रामरावांचे महानिर्वाण

रामरावांचे महानिर्वाण

संजय कळमकर

जिन्याच्या पायर्‍या उतरत असतानाच मांजर आडव यावं तसा सान्यांचा दिन्या आडवा आला, “काका, काका...” मी “काय रे दिन्या?”.... दिन्या म्हणा “रामराव मेले” मी जागीच गोठलो. हातातील डबा खाली पडला. उघडला आणि उंदराने बिळाबाहेर डोकवावे तसे आतले घट्ट बेसन बाहेर डोकवायला लागले. ते पाहून शेजारुन गेलेला साठे मोठ्याने हसला.

रामरावांच्या अंत्यविधीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. अत्यंत भांडखोर स्वभाव असल्यानं चाळीतलं कुणीही खांदेकरी होईना. अखेर भिकार्‍यांच्या युनियनची साथ घेतली आणि तिथून त्यांचा दणक्यातला अंत्यविधी पार पाडू लागलो... पण....

“निघा” जेवणाचा डबा माझ्यासमोर आदळत सौनं मला आदेश दिला.

आदेश देणं ही आमच्या सौची खास सवय आहे. लादेननं जिहादचा आदेश द्यावा तशी ती मला कायम आदेशच देत असते.

मी डब्बा उचलला. कोपर्‍यातील बॅग उचलून पाठीवर मारली.

“संध्याकाळी वेळेवर या”

“कशाला?” मी श्रृंगारीक आवाजात विचारलं.

“सिलिंडर संपलय” आणावं लागेल.

अगं कधीतरी प्रेमानं यायला सांग. कायम ‘गॅसवर’ काय ठेवतेस?

“अगं बाई... गॅसवर दूध... ”‘म्हणत ती आत पळाली”

“येऊ का?” मी किचनकडे पहात मोठ्यानं ओरडलो.

“थांबा... थांबा....”

“थांबलो गं... बायकोन प्रेमानं वाटं लावलं की दिवसही बरा जातो.”

ती बाहेर येऊन कमरेवर हात ठेवत ठसक्यात ओरडली,

“येताना कोपर्‍यावरच्या भाजीवाल्याकडे ताजा पालक मिळाला तर आणा...”

“हे काय सुलभा.... अगं ऑफिसात जाताना तरी प्रेमानं”

“कसलं प्रेम.... पुढच्या आठवड्यात पन्नाशी आहे तुमची. डोळ्यावर बाटलीच्या बुडासारखा जाड चष्मा, दात हालत आहेत. डोकं, तोंड फुटलेल्या कपाशीसारखं दिसतंय आणि कसलं ओ प्रेम. एव्हढासा जिना चढून आलात तर घाण्याच्या बैलासारखे हफापता...”

“ऑफिसात खूप थकतो गं....त्यामुळे होत असेल तसं.. पण सुलभा... इतर वेळेस जाऊ दे.... निदान मी ऑफीसात निघतो तेंव्हा तरी चेहरा हसरा ठेवत जा अगं... ती शेजारची मिनी बघ... पलीकडची आशा बघ... अगदी नवरे ऑफिसात जाईस्तवर ‘टाटा’ करीत उभ्या राहतात दारात...

“रिकामटेकड्या बाया या... जाताना बाय-आल्यावर हाय... आणि सार्‍या संसाराची हायहाय...

“हाय... हाय... ये मजबूरी...” असं ‘सँडसाँग’ गात मी पायात शूज चढवले.

उसकेबाज बडबड करत सुलभानं फडताळावरचा तंबोरा काढला. त्याच्या तारा माझ्या गळ्याकडे पाहात आवळल्या. रियाजाला बैठक टाकली. दोन-तीन वेळेस खाकरत नेहमीच नादुरुस्त असलेला हा साफ केला.

“थांब,” मी घाबरत ओरडलो, “मी बाहेर पडल्यानंतर तुझ्या गाण्याच्या रियाजाला सुरुवात कर. तू गायला लागली की लोक म्हणतात. काय नवरा आहे, उठ-सुठ बायकोला मारत असतो...”

माझ्या या बोलण्यावर प्रतिक्रिया म्हणून बायकोनं भसाड्या आवाजात रागाने ‘राग’ आळवायला सुरुवात केली. मी घाबरुन बाहेर पळालो.

जिन्याच्या पायर्‍या उतरत असतानाच मांजर आडव यावं तसा सान्यांचा दिन्या आडवा आला,

“काका, काका”

“काय रे दिन्या?”

“रामराव मेले”

मी जागीच गोठलो. हातातील डबा खाली पडला. उघडला आणि उंदराने बिळाबाहेर डोकवावे तसे आतले घट्ट बेसन बाहेर डोकवायला लागले. ते पाहून शेजारुन गेलेला साठे मोठ्याने हसला.

दिन्याने सरळ बॉम्बच टाकला होता.

“कधी? कुणी सांगितलं?”

“पप्पांनी...”

“ते कुठाहेत...?”

“गेले ऑफिसला... म्हणाले काकांना सांग, रामरावांची सोय लावा म्हणून...”

