लाखोंच्या शॉपिंगपेक्षा त्या खरेदीची मजाच वेगळी

jalgaon-digital
5 Min Read

मनीषा एकनाथ लबडे |

बाबा, या दिवाळीला आपण ना पूर्ण घरावर लायटिंग करू, फटाके पण खूप आणू, आणि तेही माझ्या आवडीचे! मुलाच्या अन् यांच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या.

मी शेजारी बसून शांतपणे ऐकत असतानाच मनाने केव्हा भरारी घेतली हे कळलंही नाही, आणि लहाणपणी राहात असलेल्या त्या वाड्यातल्या छोट्याशा खोलीकडे येऊन वेडं मन थबकलेसुद्धा….

दिवाळीची चाहूल लागली की, पत्र्याच्या त्या खोलीला रंग द्यायची तयारी सुरू व्हायची, ऑइलपेंट नाही. चुना पुण्याचा रंग तो! देणार कोण? तर, मोठ्या दोघी बहिणी! भाऊ कधीच रंग काम करणार नाही हा अलिखित नियम! आम्ही बहिणी तो पाळायचो. कुठलीही तक्रार न करता. आम्हा बहिणींसाठी तो नोकरी करत शिकत आहे, ह्या जाणीवीने त्याने इतर काम करावं, अशी अपेक्षा कधी मनाने धरलीही नाही. तो आपल्या घरासाठी अल्पवयातच खूप मोठ्या जबाबदार्‍या पेलतो, हे नजरेसमोर दिसत असल्याने कधी घरकामात त्याची बरोबरी करावी, असे आम्हा बहिणींना वाटलेही नाही. गाणं गुणगुणताना अधूनमधून ‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ हे गाणं गुणगुणला की खरंच डोळ्याच्या कडा आपसूक ओल्या व्हायच्या. म्हणूनच तक्रार न करता दिवाळी आली की, किराणा आणण्यापासून ते घराला रंग देणे सगळी कामे आम्ही बहिणी करायचो, तो कामावरून घरी येण्याअगोदर पूर्ण खोलीला मोठ्या बहिणी रंग देऊन घ्यायच्या. आई तोपर्यंत बाकीची कामे करायची. मोठी बहीण कलाकार! त्यामुळे रंग देऊन झाला की, तिची सजावट सुरू व्हायची, कॉटखाली सगळे कपडे सुंदर रचून ते बाहेरून दिसू नये म्हणून त्यावर कव्हर घालायचं, कलाकुसरीने तयार केलेली फ्रेम भिंतीवर लावायची, हातानेच तयार केलेल्या भेटकार्डाची माळ भिंतीवर लावायची तेव्हा भिंत खुलून दिसायची.

खोलीच्या दुसर्‍या भिंतीत गोलाकार कमानी प्रमाणे देवळीत जुनं कपाट मांडलेलं होतं, त्या कपाटाची गरिबी ती आपल्या घरीच सुबक विणलेल्या पडद्याने झाकायची तेव्हा तिचा अभिमान वाटायचा! एकिकडे तिची सजावट अन् दुसरीकडे आईचे स्वयंपाकघरातील भांडे आवरणं चालू असायचं..आम्ही लहान बहिणी हाताखाली मदत करायचो…भाऊ आला की कौतुकाने पाहायला लागला की, आम्ही सगळ्या जणी खुश व्हायचो. त्यादिवशी काम करून थकून गेलो असलो तरी सुखाची झोप यायची. जुन्याच पण स्वतःच्या हाताने रंगवलेल्या त्या इवल्याशा घरात मायेचा मोठेपणा अन् भावनांची जपवणूक होती!

