दिग्गज साकारण्याचं भाग्य

दिग्गज साकारण्याचं भाग्य

परिसंवाद-‘दिग्गज’साकारताना

सुबोध भावे, अभिनेता

एखाद्या चित्रपटाचा नायक म्हणून भूमिका करणे, सहनायक, खलनायक साकारणे आणि समाजात नावारुपाला आलेल्या, विशिष्ट उंची गाठलेल्या दिग्गज व्यक्तिमत्वांचा जीवनपट साकारणारी व्यक्तिरेखा साकारणे यामध्ये मोठा फरक आहे. कारण बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करताना संपूर्ण चित्रपटाचा फोकस तुमच्यावर असतो. यासाठी ती व्यक्तिरेखा केवळ मेकअप किंवा पोषाख यांमुळे बाह्यरुपातून हुबेहूब दिसत असली तरी अभिनयातून ती उतरण्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो. बालगंधर्व, डॉ.काशीनाथ घाणेकर आणि लोकमान्य टिळक या तिन्ही वेगवेगळ्या धाटणीच्या चरीत्र भूमिका साकारताना याची प्रचिती आली. यातील आव्हाने खूप मोठी असली तरी त्या साकारायला मिळणे हे मी माझे भाग्य मानतो.

अभिनयाच्या क्षेत्रात मी दोन दशकांपासून कार्यरत आहे. चित्रपट, नाटक, मालिका या सर्व प्रांतात मी मुशाफिरी केली आहे. हे नसेल तर ‘मैत्रर’सारखा कार्यक्रमही मी करत असतो. कोरोनाचा काळ सोडल्यास 2000 सालापासून मी सातत्याने काम करतो आहे. कारण स्वस्थ बसणे माझ्या स्वभावातच नाही. सतत काम करत राहिल्यामुळेच आपल्याला उर्जा मिळते. आजवरच्या वाटचालीचे सिंहावलोकन करताना असे जाणवते की, मी अभिनेता व्हायचे आहे असे ठरवले नव्हते. कारण मला अभिनय येत नव्हता. किंबहुना, आजही मला अभिनय येतोय असे म्हणण्याचे माझे धाडस होत नाही. पण आता किमान त्यातला आनंद तरी नक्की घेतोय. आता अभिनय केल्याशिवाय मला करमत नाही. तो माझा श्वास झाला आहे. अभिनय केला नाही तर गुदमरायला होते. व्यावसायिक कलाकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी फक्त अभिनय करण्याचे ठरवले होते. हे सोडून माझे दुसरे कुठलेही स्वप्न नव्हते. त्यामुळे मी पाहिलेल्या स्वप्नानुसार माझे करीअर घडले आहे. कुठलीच गोष्ट ठरवून केलेली नाही. एका टप्प्यावर मी चरित्र भूमिका करु लागलो; पण त्याही ठरवून केल्या नाहीत.

मी कुठल्याही नाट्यविद्यापिठातून किंवा नाट्यप्रशिक्षणातून शिकलेलो नाही. अभिनयाबाबत कुठलेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नाही. मी सहावीत असताना बालनाट्यासाठी 15 दिवसांची एक कार्यशाळा केली होती. तिथे नाटकाची मला तोंडओळख झाली. परंतु त्यावेळी माझ्यात विश्वास, आत्मविश्वास काहीच नव्हता. बारावी सायन्सला असताना मी आयुष्यात पहिल्यांदा नापास झालो. त्यावेळी 12वीची परीक्षा म्हणजे जगण्यामरण्याची लढाई होती. बारावीनंतर फक्त आर्ट, सायन्स आणि कॉमर्स असे तीनच मार्ग तेव्हा होते. नापास झाल्यावर माझ्या असे लक्षात आले की आजूबाजूच्या लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. ते आपल्याला जगायला नालायक समजू लागतात, अचानक आपल्याशी त्यांचे बोलणे बदलते असे अनेक अनुभव मी घेतले. अशा वेळी कोणी तरी जवळचे असायला हवे असे वाटते. अशी व्यक्ती जिच्यापाशी आपण या सगळ्या गोष्टी व्यक्त करू शकतो. त्यावेळी आमचा अख्खा ग्रुपच जवळपास नापास झाला होता. त्यामुळे खांद्यावर डोके ठेवून रडायला मित्र होते. पण त्याव्यतिरिक्त माझ्या सगळ्या गोष्टींसह मला कोण स्वीकारेल याचा शोध घेत होतो. पुढे जाऊन 12 वी सायन्सला उत्तीर्ण झालो आणि एफवाय कॉमर्सला सिंबायोसिसला अ‍ॅडमिशन घेतली. एफवाय करताना पहिल्यांदा माझा ‘पुरुषोत्तम करंडक’शी संबंध आला. त्यावेळी माझ्यासोबत असणारे प्रसाद ओक, प्रविण तरडे, योगेश सोमण, सोनाली कुलकर्णी, विभावरी देशपांडे, अमृता सुभाष यांनी त्यापूर्वी अनेक नाटकांमधून, एकांकिकांमधून कामे केली होती. मीही एकांकिका करत होतो. त्यावेळी अभिनयाचे हे विश्व किती अफाट आहे असे वाटायचे. पुढे नाटकात काम करु लागलो; पण त्यावेळी मला माझ्या नाट्यपरीक्षणाबाबत कुणी विचारले नाही. नाटकाने मला जसा आहे तसे स्वीकारले. कुठलेही प्रश्न विचारले नाहीत. कदाचित यामुळे मी नाटकाकडे ओढला गेलो.