तसाच उलट्या पावली जिना चढलो.

बायकोचं गाणं ऐन रंगात आलं होतं. चाळीतील सारे रेडिओ-टिव्ही मोठ्या आवाजात चालू होते. सुलभा गायला लागली की लोक रेडिओ-टिव्हीवर कुठलाही कार्यक्रम असो तो ऐकणं पसंत करीत.

सगळीकडे संमिश्र कोलाहल माजला होता. या गदारोळात जिन्याजवळचं एक कुत्रं आमच्याकडे तोंड करीत रामरावांना परत बोलवल्यासारखं अभद्र आवाजात विव्हळत होतं.

मी दाणदाण दरवाजा वाजवला.

तंबोर्‍याची तार तुटावी तसा सुलभाचा आवाज खाडकन बंद झाला. त्याचक्षणी चाळीतले सर्व आवाज फटाफट बंद झाले. कुत्रही एकलव्याने तोेंडात बाण मारल्यासारखं गारगार पडलं.

दरवाजा उघडत तिनं तंबोर्‍याएवढं तोंड वासत विचारलं, “आता काय आहे?”

“अगं रामराव गेले?”

“मग तुम्ही का थांबलात?”

“अगं... गेले म्हणजे कुठं शॉपिंगला नाही गेले... मेले... वारले... खलास झाले...

“अगं बाई” काय म्हणता काय? सकाळी तर टॉयलेटच्या रांगेत दोन तास उभे असलेले पाहिले मी.

“आता उभे नाही...आडवे झालेत.”

“बरं झालं देव पावला. सार्‍यांशी भांडायचे ते मेले रामराव. त्यादिवशी एक लादी कापूस घेऊन आले म्हणे. घसेबाई, तुम्ही गायला लागलात म्हणजे कानात घालायला रोजरोज कापूस कुठं शोधायचा...?”

“खरं बोलायचे बिचारे”

माझ्या या बोलण्यावर बायकोनं खाडकन दरवाजा लावून घेतला.

खरं म्हणजे या जगात खरं बोलायची सोयचं नाही.

सुलभा गात असलेले राग चुकीचे असले तरी तिचा रामरावांविषयीचा राग मात्र चुकीचा नव्हता.

रामराव होते तसेच.

वंगण नसलेल्या गाडीच्या चाकासारखे ते कायम कूरकूरत असायचे. भांडणाचा त्यांना विशेेष छंद होता. मग त्याला कसलेही निमित्त लागे. एखाद्यानं अफगाणची बाजू घेतली की रामराव बुशचे खंदे समर्थक व्हायचे उलट कुणी बुशची बाजू घेतली की रामराव तालीबानचे प्रवक्ते असल्याच्या थाटात बोलू लागायचे. जातीवंत पैलवानाला व्यायामाशिवाय करमू नये तसे रोज कुणाशीतरी भांडल्याशिवाय रामरावांना जमत नसे.

रामराव पेन्शवर माणूस...!

चाळीच्या कोपर्‍यातील छोट्याशा खोलीत ते एकटेच राहायचे. स्वभाव स्वच्छंदी... पण बोलण्यात खवचटपणा होता. सकाळी संडासाच्या लाईनीत पुढच्याशी कुरापत्या काढून ते भांडायचे. शेवटी काठीने त्याच्या डबड्यावर फटका.. हा भांडणाचा शेवट ठरलेला ! तो पुन्हा टमरेल आणायला गेला की हे पुढे. एकदा तर राघूनाना आत आणि हे बाहेर असे भांडण सुरू होते. नाना बाहेर येऊन रामराव आत जावोस्तर चालू होते.

खाणावळीतून डब्बा यायचा. त्यावर उभा-आडवा हात मारीत रामराव चाळीच्या मध्यभागी असलेल्या वडाच्या झाडाच्या पारावर आडवे व्हायचे. तसल्या भयंकर कोलाहलातही मेल्यासारखे गाढ झोपी जायचे. पुन्हा उठले की ग्लासभर चहा... संध्याकाळी पुन्हा खानावळीचा डब्बा... आणि वेळ मिळेल तेंव्हा कुणाशीही तडाखेबाज भांडण!

एकंदर रामरावांचा आदर्श दिनक्रम असा होता. माझा स्वभाव लवचिक असल्याने मी रामरावांच्या तडाख्यातून सुटलो होतो. उलट त्यांच्या पेन्शनच्या पैशात अध्ये-मध्ये आमच्या ओल्या पार्ट्या व्हायच्या. आमच्यात एक झिंगलेला ओला स्नेह निर्माण झाला होता. त्यामुळे रामराव मेल्याचे दु:ख फक्त मला एकट्यालाच होणे साहजिक होते. त्यांच्या अंत्यसंस्काराचे त्रासदायक दु:खही अर्थात मला एकट्यालाच पेलवावे लागणार होते.

मी चाळीच्या मधोमध असलेल्या पाराजवळ आलो. रामरावांचा देह तेथे अखेरची वामकुक्षी घेत होता. बहुदा प्रेत उघडे नको म्हणून साने त्यावर चादर पांघरुन गेले असावेत.

