किल्ल्यांचे मालेगाव

किल्ल्यांचे मालेगाव

मालेगाव हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. मालेगाव आणि मालेगाव भोवतालचा परिसर हा राष्ट्रकूट घराण्यातील तिसरा सम्राट इंद्रराज याच्या राज्याचा भाग होता. त्या काळचे जे ताम्रपट आढळले आहेत त्या ताम्रपटात मालेगाव चा उल्लेख ‘माहुली ग्राम’ असा करण्यात आला आहे. मालेगावात तीन किल्ले आहेत.

मालेगावचा भुईकोट

इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारी एक अत्यंत महत्त्वाची वास्तू मालेगाव शहरात आहे आणि ती म्हणजे भुईकोट किल्ला!

नारोशंकर राजेबहादूर यांनी मालेगावचा भुईकोट किल्ला बांधला. नारोशंकर सुरूवातीला उदोजी पवार यांच्या अधिपत्याखाली शिलेदार होते. सन 1730 च्या सुमारास ते मल्हारराव होळकरांच्या पदरी दाखल झाले. मग ते इंदोरचे सुभेदार झाले. सन 1742 मध्ये त्यांनी ओरछा जिंकून घेतले. त्यानंतर ते चौदा वर्षे झाशी येथे वास्तव्यास होते. होळकरांच्या पदरी असताना नानासाहेब पेशव्यांनी सन 1760च्या पूर्वी त्या काळच्या निंबायती परगण्याची जहागिरी नारोशंकर यांना दिली होती. नारोशंकरांनी स्वतःला राहण्यासाठी निंबायती येथे मोठा वाडा बांधला आणि तेथे ते राहू लागले. निंबायती हे गाव आता मालेगाव तालुक्यात आहे.

मालेगाव परिसर आणि निंबायत परगणा यांचा बंदोबस्त चोख रहावा यासाठी नारोशंकरांनी मालेगावला भुईकोट किल्ला बांधला. सन 1757 मध्ये सरदार नारोशंकर हे मालेगावी आले आणि येथे त्यांनी भुईकोटाच्या उभारणीस सुरुवात केली. सन 1765 च्या दरम्यान मालेगावचा हा भुईकोट बांधून पूर्ण झाला.

दक्षिण हिंदुस्थानात बांधल्या गेलेल्या भुईकोट किल्ल्यांमध्ये मालेगावचा भुईकोट सगळ्यात शेवटी बांधला गेला. नारोशंकरांनी किल्ला बांधण्यासाठी निवडलेली जागा खरोखर वाखाणण्याजोगी आहे! मोसम नदीचे पात्र या जागेला वळसा घालून गेले आहे. गिरणा आणि मोसम यांच्या संगमाच्या अलीकडची जागा किल्ला बांधणीसाठी योग्य आहे हे नारोशंकरांनी ओळखले.

दोन्ही नद्यांच्या संगमाच्या पाण्याचा उपयोग किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्यांनी केला. संगमाजवळ एक टेकडीवजा डोंगर होता. त्याचे दगड फोडून बांधकामासाठी वापरण्यात आले. संगमाच्या ठिकाणी छोटीशी भिंत बांधून नद्यांच्या संगमाचे पाणी तेथे अडवून ते सरळ किल्ल्याभोवती खोदलेल्या खंदकात येईल अशी व्यवस्था केली गेली. गिरणा नदी त्या काळात बारमाही वाहणारी नदी होती. त्यामुळे नदीचे पाणी भिंतीद्वारे अडून आपोआप किल्ल्यावर त्यांच्या खंदकात येत असे आणि किल्ल्याचे रक्षण होत असे.

या संगमावरील भिंतीचे अवशेष आजही आपल्याला नदीपात्रात पाहायला मिळतात. खंदकात चारही बाजूने पाणी खेळत असल्याने बाहेरील शत्रूला किल्ल्यात येणे अशक्य असे. हा खंदक सुमारे 25 ते 30 फूट खोल आहे. किल्ल्याला बाहेरच्या बाजूने मोठी विस्तीर्ण तटबंदी आहे. तिचे काही बुरुज आजही आपल्याला पाहायला मिळतात. पुढे थोडे अंतर राखून मुख्य खंदक आणि तटबंदी लागते. किल्ल्याला एकाच्या आत एक अशा दोन भिंती आहेत. किल्ल्याची मूळ इमारत चौकोनी आहे. प्रत्येक कोपर्‍यावर मजबूत गोलाकार बुरुज आहेत. बुरुज आणि भिंती यावर पाकळीयुक्त ‘चर्या’ पद्धतीचे बांधकाम आहे. किल्ल्याला एकूण दहा बुरुज आहेत. किल्ल्याच्या बाहेरील भिंती थोड्या ओबडधोबड आहेत. परंतु किल्ल्याच्या मुख्य इमारतीचे बांधकाम उत्तम, नमुनेदार आणि रेखीव आहे.

