शोध

शोध

मारूती वि. पाटील

सगळी गडबड पाहून नरकेअण्णा पुढे होऊन म्हणाले, ‘हे बघ, तोंडाला पदर लावून दारातूनच जेवण आत सरकीव की, काय खातोय तुला व्हय तो, तेजा त्यो ताट घिऊन खाईल की. तुजा दाल्ला हाय त्यो, एवढं कळतंच की त्येला’. ...हे सगळं बोलणं देशमुख मास्तर गपगुमान ऐकत होते. त्यांचे डोळे आता ओले झाले होते.

गजानन देशमुख मास्तर. सारी पंचक्रोशी त्यांना देशमुख मास्तर म्हणूनच आदराने ओळखायची. देशमुख मास्तर सार्‍यांच्या अडल्यानडल्यालांना मदत करायला पुढे असायचे. त्यामुळे सगळीकडे त्यांना मान होता. दोन्ही मुलांना चांगले शिकवून चांगल्या ठिकाणी नोकरीत स्थैर्य मिळाल्यांने घरी कुटुंब सुखी होते. आता ते साठीला आले. वडिलार्जित देशमुख वाड्याची डागडुजी करून त्यांनी आधुनिक टच देऊन सगळ्या सोयीसुविधा या वाडारूपी घरातच उपलब्ध केल्या होत्या. रितसर सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले जनसेवेचे व्रत कमी अधिक प्रमाणात तसेच चालू ठेवले होते. सकाळी लवकर उठून फिरायला जाणे, शिवारात फेरफटका मारणे, त्यानंतर देवदर्शन आणि घरी आल्यानंतर कुटुंबात सुना नातवंडात वेळ घालवणे असा त्यांचा नित्यक्रम ठरलेला असायचा.

दरम्यान, अचानक कोरोना संसर्गामुळे सरकारने देशभर टाळेबंदी जाहीर केली, आणि सगळे जग जणू आहे तिथे थांबले. या सांसर्गिक आजाराच्या जागृतीसाठी गावागावात, वाडी-वस्त्यांत, काय काळजी घ्यायची, तसेच जागृतीसाठी पोलिस, आरोग्य प्रशासनाकडून जनजागृती सुरू झाली. लोकांना या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी घरीच थांबण्याची सक्ती करण्यात आली. सहाजिकच देशमुख मास्तरांनाही आपल्या नित्यक्रमात बदल करावा लागला. पण त्यांनी ते जमवून घेतले.

आजही नेहमीप्रमाणे ते उठले. त्यांनी आपला नित्यक्रम पूर्ण केला. सकाळपासून ते ठणठणीत होते; पण संध्याकाळी त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. सात वाजता तर त्यांना जोराचा ताप भरला. चक्कर येऊ लागली, अंग दुखू लागले. ताप काही केल्या कमी होईना. मग घरच्यांना शंका येऊ लागली की ही सगळी लक्षणे कोरोनाग्रस्त रुग्णाची तर नाहीत?

आता सगळ्या कुटुंबातील वातावरण अचानक भयभीत आणि चिंतीत असणार्‍या वातावरणात झाले. त्यांचे अंथरूण पांघरूण घरापासून जवळच असणार्‍या गोठ्याजवळच्या एका रिकाम्या खोलीत आणून ठेवण्यात आले. त्या खोलीत येरवी धान्य आणि अडगळीच्या वास्तू ठेवलेल्या असायच्या. तर त्यात कायमचा रहिवासी असा मोती नावाचा त्यांचा कुत्रा होता, जे काही वर्षांपूर्वी रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका लहान कुत्र्याच्या पिल्लाला मास्तरांनी घरी आणून त्याची मलमपट्टी करून वाढवून त्या घरचा एक सदस्य म्हणून सांभाळले होते. देशमुख मास्तर त्याला नेहमी मोत्या नावानेच हाक मारत. तो नेहमी त्यांच्या सोबतच असायचा.

आता त्या खोलीत देशमुख मास्तर, त्याचा झोपायचा खाट आणि मोती कुत्रा एवढेच होते. घरच्या सगळ्यांनीच त्यांच्यापासून अंतर ठेवले होते. कोहीही त्यांच्या जवळ जायचे नाही अशा सुचना घरातल्या सगळ्यांना देण्यात आलेल्या होत्या. दोन्ही सुना-नातवंडे मोठ्या घराच्या दारातूनच मास्तरांकडे बघून जात होत्या. दोन्ही मुलांनी तर बोलणेच टाकलेे, जणू काही त्यांना दहशतवादीच जाहीर केले होते. हे सगळे पाहून मास्तरांची कधी नाही ती पहिल्यांदा स्वत:ची घालमेल होत असलेली जाणवू लागली होती.

प्रशासकीय यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमांकावर दुरध्वनी करून मास्तरांबाबत माहिती देण्यात आली. बातमी सगळ्या गावात झाली. पण त्याची चौकशी करायला कोणीही आले नाही. येरवी येता-जाता नमस्कार करणारे आज पहायला सुद्धा आले नाहीत. हे मास्तरांसोबत पहिल्यांदाच घडत होतं.

आपला तोल सांभाळत, हळूहळू काठी टेकवत शेजारच्या गल्लीतले शंभरीला आलेले नरके अण्णा तेवढे देशमुखांच्या वाड्याकडे आले. त्यांनी मास्तरांच्या पत्नीला, सारजाक्का यांना हाक मारली. तशा त्या सावरून बाहेर आल्या. ‘काय ओ मामंजी,’ म्हणून त्यांनी नरके अण्णांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, ‘ अगं, मास्तराला काहीतरी लांबूनच जेवायला घाला, नाहीतर ते हॉस्पिटलवाले उपाशीच तेला गाडीतनं घेऊन जातील बघं.’

‘बरं’ म्हणून सारजाक्का आत गेल्या. पण आता प्रश्न होता की मास्तरांना जेवण द्यायचे कोणी?

तेवढ्यात त्यांच्या दोन्ही सुनांनी जेवणाचे ताट आणि पाण्याचा तांब्या सारजाक्काच्याच हातात देऊन त्यांनाच पुढे केले. एर्हवी देशमुख मास्तरांना काय हवे- नको पहायला चडाओढ असायची, पण आज त्यांच्या जेवणाचे ताट कोणीही घेऊन जाईना. हातात जेवणाचे ताट आणि पाण्याचा तांब्या दिल्यानंतर सारजाक्काचे हातपाय अंगात कापरे भरल्यासारखे लटपटू लागले. त्यामुळे त्यांना आपले दोन्ही पाय जमिनीला चिकटल्यासारखे जड वाटू लागले. त्यांचे पायच उचलेनात.

ही सगळी गडबड पाहून नरकेअण्णा पुढे होऊन म्हणाले, ‘ हे बग, तोंडाला पदर लावून दारातूनच जेवण आत सरकीव की, काय खातोय तुला व्हय तो, तेजा त्यो ताट घिऊन खाईल की. तुजा दाल्ला हाय त्यो, एवढं कळतंच की त्येला’.

हे सगळं बोलणं देशमुख मास्तर गपगुमान ऐकत होते. त्यांचे डोळे आता ओले झाले होते. आता दारात पुढे येत ते म्हणाले, ‘ माझ्याकडे कोणीही यायची गरज नाही. मी बरा आहे. आणि हो मला भूकही नाही.’

सगळीकडे शांतता पसरली होती. त्या काळोख्या शांततेला कापत थोड्याच वेळात एक रुग्णवाहिका देशमुख वाड्याजवळ थांबली. त्यातून पांढरे रेनकोटासारखेे आवरण घातलेले, नर्स, वॉर्डबॉय, डॉक्टर वगैरे लोक खाली उतरले. त्यांनी देशमुख मास्तरांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर त्यांना रूग्णवाहिकेत बसण्यास सांगण्यात आले. उभ्या आयुष्यात त्यांनी कधी रूग्णवाहिकेत आपले पाऊल टाकले नव्हते. पण आज ती वेळ आली होती. तालुक्याच्या ठिकाणी जाताना थोरल्या मुलाला घेऊन दिलेली मोठी महागडी गाडीच त्यांनी वापरली होती. पण आज जणू मिनी दवाखाना असलेली ती गाडी पाहून त्यांना मळमळल्यासारखे वाटू लागले. स्वत:ला आवरत मास्तर उठले. शांतपणे त्यांनी आपली बॅग वजा सामान असलेली ती बॅग घेतली. पण त्याआधी त्यांनी आपण घरवजा वाड्याकडे पाहिले. घरचे सगळे पहिल्या मजल्यावर आपल्या तोंडावर मास्क लावून मास्तरांकडे पहात ऊभे होते. नातवंडे खिडकीत ऊभे राहून त्यांना निरखत होती. तर त्यांच्यामागे त्याच्या आया उभ्या होत्या. त्यांना रहावले नाही. ते पुढे झाले. त्यासरशी सुनांनी खिडक्या बंद करून घेतल्या. मास्तर तसेच पुढे गेले. त्यांना दाराच्या आत पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले उभे असलेली दिसली. पण त्यांच्या नजरा काहीशा तिरस्कारी वाटल्या. मास्तरांना मग आत जाण्याचे धाडस झाले नाही. त्यांनी वाड्याच्या उंबर्‍याला आपले हात लावून नमस्कार केला आणि ते निमूटपणे येऊन रूग्णवाहिकेत बसले. गाडी सुरू झाली. त्यासरशी त्यांच्या भावना उफाळून आल्या होत्या. नातवंडे खिडक्या उघडून त्यांना हाताने टाटा करत होते. क्षणभर त्यांना वाटले की आता आपले सगळे संपले.

त्यांचे डोळे भरून आले. शेवटचे मागे फिरून पहावे म्हणून त्यांनी आपल्या घराकडे पाहिले तर त्यांची पत्नी सारजक्का घरातून पाण्याची घागर आणून उंबर्‍यावर ओतून घराचा उंबरा धुन स्वच्छ करत होती. मास्तरांना चीड आली पण त्यांचा नाईलाज होता. त्यांनी आपली मान वळवली आणि डोळे बंद करू घेतले. पण मुक्या प्राण्याला भावना असतात. आपल्या मालकाची ही अवस्था पाहून त्यांचा मोती कुत्रा आपल्या जाग्यावरून उठला आणि क्षणात त्या गाडीच्या मागून धावायला लागला.

गजानन मास्तर रुग्णालयात 14 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिले. दरम्यान त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या. सगळ्याचा अहवाल चांगला आला. त्यानंतर त्यांना उपचारातून बरे झालेत म्हणून घरी सोडण्यात आले. ते दवाखान्याच्या दरवाजातून बाहेर आले. तर समोरच्या एका झाडाखाली त्यांचा इमानी मोती कुत्रा आपली शेपटी हलवत जणू त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. मास्तरांना पाहून तो धावत आला. त्यांना बिलगला. मास्तरांना जीवात जीव आला. आता मास्तरांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. कितीतरी वेळ त्यांनी आपल्या तुंबलेल्या आसवांना वाट मोकळी करून दिली...

जेव्हा त्यांच्या मुलांनी फुलांनी सजवलेली त्यांची घरची गाडी दवाखान्याच्या दारात आली तेव्हा ते तेथून आपल्या लाडक्या मोती कुत्र्यासोबत कुठेतरी निघून गेले होते. त्यानंतर ते कधीही कोणाला दिसले नाहीत. अजूनही त्यांच्या घरचे त्यांचा शोध घेताहेत. त्यांच्या शोधासाठी त्यांच्या छायाचित्रासोबत ‘आपण यांना पाहिलेत का?’ असा मजकूर असलेली पत्रके काही ठिकाणी आजही पहायला मिळताहेत. त्यासोबत त्यांची माहिती देणार्‍याला लाख रूपयांचे बक्षिस दिले जाईल असेही जाहीर केले आहे. पण...

... अजूनही ते दोघे सापडलेले नाहीत!

कोल्हापूर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com