म्हणूनच कपड्याचा विषय निघाला की, मोठी बहीण हळूच आईला म्हणायची, यावेळी मला नको, या छोट्या दोघींना घ्या, मला संक्रांतीला घेऊ. दोन नंबरची बहीण लगेच त्याला अनुमोदन द्यायची. आई मात्र हिरमुसायची! ऐनवेळी भाऊ चौघींना कपडे घेऊन यायचा, आईला कौतुकापेक्षा टेन्शनच जादा यायचे हे तिच्या चेहर्‍यावरच दिसायचं.दरवर्षी वाड्यातल्या काकू मात्र आठवणीनं आम्हा चौघींना नको- नको म्हणत असताना खरेदीसाठी पैसे द्यायच्या. त्यांनी दिलेल्या पैशांतून होणारी शॉपिंग आजच्या लाखोंच्या शॉपिंगपुढे मोलाची वाटे! त्या खरेदीत वेगळीच मजा होती, वेगळाच वास होता…. जिव्हाळ्याचा! खोलीच्या बाहेर असलेल्या दोन छोट्या देवळीत रात्रभर मिनमिनत असणार्‍या पणत्याही आम्हा भावंडावर नक्की गर्व करत असतील!

दिवाळीच्या दुसर्‍या दिवसापासून वाड्यात फराळ कार्यक्रम सुरू व्हायचा! आज सकाळी याच्या, संध्याकाळी त्याच्या असं करत वाड्यातल्या चारही घरी नियोजनबद्ध चूलबंद आवतन असायचं….! सगळी बच्चे कंपनी मग कोणाचा फराळ कसा होता, याचं मनसोक्त कौतुक करायची. सर्वानुमते काकूंचा फराळ सगळ्यात रुचकर असं आम्ही जेव्हा म्हणायचो तेव्हा मनातले मुलाच्या वियोगाचे सगळं दुःख विसरून काकूंच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पसरायचा. त्यांना एकटे वाटू नये म्हणून दिवाळीत बच्चेकंपनी त्यांच्यातच रमायची. अगदी फटाके पण त्यांच्यासमोर वाजवायची, दोघे काका-काकूंही अगदी सख्या नातवंडांप्रमाणे वागवायचे. त्याच्यातच सुख मानायचे. त्या परकेपणातही खूप आपलेपण होतं. आज बंगल्यासमोर एकटे एकटे फटाके उडवताना वाड्यातल्या गोळ्यामेळ्यात फटाके उडवण्याची कमी प्रकर्षाने जाणवते. ना रॉकेट उडवतानाचा आरडाओरडा…. ना दोरी लावून रेलगाडी पूर्ण गल्लीत फिरण्याची धूम..! फटाके उडवतानाही आज मन मात्र शांत असतं!

भाऊबीजेच्या दिवशी वाड्यातली सगळी मुले सकाळीच सगळ्या मुलींकडून ओवाळून घ्यायचे. ओवाळल्यानंतर सगळे जण हळूच प्रत्येकीला छोटीसी भेटवस्तू द्यायचे. नंतर संध्याकाळी फराळाला जमा झाल्यावर ती भेटवस्तू घालून दाखवली की, त्या भावांच्या चेहर्‍यावरचा आनंद खूप काही सांगून जायचा.

भाऊबीजेच्या दुसर्‍याच दिवशी मामा घ्यायला यायचा अन् बसने आमची पलटण गावी जायची, तेथे बैलगाडी फाट्यावर सज्ज असायची आम्हाला घ्यायला! नदीतून मग आनंदाने जो भेटेल त्याच्याशी बोलत आम्ही घरी पोहोचायचो. आजी दारात तुकडा-पाणी घेऊन ओवाळायची, आमच्या गालावरून तिचे खरखरीत हात जेव्हा फिरायचे तेव्हा त्यात मायेचा ओलावा जाणवायचा. आई मात्र डोळ्याला पदर लावायची……

गालावरून हात फिरवत मुलगा म्हणाला काय गं आई काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? त्याला कसं सांगू मन आठवणीतली गावाकडची दिवाळी साजरी करून आलं…..!

प्राथमिक शिक्षिका,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी(चांदा)

चांदा ता. नेवासा. अहमदनगर

9422858514

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *