गातो, लावणी महशूर दक्षणंत’

रामकृष्ण गुणी रामा गातो ठिकाण मूळ वावी ।

परशराम धार्मिक प्रेरणेतून आपली लावणी रचना करीत होते तरी आजूबाजूच्या समाजाला विसरले नव्हते. परशरामांनी लावणीत रेखाटलेली. ‘स्त्री’ अनेक रूपात दिसते. करुण रसाची निर्मितीही ते चांगली करतात. परशराम विविध स्वरूपातील शृंगाराची चित्रे रेखाटतात, इतके वैचित्र्य सहसा इतरात दिसत नाही.

आजमितीस वावी गावात परशराम महाराजांचे समाधीस्थळ व मंदिर आहे. समाधीस्थळी शेजारी भव्य हेमाडपंती वैजेश्वराचे मंदिर, जुनी पाण्याची बारव, राममंदिर, कानिफनाथ मंदिर, ढगाईदेवी मंदिर, हनुमान मंदिर अश्या मंदिरांनी परिसर व्यापलेला आहे.

(शाहिर वरदी परशराम, डॉ. गंगाधर ना. मोरजे या पुस्तकाच्या आधारे )

- राम सुरसे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com