माझं पे्रताजवळ जाण्याचं धाडस झालं नाही.

खांदा द्यायला चौघे शोधावे लागणार होते. तेव्हढ्यात गोखले दिसले. ते दबक्या पावलानं मला चुकवत आणि झाडाच्या खोडाआडून पसार होण्याच्या मार्गावर होते.

मी ओरडल्यावर ते दचकून थांबले.

“गोखले”

“बोला”

“रामराव गेले हो”

“छान”

“खांदा द्यावा लागेल”

“तुमच्या खांद्याला खांदा होता - बाकी सार्‍यांशी वांदा होता.”

“माणूस गेल्यावर सारं विसरावं लागतं गोखले...”

“तो रामराव.. मेला तरी भांडणाचं नाही विसरणार...”

जाताना यमाशी भांडला असेल. वर गेल्यावर इंद्राशी भांडेल.

“तुम्ही माझ्याशी का भांडताय गोखले, “थांबायचं नसेल तर चालू लागा”

“जातोच.. तुम्ही बसा शोधत खांदेकरी.... मी दिसलो की माझ्या टकलावर हासायचा.... इथपर्यंत ठीक आहे... पुन्हा आमच्या हिचे केस किती काळेभोर आणि लांबसडक आहेत म्हणायचा... मी विसरणार नाही रामरावाचं कुजकट बोलणं... वा रे वा! आमच्या हिला परवा म्हणतो कसा... तुमचे केस सुंदर... नवरा टकलू... त्यानं तुमच्याशी लग्न करुन केसानं गळा कापला हो तुमचा... वा रे वा!

गोखले रामरावांच्या देहाकडे पाहात असं काही-नाही बडबडत निघुन गेले.

मी पडल्या खांद्याने खांदेकरी शोधायला बाहेर पडलो. चौकातील गणा न्हाव्याच्या सलूनपुढे गर्दी होती. तरीही आशेने मी दुकानात गेलो. कुभारानं मडकं शेकून काढाव तसं गणा एका गिर्‍हाईकाचं तोंड चटाचटा चापल्या मारीत शेकत होता.

“गणा”

“आरं वा! वा! या साहेब या पाच गिर्‍हाईक झाले की लगीच तुम्हाला घेतो बसा... बसा!

आरे मी हजामतीसाठी नाही आलो. आमच्या चाळीत ते रामराव राहत होत ना... ते वारले बिचारे...!

“आरारा... वाईट झालं, चांगलं गिर्‍हाईक गेलं. दिवसआड यायचं म्हतारं डोकं भादरायला. “पण लई भांडायचं... तिळ भिजत नव्हता त्याच्या तोंडात.”’

“आता मिटले कायमचे भांडण. रामरावांना कुणी नाही जवळचं... आपल्यालाच न्यावा लागेल त्यांना स्मशानात.”

“नाय जमायचं सायेब... गिर्‍हाईकांची गर्दी बघितली का. मी तुमच्याबरोबर निघालो तर हेच मला उचलून स्मशानात नेतील....”

गणाच्या या बोलण्यावर सारी गिर्‍हाईक फिदीफिदी हसली. हसल्यानं दाढी करताना एकाला थोड लागलंही. तोच रामराव गेल्याची बातमी ऐकल्यासारख्या रडू लागला.

गणाकडे डाळ शिजेना. बाहेर पडलो. समोरुन परशा धोबी येताना दिसला.

“परशा...”

“रामराम साहेब.... लई दिस झाले कपडे नाय आले द्यायला. बाईसाहेब बी धुताना दिसत नाहीत.

“टाकतो उद्या-परवा कपडे.’ पण परशा तुला माहीत झालं का? तुझं हक्काच गिर्‍हाईक गेलं. रामराव गेले.

“आरं तिच्या. चार कपड्यांचे पैसे बुडवून गेलं की म्हतारं” नाम्यानं हिशेबाची बडबड सुरु केली. तसा मी तेथून काढता पाय घेतला.

मला यातना होऊ लागल्या. माणसानं आयुष्यात किमान चौघांशी तरी भांडू नये, असं कुणीतरी ‘थोर’ माणूस बोलण्याची गरज आहे. मग त्याचा सुविचार होईल आणि तो सगळीकडे लिहिला जाईल.

रामरावांना अँम्ब्युलन्समधून स्मशानात न्यावं का? पण तिथं अंत्यविधीला माणसं कोठून येणार? त्यात महिनाखेर असल्यानं पैशाचा प्रॉब्लेम! पेन्शन लवकर होते. पण पगार नाही. त्यासाठी तरी माणसानं लवकर रिटायर व्हावं.

शेवटी निश्चय केला. रामरावांचे खिशे चाचपायचे. इलाज नव्हता. त्यामुळे लाज बाळगण्याचाही प्रश्न नव्हता.

विमनस्क अवस्थेत चाळीकडे निघालो. तेवढ्यात मागून आवाज आला.

“पाच रुपये, दहा रुपये द्या साहेब.”

एक धष्ट-पुष्ट भिकारी भिक मागत होता.