भुईकोट उत्तराभिमुख आहे. किल्ल्याला एकूण नऊ दरवाजे होते असे म्हणतात. सध्या सात दरवाजे अस्तित्वात आहेत. यातील दोन दरवाजे प्रत्यक्ष वापरात आहेत. पश्चिमेकडील मुख्य तटबंदीमधील दरवाजा बंद केला आहे. उरलेले चार दरवाजे रंगमहालाला जोडणारे आहेत. हे दरवाजे भक्कम लाकडापासून बनवलेले होते. उत्तरेकडील प्रमुख दरवाजावरील दगडी बांधकाम अप्रतिम आहे. हा दरवाजा ओलांडल्यावर आत एक चौक लागतो. नंतर आपण किल्ल्याच्या मुख्य भागात प्रवेश करतो.

इथूनच डाव्या हाताला म्हणजे किल्ल्याच्या पूर्व बाजूस एक भव्य दरवाजा असून तो रंगमहालाकडे जातो. त्यानंतरचा दरवाजाही उत्तम अवस्थेत आहे. या दरवाजांच्या चौकटी मात्र पूर्णपणे दगडी असून दरवाजे सागवानी लाकडात बनवलेले आहेत. या दरवाजांमधून आपण रंगमहालाच्या मुख्य भागात येतो. येथून वर बघितल्यास प्रवेशद्वारावर दोन कमानयुक्त खिडकीवजा खोल्या आहेत. तसेच आणखी डावीकडे आत गेल्यावर आपल्याला एक जिना दिसतो. तो चढून वर गेल्यावर आत कमानींचा मोकळा रस्ता आहे. या कमानयुक्त रस्त्यास लागून दोन टेहळणी खिडक्या आहेत. त्यावर लाकडी झडपांची कोरीव कामे आहेत. पायर्‍या आणि कमानींच्या रस्त्यास जोडणारा एक दरवाजा पूर्वी होता.

तो आता अस्तित्वात नाही. पायर्‍या चढून गेल्यावर आपण उत्कृष्ट नक्षीकाम केलेल्या कोरीव छत्र्यांजवळ येऊन पोहोचतो. हे किल्ल्याचं शेवटचं ठिकाण. पूर्वी इथून टेहळणी केली जात असावी. या छत्र्या काळ्या पाषाणयुक्त असून त्यांचे नक्षीकाम उत्कृष्ट आहे. ऊन-वारा-पावसामुळे कमानींचा दगड ठिसूळ झाला आहे. त्यामुळे या छत्र्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. कमानीयुक्त रस्ता आणि छत बांधण्यासाठी पूर्णतः चुन्याच्या विटा वापरलेल्या आहेत.

छत्र्यांच्या उत्तरेकडे असलेल्या बुरुजावर भगव्या ध्वजाचा स्तंभ आहे तर पूर्वेकडील बुरुजावर तिरंगा ध्वजाचा स्तंभ आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी अनेक दगडी जिने आहेत. या दगडी जिन्यांवर हवेची आणि प्रकाशाची सोय केलेली आहे. अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस पायर्‍या आहेत. याच किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी भुयारी मार्ग होता असे म्हणतात. किल्ल्यात पाणी पुरवठ्यासाठी एक विहीर खोदलेली आहे. आजही तिला मुबलक पाणी आहे. सन 1775 पर्यंत सरदार नारोशंकर दाणी राजेबहादूर यांचे वास्तव्य या किल्ल्यात होते.

गाळण्याचा किल्ला

मोगलांच्या काळात गाळणा हे गाव खान्देश सुभ्यातील जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण होते. मोगल काळात जिल्ह्याला ‘सरकार’ या नावाने ओळखले जाई. मोगलांच्या काळात सरकार संगमनेर, सरकार बागलाण आणि सरकार गाळणा असे तीन सरकार किंवा जिल्हे होते. गाळणा हा जिल्हा लहान होता. त्यात सात महाल किंवा तालुके होते. मालेगाव हे गाळणा जिल्ह्यातले एक खेडे होते.

मालेगावच्या उत्तरेस 32.7 किमी अंतरावर गाळणा नावाचे छोटेसे गाव आहे. येथे एक डोंगरी किल्ला आहे. तो गाळण्याचा किल्ला नावाने ओळखला जातो. गाळण्याचा किल्ला स्थानिक हिंदू राजाच्या ताब्यात पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत होता. त्यानंतर काही काळ हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता तर काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता.

‘खान्देशचे नाक’ असाही गाळणा किल्ल्याचा उल्लेख केला जातो. हा किल्ला म्हणजे बागलाणचे दक्षिणेकडचे प्रवेशद्वारच आहे. मध्ययुगात हा किल्ला केळणा किल्ला या नावाने ओळखला जात असे. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 710 मीटर (अंदाजे फूट) इतकी आहे. गाळणा किल्ल्याचा इतिहास आणि त्याच्या बांधकामातील वैशिष्ट्ये यामुळे हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे!

