दिवाळी २०२० : पिकले पान

: डॉ. माधुरी भास्कर कुलकर्णी, राहुरी
दिवाळी २०२० : पिकले पान

प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनाला वळण देणार्‍या अथवा कलाटणी देणार्‍या अनेक घटना, व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांचे जीवन घडते. माझ्या नव्हे आम्हा भावंडांच्या जीवनास घडवणार्‍या, फुलवणार्‍या, सुगंधित करणार्‍या अनेक व्यक्तींपैकी प्राधान्याने नाव घ्यावे लागेल आजी.. (रमाबाई) होय माझी आजी! तिच्याबद्दल लिहितांना आकाशाची अथांगता, सागराची खोली कमी वाटायला लागते.

सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे ते दिवस! भयानक होते. सार्‍या देशाने पारतंत्र्याच्या शृंखला नाईलाजाने घातल्या होत्या. समाज मनावर काजळीचा थर चढला होता. अंधश्रद्धा, निरक्षरता, अस्पृश्यता भीती, रोगराई, भोळेभाबडे गैरसमज यांनी समाज पछाडला होता. वाहते जीवन ठप्प झाले होते, एखाद्या कलेवराप्रमाणे....

अशा काळोखातच 1918 साली माझ्या आजीने मुंबईत जन्म घेतला. शिक्षणाचे कंकण हाती बांधून! अंगात हिमालयाचे बल व हृदयात कुसुमाची कोमलता घेऊन! प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे कसब नि धारिष्ट्य अंगी बाणून!

ज्या काळात स्त्रियांना शिक्षण तर दूरच पण घराबाहेर पडण्यासदेखील अटकाव केला जायचा अशा इंग्रजी काळात आजीने इंग्रजी शाळेत शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. इंग्रजीबरोबर ती संस्कृत अस्खलीतपणे शिकली. शाळा म्हणजे किग जॉर्ज हायस्कूल, मुंबई घरापासून लांब शाळेत लोकलने जावे लागे. समाज बंधने झुगारून एकटी मुलगी शाळेत पाठवण्याचे धाडस आईवडिलांनी केले.

वर्गात प्रथम क्रमांक घेत मॅट्रीकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी सातवी पास म्हणजे खूप शिक्षण. लगेच शिक्षकाची नोकरी मिळायची. त्याही पुढे तिने शिक्षण घेतले. गोरागोमटा वर्ण, लांबसडक केस, (इतके लांब की, मागे घातलेला अंबाडा कानापर्यंत यायचा) आणि उपवर मुलगी स्थळ बघायला सुरूवात केली गेली.

खडांबे, ता. राहुरी येथील त्रिंबकपंत क्षीरसागरांशी विवाह जमला. विचार करा.... मुंबईसारख्या शहरात लोकलने फिरून उच्च शिक्षण घेतलेली मुलगी खडांब्यासारख्या खेड्यात विवाह करून येते, कोणतीही तक्रार न करता... नाहीतर आजकाल खेड्यातील मुलींना पुण्यामुंबईचा नवरा लागतो तर मुंबईतल्या मुलींना फॉरेनचा... तिच्या जागेवर कल्पना करून बघा. आयुष्याला केवढी कलाटणी मिळाली! पण ती डगमगली नाही.

खंडाब्यात इतर स्त्रियांना शिक्षित करण्याचे काम सुरू केले. याबरोबरच स्वेटर विणणे, टकळीवर सूत काढणे. अशा कला शिकवू लागली. रोज स्त्रियांना संध्याकाळी बोधकथा सांगून समाज प्रबोधन करू लागली. मुलांच्या शिक्षणाकडे काटेकोरपणे लक्ष दिले. पण आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. मुलांची फी भरायला पैसे नसायचे. मुलगा सुरेश खडांब्याहून राहुरीत पायी पळत शाळेत यायचा. एकदा भर उन्हात पायी शाळेत आल्यावर मास्तरांनी फी भरली नाही म्हणून परत पाठवले.

आजीला फार वाईट वाटले. तांब्याचे तपेले गहाण टाकून फीचे पैसे भरले. पुस्तकाच्या खर्चास तिचे प्राधान्य असायचे. नंतर कपडे. तेही फक्त दिवाळीतच. लक्ष्मीपूजन करायला देखील पैसे नसायचे. एकदा तर शेजारून एक रुपया उसना आणून लक्ष्मीपूजन केले. एवढी परिस्थिती असतांना देखील तिने कधी तक्रार केली नाही. बाबांना शिकवले.त्यांना बँकेत नोकरी लागली तेव्हा तिला शांतता लाभली.

एवढ्यावरच तिचे कार्य थांबले नाही. पुढचा मोर्चा तिने नातवंडाकडे वळवला. बाबांना चार मुली. खेडेगावात माणसे डोळे मोठे करून बघत! “बाप रे! सुरेशला चार मुली! कसा हुंडा जमवणार काय माहीत!” अशी वाक्ये आजीला फार खटकायची.

आम्ही खडांबे सोडून कृषी विद्यापीठात आजीबरोबर रहायला आलो. तेव्हा तिने आमच्या शिक्षणाचा चंगच बांधला. नुसते शिक्षणच नाही तर इतर संस्कारही केले. आमच्यासाठी स्वत: पहाटे उठून आमच्या बरोबरीने ती अभ्यासाला बसायची. पाढे पाठ करून घ्यायची. सांगायला अभिमान वाटतो की, तिसरीतच तिने माझे 30 पयर्ंंत पाढे, पावकी, निमकी, पाठ करून घेतली होती. वर्गात कोणालाच येत नव्हती. सरांना पण खूप आश्चर्य वाटायचे.

शिक्षणाबरोबरच तिने शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी स्वत: नाटके लिहिली व बसवून दिली. कारण तिचे वाचन प्रचंड होते. ती नाटके स्टेजवर करून आम्ही भरपूर टाळ्या मिळवल्या.

मला वैद्यकीय शिक्षणाची वाट दाखवण्यात तिचा फार मोठा वाटा आहे. तिची सर्व नातवंडे उच्च शिक्षित आहेत. नातू परदेशस्थ आहे.

प्रत्येकाची आई तर मुलांवर संस्कार करतेच, पण नातवंड घडवणारी आजी विरळच...

सप्तरंगाची उधळण करणार्‍या इंद्रधनुष्यात सात रंग एकत्र आले अन् धीरोदास्त वीर पुरुषासारख्या पांढर्‍या रंगाचा उदय झाला. तसेच दया, क्षमा, शांती, धैर्य, शौर्य, हुशारी, पावित्र्य या सप्तगुणांचा संगम होऊन आजीचे व्यक्तीमत्व तयार झाले.

वयाच्या 79 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली.

आजी तुझ्या कुशीत घडलो. निवांत

कधी ना भासली कशाचीच भ्रांत.

आज जरी शिक्षणाचा काळ सुधारला असला तरी अनेक विदारक समस्या निर्माण होत आहेत. मुलांवर संस्कार कमी पडत आहेत.

हे सर्व बघत असतांना हंबरडा फोडून आजीला साद घालावीशी वाटते - संस्कार करण्याचं सामर्थ्य तुझ्यासारखं जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण तरी आजी -‘तू पुन्हा अवतार घे आणि नवीन पिढी सुसंस्कारीत कर.

: डॉ. माधुरी भास्कर कुलकर्णी, राहुरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com