“तू रुपया आठणे मागण्यापेक्षा डायरेक्ट पाच-दहा रुपयेच मागतो रे?”

“महागाई किती वाढलीये साहेब... पैशात भिक मागणं परवडत नाही.”

“जा बाबा महिनाअखेर आहे.”

“म्हणूनच कमी मागतोय”

“माफ कर बाबा.. इथं विष खायला पैसा नाही?”

“मी देऊ का?”

“काय? विष”

“नाही पैसे ! आम्ही लई लोकांना व्याजानं पैसे देतो साहेब.

“आधीच निम्मा पगार व्याजात जातोय.”

“आमचं परवडलं... फ्लॅट रेंटनं देतो साहेब...”

“गप्प ए....” मी किंचाळलो.

तसा तो माझ्या अवस्थेला हसत पुढे सरकरला. अचानक माझ्या डोक्यात विज चमकली.

“ए... थांब... थांब... मी जोराने किंचाळलो”

“ तो थांबला.”

“माझं एक काम करशील?”

“सांगा...”

“एका माणसाला उचलून स्मशानात न्यायचंय...”

“दोनशे रुपये पडतील”

“इतके?”

“कोण, कुठला माणूस? उगाच खांद्यावरुन वाहायचा. फुकटात येऊ काय?”

रामरावांच्या खिशात निदान हजारेक रुपये तरी असतील. नसेल तर घरातून घेऊ गूपचूप! सूलभा तंबोर्‍यात पैसे लपवून ठेवते हे मला माहित होते.

ठीक आहे तू आणि मी! झालो दोघे अजून दोन मिळतील का? “इथचं थांबा साहेब... युनियनच्या हापिसात जाऊन दोन माणसं घेऊन येतो.

“तुमचीपण युनियन आहे का?”

“लई स्ट्रांग... आम्ही आता मुंबईत धरणं धरणार आहोत?”

“कशासाठी?”

“विधानपरिषदेवर आमच्यातला एक प्रतिनिधी घ्यावा म्हणून”

“भिकार्‍यांनो-तुम्हाला प्रतिनिधीत्व कशाला?”

“देशाला भिकारी करायला” असं म्हणत तो मोठ्यानं हसला.

“आन अजून एक मागणी करणार?”

“कुठली?” त्याच्याशी बोलताना रामराव गेल्याचं मी विसरुन गेलो.

“आम्हाला नॅशनल परमीट दिलं पाहिजे... ”

“कशाचं?”

“कोणत्याही राज्यात जाऊन भिक मागायचं....”

“वा! वा!”

नंतर एकदम निघत तो म्हणाला

आणू का मग अजून दोघं?”

“आण... पण रेट जरा कमी...”

“जमणार नाय. फिक्स रेट. इथं नातेवाईक खांदा द्यायची पाळी आली तरी लांब जाऊन उभे राहातेत. आम्ही तर परके. आज बरं का साहेब... नेणार्‍याला इतकं आल्हाद नेऊया की त्याला वाटाया पायजे आपण जिवंत असतो तर बरं झालं असतं. ”

“बरं... बरं... आण...”

तो पळाला.

मी चाळीत आलो.

गॅलरीत गर्दी जमली होती.

मी घरात गेलो तशी सुलभा ओरडली,

“रामरावानं मृत्यूपत्रात काही लिहून ठेवलंय काय तुमच्यासाठी?”

“हो... हो... तू चूप बैस...”

“काय चूप? उचलायला खांदेकरी मिळतात का पहा आधी?”

आत येतील. भिकारी असले म्हणून काय झालं?

“म्हणजे आता तुम्ही भिकार्‍यात सामील होणार? ”

“खरे भिकारी हे चाळकरी आहेत. जे खांदा द्यायलाही तयार नाहीत.”

‘याच्यासाठी माणसानं निट वागावं... अहो प्रेतामागे रडायला बाई यायची नाही एकही.”

बायकोच्या अशा चिडण्यानं मी इरेला पेटलो. ताडताड बाहेर निघालो.

मागे धावत तिनं विचारलं, “कुठं”

तु बघतच रहा. रामरावांची अशी अत्यंयात्रा काढतो की सार्‍या शहरानं तोंडात बोट घातलं पाहिजे.

त्या नादात मी जिना उतरल्याचेही मला समजले नाही. नेत्याची सभा जोरदार करायची असा चंग बांधलेल्या कार्यकर्त्यासारखं माझ्या अंगात वारं संचारलं होतं. त्या धुंदीतच मी शहराबाहेरच्या एका गल्लीत येऊन पोहोचलो.

जेथे अनेक रिकामटेकड्या बाया आणि पुरुषांचे जथ्ये पानाप्रमाणे गप्पा चहाळत बसलेले दिसायचे.

बायांचं एक टोळकं दिसल. पुरुषाशी बोलावं म्हटलं तर कुणी पुरुष दिसेना.

“बाई... मला पुरुष पाहिजे...”

माझ्या या बोलण्यावर बायांचं ते टोळकं तोंडावर पदर घेऊन फिदीफीदी हसायला लागलं.

“कशाला...?” एका बाईनं मिश्कीलपणे विचारलं.

“काम होतं जरा....”

“आम्हाला सांगा की...’

“पुरुषच पाहिजे...”

“ये बया... वेगळाच बाबा दिसतोय ह्यो... आरंं आमची सारे माणसं पुढार्‍यानी नेलेत टाळ्या वाजवाया...”

“टाळ्या वाजवायला म्हणजे”

“आवं सभा हाये त्या खालच्या चौकात. एक मंत्रीबी येणार हाय. आमची शंभर माणसं नेलेत. शंभर रुपया रोजानी! मंत्री काहीही बोलला तसे टाळ्या वाजवायला सांगितलयं... तेनला... ”

“मी पण अशाच कामाला आलोय. एक मेलेल्या माणसामागे रडायचंय... जमलं का?”

त्या पुन्हा फिदीफिदी हसायला लागल्या.

“हसायचं नाही, रडायचंय...”

“दोन-दोनशे घेऊ...”

“फार होतात ओ....“ मी काकूळतेला येत म्हणालो.

“आरं बाबा... त्या सिनेमातल्या बया डोक्याला औषीध लावून खोट-खोट रडत्यात... ते बी मरणाचे पैसे घेत्यात....”

इथं तर आम्हाशी खरं-खरं रडायचंय...”

“बरं... चला तिघी-चौघी...”

“पदरानं वाराबी घालायचा का रं बाबा?” एका म्हतारीनं विचारलं.

“हो....”

“त्येच पेशल भाडं पडन...”

मला अंगावरुन वारं गेल्यासारखं झालं.

“चला बयानो... चला... म्हणताल ते करू पण अंत्ययात्रा कशी धूमधडाक्यात झाली पाहिजे...”

बायांना घेऊन मी चाळ गाठली.

तोपर्यंत भिकारी बाकी दोघांना घेऊन उभा होता.

पैशाचा बोजा वाढला होता. अंगावरची चादर नीट करण्याच्या निमित्ताने मी रामरावांचे खिशे चाचपले. खोलीची चावी आणि देणेकर्‍यांच्या पावत्या सापडल्या.

भिकार्‍यांचे कपडे खुपच घाण होते. चावी त्यांच्यावळ दिली म्हणालो. “जा... खोलीतून रामरावांचे कपडे घालून या...”

तेवढ्यात एका बाईनं आश्चर्यानं विचारल,

“कावी सायेब” या मेलेल्या माणसाची बायको वर जाऊन एवढ्या मोठ्यानं का रडतीया?”

‘ती त्या मेलेल्या माणसाची नाही-माझी बायको आहे. तंबोर्‍यावर गाण्याचा सराव करतेय ती...”

“असं रडल्यावाणी.... ”‘म्हणत त्या हसल्या.

तोपर्यंत शेजारचे चाळकरीही जमा झाले होते.

अत्यंयात्रेला नव्हे. गंमत बघायला!

भिकारी रामरावांचे कपडे घालून आले.

आता ते इतके स्वच्छ दिसत होते की मीच त्यांच्यात भिकारी दिसायला लागलो.

“सायेब... तिरडी...?”एका भिकार्‍यानं आठवण करुन दिली.

चल माझ्याबरोबर...”

मी भिकार्‍याला घेऊन जिना चढून वर गेलो.

बायकोचं गाणं ऐन रंगात आलं होतं. आम्ही घरातील सिंगल कॉट उचलून खाली आणली.

चाळ गंमत पाहात होती.

माझी धावपळ सुरु होती.

बायको गात होती.

भिकारी सजले होते.

बाया रडण्याच्या तयारीत होत्या.

आणि रामराव निवांत पडले होते.

चौघांनी मिळून रामरावांना उचललं-कॉटवर मांडलं. तिनं करकर दात खात रामरावांच्या वजनाचा निषेध केला.

चौघे कॉटच्या चार पायांजवळ थांबलो.

मी खूण केली

बायांनी ‘स्विच ऑन’ केल्यासारखा सप्तसूर लावला. त्या इतक्या मनापासून रडायला लागल्या की, पाहाणार्‍याला वाटावं या रामरावांनी एकापाठोपाठ केलेल्या लडक्या बायकाच आहेत.

बायकांचं गाणं...

बायांचं अचाट रडणं...

त्यातचं कुत्र्याचा अभद्र हेल....

चाळीला बॉम्ब पडलेल्या काबूलचं स्वरुप प्राप्त झालं.

प्रेतयात्रा निघाली. चार घरचं खाऊन धिप्पाड झालेले भिकारी मी काटकुळा सरकारी कारकून! त्यात महिनाअखेरीने अजूनच जेरीस आलेला कॉटच्या पट्ट्या खांद्यात सलत होत्या.

दूपारची वेळ! रत्यावर तुरळक गर्दी तरीही बायांच्या प्रचंड भसारड्या रडण्याने घरातील माणसे पटापट बाहेर येऊन डोकावत होती. हळूहळू प्रेतयात्रेला चांगली शोभा येत चालली.

