फ्लॅटमध्ये मिस करते गावाकडची रांगोळी

रांगोळी
रांगोळी

तनुजा सुरेश मुळे (मानकर)

दिन दिन दिवाळी

गाई म्हशी ओवाळी

गाई म्हशी कोणाच्या

लक्ष्मणाच्या...

अंगणातल्या पणतीच्या ज्योतीवर हातातला फुलबाजा पेटवून गोल गोल फिरवत हे गाणे म्हणण्याचा अनुभव आपण सर्वांनीच लहानपणी घेतला असेल. त्याच्या तयार होणार्‍या प्रकाश वलयांमध्ये बालपणीच्या दिवाळीच्या किती तरी गोड आठवणी साठवून ठेवलेल्या असतील.

घरातल्या पकडीने किंवा फरशीच्या तुकड्याने फटाफट उडवलेल्या टिकल्यांचे आवाज येऊ लागले, घराघरातून भाजलेल्या खमंग भाजणीचे वास येऊ लागले, दारासमोर चकचकीत घासलेल्या पितळी डब्यांची रांग दिसली की, समजायचे दिवाळी आली. कधी एकदा सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन येतो आणि कधी एकदा सुट्टी लागते असे व्हायचे.

दिवाळी म्हणजे दिवाळं काढणारी हे न समजण्याचे ते दिवस, दिवाळीच्या फटाक्यांनी वातावरणातले प्रदूषण वाढते हे गावीही नसणारे ते दिवस. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ खाऊन शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढते याची भीती नसणारे ते दिवस. सगळं काही साधं भोळ, सोप्प, घरगुती. अभ्यंगस्नानाला भारी साबण नसला तरी आईने घरी तयार केलेल्या उटण्याने रगडून अंग घासून देण्याचे ते दिवस. लक्ष्मीपूजनाला घरातल्या संपत्तीचे प्रदर्शन न भरवता साध्या मातीच्या बोळक्यात लाह्या बत्ताशे घालून, केरसुणीची देखील पूजा करण्याचे ते दिवस. पाडव्याच्या दिवशी सकाळीच उठून पहाटपाडव्याला जाण्याऐवजी घराघरातून फराळाची ताटे देण्याघेण्याचे ते दिवस. आणि भाऊबीजेला भावाने ताटात ओवाळणी म्हणून टाकलेले पैसे आता माझे मला परत दे म्हणून भांडण्याचे ते दिवस.

अशा अनेक समृद्ध आठवणींनी सजलेला हा दिवाळसण खास रंगायचा तो अंगणात काढलेल्या रांगोळ्यांनी, हो आज जर मी दिवाळीचं सर्वात जास्त काही मिस करत असेल तर ती आहे रांगोळी...

दिवाळीची सुरुवातच व्हायची ती मुळात अंगण तयार करण्यापासून. दारासमोरचं अंगण दिवाळीच्या आधी छान खोदून त्यावर मातीची भर घालून चोपन्याने चोपून सपाट करायचं, मग दिवाळी येईपर्यंत रोज त्यावर पाणी शिंपून चांगलं तयार करायचं. दिवाळीच्या आधी शेण आणून छान अंगण सारवायचं. हे अंगण सारवण ही एक कलाच असायची आणि आज्जी म्हणायची पोरीच्या जातीला सडा सारवण आलंच पाहिजे, सासरी जायचंय ना तुला?

तिला बिचारीला काय माहिती नंतरच्या काळात अंगणच उरणार नाही तर कसला सडा आणि कसलं सारवण. फ्लॅटच्या दारात कोपर्‍यात छोटीशी रांगोळी काढली तरी येणार्‍या जाणार्‍याच्या पायाने पुसून जाते आजकाल.पण असो तेव्हा मात्र आई आज्जीच्या धाकाने अंगण सारवण शिकावंच लागायचं.