गाळणा किल्ला नेमका कोणी बांधला, याचे उल्लेख कुठेच सापडत नाहीत. हा किल्ला बागुलवंशीय राठोडांनी 13 व्या शतकात बांधला असावा, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

बागुलवंशातील राजे, निजामशाही, आदिलशाही, मोगल, मराठे व इंग्रज यांनी गाळणा किल्ल्यावर राज्य केले. गाळणा किल्ल्यावर राज्य करण्याबरोबरच या राजसत्तांनी गाळणा किल्ल्यावर तटबंदी, बुरुज बांधून किल्ला अधिकाधिक मजबूत केला. याशिवाय या राजसत्तांनी किल्ल्यावर महालही बांधले. हैबतखान नावाचा एक किल्लेदार सन 1577 ते 1580 या काळात गाळण्याचा किल्लेदार होता. किल्ल्यात त्याने निजामशहासाठी एक राजवाडा बांधला होता या राजवाड्याचे बांधकाम दत्तो त्रिमुरारी यांनी केले. हा राजवाडा ‘मुराद’ या नावाने ओळखला जातो.

गाळणा किल्ल्याला चार दरवाजे आहेत. परकोट, लोखंडी, कोतवाल आणि लाखा या नावांनी हे दरवाजे ओळखले जातात. गाळणा गावाभोवतीच्या दोन तटबंदी धरून या किल्ल्याला एकूण सहा तटबंदी होत्या.

मशीद, पडका रंगमहाल, वाडा, विविध शिल्पे आणि सुंदर महिरपी, अंबरखाना, मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे गाळणा किल्ल्यावर आहेत. किल्ल्यावर झालेली बांधकामे, किल्ल्यात झालेल्या घडामोडी यांचा इतिहास सांगणारे अनेक शिलालेख गाळणा किल्ल्यावर आहेत. अफलातून खान या निजामशाहीतल्या किल्लेदाराने गाळणा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे केली होती. याचा उल्लेख किल्ल्यावर आढळणार्‍या चार शिलालेखात सापडतो. या शिलालेखांचा कालावधी सन 1562 ते 1571 या दरम्यानचा आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडचा एक बुरुज मोहम्मद अली खान याने बांधल्याचा उल्लेख सन 1583 च्या एका शिलालेखावर आढळतो.

पूर्व दिशेला असलेल्या लळींग किल्ल्याचे टोक तसेच खानदेशचा काही भूप्रदेश गाळणा किल्ल्यावरून दिसतो. धोडप, कंक्राळा हे पश्चिमेकडे असलेले किल्ले गाळणा किल्ल्यावरून दिसतात. तर उत्तर दिशेला असलेले तापी नदीचे खोरे तसेच सातपुड्याची पर्वतरांग या किल्ल्यावरून दिसते. दक्षिण दिशेला असलेले पांझरा नदीचे खोरेही गाळणा किल्ल्यावरून दिसते. गाळणा गावातील अष्टकोनी आकाराची बारवही पाहण्यासारखी आहे. ही बारव 20 फूट खोल असून तिची लांबी व रुंदी प्रत्येकी 25 फूट आहे.

कंक्राळ्याचा किल्ला

मालेगाव शहराच्या उत्तर दिशेकडे अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांना ‘गाळणा टेकड्या’ असे म्हणतात. या टेकड्या थेट धुळ्यापर्यंत पसरलेल्या आहेत. यापैकी काही टेकड्यांवर किल्ले बांधलेले आहेत.

गाळणा किल्ल्याच्या नैऋत्येला कंक्राळ्याचा किल्ला आहे. कंक्राळ्याचा किल्ला छोटा आहे पण टुमदार आहे!

मालेगावपासून करंजगव्हाणमार्गे सुमारे 22 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. कंक्राळा डोंगराच्या माथ्यावर असलेल्या दोन टेकड्यांमधून खाली एक घळ उतरलेली दिसते. त्या घळीतूनच किल्ल्यावर जावे लागते. या घळीत सीताफळाची झाडे आणि काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणावर आहेत. खिंडीत पोहोचल्यावर एक दगडी तटबंदी असलेली भिंत आपल्याला दिसते. ही तटबंदी डावीकडच्या टेकडीवर जाते. तिकडे एक गोलाकार बुरुज आहे.

उजवीकडे एक उभा कातळकडा आहे. त्यात बाराही महिने पाणी असलेली टाकी आहेत. किल्ल्याच्या उजवीकडील आणि डावीकडील भाग थोडा उंच आहे. त्यामुळे त्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे. इथे दगडी तटबंदी बांधलेली आहे. इथून आपण थोडे पुढे गेलो की किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे अवशेष आपल्याला दिसतात. ढासळलेल्या प्रवेशद्वारातून पुढे गेलो की आपल्याला पाण्याची काही टाकी आणि घराचे अवशेष दिसतात. किल्ल्यात काही जोतीदेखील पाहायला मिळतात. कंक्राळ्याच्या किल्ल्यावरून अनेक छोट्या छोट्या टेकड्या दिसतात तसेच गाळण्याचा किल्ला देखील दिसतो.

कंक्राळाच्या किल्ल्याबाबत फारशी माहिती ऐतिहासिक दस्तऐवजात सापडत नाहीत. त्यामुळे या किल्ल्याच्या इतिहासाविषयी फारशी माहिती कोणालाच नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com