मध्ये दोन ठिकाणी विसावा घ्यावा लागला. नाहीतर मी कायमचा विसावलौ असतो.

एकदाचं स्मशानात आलो. प्रेत ओट्याजवळ ठेवलं. बायांवर ओरडलो. खूप रडल्या, बास करा आता डोकं उठलंय. तर त्या जास्तच रडायला लागल्या. रडताना एक बाई म्हटली. “प्रेत जाळलं तरी आम्ही रडायचं थांबणार नाय. तशाच तुमच्या मागं रडत येऊ. अजून पन्नास... पन्नास रुपये देता का वाढवून....”

शेवटी रडणं थांबविण्याचे पन्नास कबूल केले. तेेंव्हा त्या रडणं थांबवून एकदम हसायलाच लागल्या.

“येथेच थांबा रे.... ” असं भिकार्‍यावर ओरडत मी स्मशानाच्या कोपर्‍यातील ऑफिसात गेलो. तेथे एक कडक इस्त्री केलेल्या चेहर्‍यासारखा म्हतारा बसलेला होता.

“तुम्ही पूर्वपरवागीशिवाय प्रेत कसं आणलंत”

“रामराव अचानक गेले वो...” मी समजावणीच्या स्वरात म्हणालो,

“मी एकटाच...”

“मयत इसम तुमचा कोण?”

“शेजारी”

“तुम्ही त्याचे कोण?”

“शेजारी...”

“नातं....?”

“काही नाही ते आमच्या शेजारी राहतात आम्ही त्यांच्या शेजारी राहतो. आम्ही दोघे शेजारी.” असं म्हणत मी नकळत तर हसलोे.

त्यामुळे म्हतारा अजून भडकला. खिडकीबाहेर डोकावत म्हणाला.

“अत्यंयात्रेला जास्त लोक दिसत नाहीत...”

“मिळाले नाहीत....”

“म्हणजे?”

“आले नाहीत....”

“मामला संशयाचा आहे... कसे वारले ते रामराव?”

“त्यांच्या मनानेच वारले....”

“चेष्टा नको... पाहू पि.एम...”

“मी एकदम न राहवून हसलोच....”

अहो इथं उचलायला चार माणस मिळायची मारामार.

पीएम कुठले येणार अंत्यदर्शनाला.

म्हातारा एकदम फणफणायला लागला.

“चला... उचला ते प्रेत... आणि व्हा बाहेर....”

अहो प्रेत म्हणजे बिर्‍हाड.. मी भाडेकरु आणि तुम्ही मालक आहात का? उचला बिर्‍हाड आणि हो बाहेर म्हणायला....”

मघापासून चेष्टा काय करता... स्मशान असून काय हसता... छे... छे... काहीतरी गडबड आहे. पी. एम. रिपोर्ट दाखवा मग पाहू पुढे...”

“अहो... पी.एमची काय गरज आहे....”

“आहेच... संशयाला जागा आहे....”

“पण प्रेताला नाही...?”

“काही समजा. पोलीस बोलवा. पंचनामा करा. डॉक्टर बोलवा नाहीतर प्रेत तिकडं कुठेही जाऊ द्या.”

अहो पण बाबा... “मी एकदम काकूळतेला येत म्हणालो.”

“शे-पाचशे तुम्हाला देतो...”

बापरे.... “म्हतारं एकदम टुणकन उडालच,”

“आता तर नक्कीच घोटाळा आहे. सांगितलेले सोपस्कार केल्याशिवाय अंत्यविधीला परवानगी नाही...”

“जाऊ...”

“तुम्हाला परवानगी आहे...”

आता रामराव असते तर याच्याशी भांडून अंत्यसंस्कार करुन घेतला असता. असा विचार करत ओट्याजवळ आलो.

बाया आडव्या-तिडव्या गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हढ्या वेळात भिकार्‍यांनी “ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारास मदत करा” म्हणून स्मशानातच भिक मागत आपलं वार्षिक उत्पन्न वाढवायला सुरुवात केली होती. मी त्यांना दरडावलं. दोन भिकारी जवळच्या पोलिस-स्टेशनला पाठवले आणि चष्मा पुसत प्रेताजवळ बसलो. माणूस मेल्यावर सदेह स्वर्गात जायला हवा होता. म्हणजे आपल्यावर असा बाका प्रसंग ओढवला नसता.

थोडक्याच वेळात भिकारी पोलिसाला घेऊन आले. आल्याबरोबर त्याने सर्वांकडे डोळे वटारुन पाहिले. आपल्या बाजीप्रभू मिशांना पीळ भरला. ढेरीवरून ओघळलेलं बक्कल सावरलं आणि साकडी दंड्या बगलेत पकडून तो मोठ्यानं ओरडला, ‘कोण मेलं रे उन्हा-तान्हाचं ताप द्यायला?’

“सायेब-मिटवून घ्या. त्येच असं झालं बघा...”

मी काकूळतेला येऊन सारी हकीकत सांगितली... तसा म्हणाला, “पळा... सरकारी दवाखान्याचे डॉक्टर आणा इथंच तपासून दे म्हणावं मेल्याचं सर्टीफिकेट! घे वेडा-वाकडा पंचनामा करुन...”