मग त्या सारवलेल्या अंगणात गेरूच्या लाल रंगाने चौकोन काढायचा. मग सुरू व्हायची अंगणातल्या रांगोळ्यांची स्पर्धा. त्याआधी बाजारात जाऊन भरपूर रंग रांगोळ्या घेऊन येणे हे ओघाने आलेच. मग घरी आणून रंगांमध्ये रांगोळी मिसळून ठेवायची. रांगोळीच्या पुस्तकासाठी आईकडे हट्ट धरायचा, नाही तर मग मैत्रिणींच्या पुस्तकातून रांगोळ्या काढून घ्यायच्या. पेपरमधली कात्रण जपून ठेवलेली वही असायचीच.

दिवाळीचे चार दिवस कोण कोणत्या रांगोळ्या काढायच्या हे ठरवून ठेवायचे. एक दिवस ठिपक्यांची, एक दिवस चित्राची, एक दिवस फुलांची रांगोळी काढायची. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात मोठी रांगोळी काढायची. मग दुपारपासूनच कामाला सुरुवात करायची. ठिपक्यांच्या रांगोळीसाठी उदबत्तीने समान अंतरावर छिद्र पाडून कागद तयार ठेवायचा. रांगोळीत निगुतीने बाहेर न जाऊ देता रंग भरणे, नेत्र सुखद रंगसंगती साधने, रेषांची प्रमाणबद्धता ही कला आपोआपच मुलींना जमायची. या रांगोळीला आणखी देखणं बनवायला चमकी, काचा टिकल्या, बिया आधीच जमवून ठेवायच्या. रांगोळी काढताना भावांची मध्येच लुडबुड चालायची. रांगोळी काढताना भावा बहिणींची भांडण नाही झाली तर मजा नाही यायची.

सर्वात सुंदर रांगोळी जीची असेल तिची मग वाहवा व्हायची आणि उद्या आपण पण तिच्यापेक्षा भारी रांगोळी काढायची असं दुसरी ठरवायची.

रांगोळी बरोबर गोपद्म, स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं, कमळ, ताटाभोवतीच्या रांगोळ्या यायलाच हव्या. दिवाळीच्या चार दिवसांत जेवताना ताटाभोवतीसुद्धा छान छान रांगोळ्या काढायच्या. त्या रांगोळीच्या सुंदर महीरपित पंचपक्वानानी भरलेलं ताट, उदबत्तीचा मंद सुगंध, सनईचे सूर या मंगलमय वातावरणात जेवणारा तृप्त होऊन दोन घास जास्तच खायचा. आणि ते पाहूनच घरातल्या अन्नपुर्नेच पोट भरायचं.

माझ्या मामाच्या गावी आजूबाजूला मद्रासी लोक जास्त राहत होत्या, त्यांच्या रांगोळ्या म्हणजे एक अविसमरणीय अनुभव होता. त्यांची रांगोळी म्हणजे पाण्यात कालवलेलं तांदळाचं पीठ. गेरूने सारवलेल्या लाल अंगणात ही ओल्या पीठाने अंगणभर काढलेली रांगोळी पाहून डोळे दिपून जायचे आणि आपल्याला नाही येत अशी रांगोळी काढता याची खंत वाटायची. मोठं झाल्यावर संस्कारभारतीच्या रांगोळ्या काढायला शिकल्यावर ही खंत थोडी कमी झाली. कमी वेळात मोठ्यात मोठी रांगोळी काढायची कला म्हणजे संस्कारभारतीच्या रांगोळ्या.

लहानपणी रांगोळी काढण्यासाठी एवढी साधने नव्हती. पण वेळ आणि हौस भरपूर होती, आज सगळ्या साधनांची रेलचेल आहे पण वेळ नाही. आणि मुख्य म्हणजे रांगोळी पूर्ण करण्याएव्हढे पेशन्स नाही, म्हणून मग र्ूेी र्ीींलश वरचे सुंदर सुंदर रांगोळ्यांचे व्हिडिओ पाहून आनंद मानून घ्यायचा. या दिवाळीतल्या रांगोळ्यांनी माझ्या पिढीच्या अनेक जणींचं भावविश्व मात्र रंगतदार केलं हे नक्की.या दिवाळीला पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा देऊया, छोट्याशा का असेना रांगोळ्यांनी आपलं अंगण सजवूया.

नाशिक

9881247127

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com