Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअखेरची भेट

अखेरची भेट

मनीषा माधव उगले

तसे तर रोजच भेटतो आपण

- Advertisement -

पण कोणती असेल आपली

अखेरची भेट?

बघू का आपण एकमेकांना

डोळे भरून?

घेतलेला असेल का आपण

त्या दिवशी

शेवटचा हात हातांत

ज्या स्पर्शातून जिवंत होईल

आपल्या काळाचा अवघा पट,

आपले भिरभिरत्या फुलपाखरासारखे सोनेरी दिवस,

आपण मिळून पाहिलेली मोरपंखी स्वप्नं!

खुलं केलेलं असेल का आपण काळजात जपून ठेवलेलं एखादं

निर्वाणीचं परमसत्य अतीव विश्वासाने परस्परांजवळ?

मागितलेली असेल का माफी

आणि केलेलं असेल का माफ एकमेकांना

आपण कळत नकळत केलेल्या चुकांसाठी?

घेतलेलं असेल का त्या दिवशी आपण चुंबन

एकमेकांच्या भालप्रदेशाचं?

जे नसेल कमी एखाद्या दिव्य आशीर्वादाहून!

त्याक्षणी ओघळलेले असतील का डोक्यावरून दोन कढत अश्रुंचे थेंब

जे दाटलेले असतील आपल्या डोळ्यांत

हृदयीचं आर्त होऊन?

रेंगाळलेलो असू का आपण त्या दिवशी निरोप घेताना बराच वेळ?

घुटमळू का एकमेकांच्या अवतीभवती उगीच काही निमित्त काढून?

येईल का आपल्याला शंका

त्याक्षणी,

की यानंतर आपण कधी एकमेकांना बघूच शकलो नाही तर?

खरंच असू का आपण इतके नशीबवान?

शेवटच्या भेटीची चाहूल लागण्याइतके?

तुला काय वाटतं?

ऐक ना,

यापुढे प्रत्येक भेटीला

शेवटचीच समजूयात का आपण?

8805334026

- Advertisment -

ताज्या बातम्या