पोलीसाने फतकल मारलं..

मी डॉक्टरांना आणायला निघालो आणि आश्चर्य घडलं स्वत: डॉक्टरचंं घोड्यासारखे खिकाळत, उड्या मारत तेथे हजर झाले.

केस विस्कटलेले, डोक्यावर तावदानासारखा जाड चष्मा. कानात स्टेथास्कोप-पायघोळ पांढरा कोट... वरच्या खिशातून डोकावणारी सिरींज...!

“कोणाच दुखतंय...? डॉक्टर हसत खिंकाळले.

“डॉक्टर दुखणं संपलं की माणसाला इथं आणतात” मी कावून ओरडलो. “आलाच आहात तर वरवर पीएम करा. डेथ सर्टीफिकेट द्या. तुमची फी देऊन टाकू...”

डॉक्टर मोठ्यानं हसले “कुठयं पेशंट...?”

मी प्रेताकडे बोट दाखवलं.

“अरे जाड्या पोलीसा.... बसलास काय फतकल मारुन... उठ लवकर मी तपासतो.. तू लिहून घे....”

पोलिस संतापाने उठला. फणफणतच त्याने स्मशानात पडलेला एक कागद शोधला. तोही नेमका प्रयोगवहीतला.. पोलीसानं त्यातलं पहिलं सदर वाचलं... “प्रयोगाचे नाव...”

सारे सारे हसत होते. पोलीस लिहीत होता. शामराव मेले होते. मी मात्र वेडा होण्याची वेळ आली होती.

“आता शेवटी... निष्कर्ष...” पोलिस घाईनं ओरडला.

डॉक्टर एकदम गप्प झाले. त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू मावळलं. त्यांनी एकच शब्द सावकाशीने उच्चारला.

“निष्कर्ष भयानक आहे. सदरहू इसमाचा गळा दाबून खून झालाय...”

आणि डॉक्टर पुन्हा विकट हसू लागले.

माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. पोटात खड्डा पडला.

एक इरसाल शिवी हासडत झेप घेऊन पोलीसानं मला पकडलं. मी मोठ्यानं गळाच काढायच्या बेतात होतो. तेव्हढ्यात चार-पाच शूभ्र कपड्यातील कंपाऊंडर आरडा-ओरडा करीत स्मशानात शिरले.

सापडला, सापडला असा गलबला करीत त्यांनी कोंडाळ करुन डॉक्टरांना पकडलं.

पोलीस दंड्या फिरवीत ओरडला.

“सोडा त्या डॉक्टरला.. इथं पंचनामा चालू आहे...”

“आवो-पोलीसदादा... हे कसलं डॉक्टर...” डॉक्टरच्या पोटात पोटात गुद्या मारीत त्यातला एकजण म्हणाला, “इस्पीतळातला येडा हे ह्यो...! डॉक्टरचा कोट घालून पळून आलाय. आधी हा त्याच इस्पीतळाचा प्रमुख डॉक्टर व्हता. वेंड्यावर इलाज ते करता करता हाच वेडा झाला.

डॉक्टर खदखत हसू लागले. मग पोलीसही हसला. लागोपाठ मीही हसलो. नंतर सारेच हसायला लागले.

मला वाटले. आता रामरावही उठून हसतील.

कंपाऊडर वेड्याला घेऊन गेले. मी पोलीसाशी गोड गप्पा मारल्या. म्हातार्‍याला समजावलं. त्यानं जादा भावानं लाकडं दिली.

आम्ही घाईनं चिता रचली. रामरावांचा अवघड देह उचलून त्यावर ठेवला. मी टेंभा पेटवून चितेला लावला. हळूहळू आग भडकली.

अचानक-भयंकर काहीतरी घडलं.

चिता उधळली. वरची लाकडं खडाखडा बाजूला फेकली गेली.

डॉक्टर म्हणाले, “लिहा झोपलेल्या माणसाचा पंचनामा...”

“डॉक्टर हा माणूस झोपलेला नाही... मेलेला आहे... मी ओरडलो.

“तुम्ही चूप तसा.. मध्ये मध्ये बोलून सरकारी कामात अडथळा आणू नका. हा माणूस झोपलेला आहे की मेलेला हे निष्कर्षात समजेल आणि निष्कर्ष शेवटी असतो.

असं म्हणून डॉक्टर एकदम गुदगुल्या केल्यासारखे हसू लागले. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. चाललेला प्रकार विलक्षण होता.

“पोलीसदादा... पुढचा कॉलम वाचा...” डॉक्टर खिदळत ओरडले.

“साहित्य...”

“घ्या इंजेक्शन, स्टेथस्कोप, स्वत: मी, डॉक्टर आणि तुमचं नाव घाला.”

“माझं कशाला?”

“अहो... सायन्सच्या लोकांना काही समजत नाही. साहित्यात फक्त लिहितात आम्ल, परीक्षा नळी, स्टँड, स्पिरीटचा दिवा... ते आम्ल काय आपोआप परीक्षनळीत जाऊन पडतं? स्पिरीटचा दिवा काय आपोआप पेटतो? त्यासाठी साहित्यात ‘माणूस’ नको?”

“सखाराम माने” असं बडबडत पोलीसानं स्वत:चं नाव लिहिलं.

तोपर्यंत इतर प्रेतयात्रेला आलेले लोक आमच्याभोवती जमा होऊ लागले होते.

“कृती” पोलीसानं पुढच्या कॉलम वाचला.

“मी कृती करतो तुम्ही दिसेल ते लिहा...” म्हणत डॉक्टरांनी गरागरा प्रेताभोवती चकरा मारायला सुरुवात केली. अध्ये-मध्ये ते अर्धवायू झाल्यासारखे हसतही होते. मध्येच त्यांनी टूणकन उडी मारत रामरावांच्या पोटावरच फतकल मारली. मला सिंहाच्या अंगावर उड्या मारणारा गोष्टीतला उंदिर आठवला.

“नाडी पाहतो” म्हणत डॉक्टरांनी सरळ रामरावांच्या पायजम्याची नाडीच ओढली तेव्हा तर हे स्मशान आहे याचा विसर पडून लोक मोठ्यानं हसू लागलेे. नंतर त्यांनी स्टेथस्कोपने रामरावांचा गुडघा तपासला आणि मग रामरावांना चक्क इंजेक्शन दिले.

मला भूलेचं इंजेक्शन दिल्यासारखे गरगरायला लागले. डॉक्टर खिंकाळत होते. जमलेले लोक, भिकारी, बाया... मी जाम हादरलो... बाया ‘भूत-भूत’ किंचाळत पळाल्या. भिकारी विद्युत वेगानं परागंदा झाले. पोलीस सर्वांआधी गायब झाला होता?

मी डोळे वासून पाहात राहिलो.

रामराव शांतपणे डोळे चोळत उठले. त्यांनी हात वर करुन जांभई दिली. मग मला किती वाजले विचारलं. वर वडाकडे पाहिलं वर वड नव्हता. खाली ओटा नव्हता. बाजूला चाळ नव्हती.

आग... आग ओरडत त्यांनी ताडकन खाली उडी मारली. संतापानं माझं बरखोटं पकडत ते ओरडले, “गज्या...हरामखोरा... माझ्या गाढ झोपेचा फायदा घेऊन मला इथं जाळायला आणलं होतसं का भडव्या? माझी पिऊन मलाच धोका देतो. थांब...तुला आता चितेतच टाकतो...”

“रामराव...” भितीनं ओरडत मी त्यांना मिठी मारली.

“माझं ऐका... प्लिज... हे सारं सान्यानं केलं हो... त्यानंच तुम्ही मेल्याची खोटी बातमी पसरवली.”

“चल... चल... आधी त्या सान्याकडं...”

रामरावांना उचलून नेलेली कॉट आम्ही दोघांनी घरी आणली.

रामराव गेल्यानं चाळीत आनंद पसरला होता. त्यांना जिवंत पाहून दंगल पेटल्यासारखी पळापळ सुरू झाली. मी दरवाजा वाजवला.

सुलभा घाईनं दार उघडत म्हणाली.

“गेले का एकदाचे रामराव स्वर्गाच्या सहलीला! माझ्या गायनाला श्वानगायन म्हणायचा मेला! मोठं काम करुन आलात... या आज मस्त शिरा पुरी केलीये...”

रामराव झटकन पुढे येत म्हणाले.

“वा वहीनी... मी तर अगदी वेळेवर परत आलो की...”

रामरावांना पाहून सप्तस्वरात किंचाळली. घाबरुन आत पळाली. स्वयंपाकघरात ज्वारीच पोतं पडल्यासारखा ‘धप्प’ आवाज आला. ती बेशुद्ध पडली असावी.

तेव्हढ्यात साने दडादडा जिना चढत वर आले. आल्याबरोबर रामरावांनी त्यांच्यावर डोळे फिरवले.

“माफ करा रामराव...” साने चाचरत म्हणाले. “तुमच्या कुंभकर्णी झोेपेमुळे मी आपली आवई उठवली. तुम्ही मेल्याची...! पण मला काय माहीत...हे प्रकरण स्मशानपर्यंत जाईल म्हणून...”

“पण तू असं का केलसं सान्या..?” रामराव किंचाळले

“अहो... आज कोणता महिना सुरु झालाय... एप्रिल! एक एप्रिल.... एप्रिल फुल...”

“यू फूल...” असं ओरडत कोपर्‍यातील दंडूका घेऊन रामराव सान्यांवर धावले.

साने उंदरासारखे निसटून जिन्यानं तुरतूरत खाली पळाले. रामराव संतापाने बेभान होऊन त्यांच्यामागे पळाले... आणि अचानक त्यांचा पाय निसटला. ढग गडगडल्यासारखा आवाज झाला.

मी त्यांना पाहायला घाईनं जिना उतरत असतानाच सान्यांचा दिन्या आडवा येत ओरडला.

“काका... आता रामराव खरंच मेले हो...”

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com