पुढील काळात मी मुंबईला गेलो आणि मालिका, चित्रपटांमधून काम करु लागलो. सुरुवातीच्या काळात अनेक मालिकांमधून अभिनय केला. मला आठवतेय तेव्हा एकाच वेळी दोन-दोन मालिकांमध्ये माझी भूमिका असायची. हळूहळू चित्रपटांमधील अभिनय सुरू झाला. सिनेअभिनयाच्या या प्रवासात मग एक मैलाचा दगड आला. तो म्हणजे ‘बालगंधर्व’. बालगंधर्वांची भूमिका करणे ही माझ्यासाठी रिस्क नव्हती. कारण ही भूमिका मी अभिनेता म्हणून केलीच नाही. बालगंधर्वांची कांदबरी वाचल्यानंतर मला भयंकर अस्वस्थ वाटले. आपण रंगभूमीवर काम करतो, सातत्याने नाटकाविषयी बोलतो, परंतु ज्या मंडळींनी नाटक खर्‍या अर्थाने मोठे केले, तळागाळात पोहोचवले त्या व्यक्ती किती महान होत्या हे समजले. त्यांच्या काळात नाटक महाराष्ट्रात एखाद्या सणासारखे साजरे केले जात असे. बायका गजरे घालून नाटकाला जात; तर पुरुषमंडळी खास ठेवणीतला शर्ट घालून नाटक पाहायला जात असत. लोकमानसात नाटकांविषयीचे हे वेड निर्माण होण्यामध्ये ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्यामध्ये बालगंधर्वांचे स्थान खूप मोठे आहे. त्याच नाट्यक्षेत्रातला एक घटक असूनही मला त्यांच्याविषयी विस्तृत माहिती नाही, याची मला लाज वाटली, अस्वस्थ वाटले.

कृतघ्नपणाची भावना मनात आली. ज्या झाडाला आज फळे लागली आहेत त्याच्या सावलीखाली बसलेले असूनही त्या झाडाची मुळे कुठे आहेत हे आपल्याला माहीत नाही, याचे दुःख झाले. तेव्हाच ठरवले की, काहीही झाले तरी यांचे चरित्र आपल्याला समोर आणले पाहिजे. चित्रपट, नाटक किंवा मालिका काहीही असेल; पण त्यांच्या जीवनावर एखादी कलाकृती साकारलीच पाहिजे, त्यांचे चरित्र पुन्हा आजच्या पिढीसमोर आणले पाहिजे. त्यावेळी सुबोध भावे म्हणून मी काम करायचे असा काही विचार मनात नव्हता. किंबहुना, मी अभिनय करणारच नव्हतो. माझ्या डोक्यात प्रसाद ओक, सुनिल बर्वे यांची नावे घोळत होती. पण नंतर माझ्यातला स्वार्थी अभिनेता जागा झाला. मग मी स्वत:ची लुक टेस्ट घेतली. पास झालो. तिथून नितीन देसाई यांचेकडे गेलो. नंतर रवी, महेश आले आणि टिम तयार झाली. तोपर्यंत माझा अभिनय दाखवण्यासाठी बालगंधर्व करतो आहे, असे काही नव्हते. मला अभिनेता म्हणून काहीतरी वेगळी भूमिका करायची आहे म्हणून बालगंधर्व चित्रपट केला असेही नव्हते. डोक्यात फक्त एकच... बालगंधर्वांचा जीवनपट समोर आणायचा. मी अभिनय केला नसता तरी दुसर्‍या कलाकारांंच्या मागे लागून करून घेतले असते. थोडक्यात फोकस बालगंधर्व होते. सुबोध भावे हा त्यातील छोटा भाग होता. या चित्रपटाच्या निमित्ताने संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ आम्हाला प्रत्यक्ष बघता आला आणि काही काळाकरता का होईना प्रत्यक्ष जगताही आला. त्या सर्वच कलाकारांनी केलेलं काम प्रचंड मोठं आहे,चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही त्यांना आणि त्यांच्या कामाला सलाम करू शकलो. झपाटल्यासारखे काम करणे म्हणजे काय असते ते या चित्रपटाच्या उत्तम टीम मुळे अनुभवास आले.

बालगंधर्व यांच्याविषयी वाचण्यापूर्वी नाट्यसंगीताबाबत गैरसमज होते. शौनक, राहुल अशा मित्रांमुळे संगीत कळत गेले.पुरुष साडी का नेसतात, हा प्रश्न मला असायचा. साडी नेसणे, वावरणे ही अवघड गोष्ट आहे ही बाब यानिमित्ताने समजली. विक्रम गायकवाडांनी मेकअपसाठी बालगंधर्व यांच्या काळातील नैसर्गिक रंग वापरले. मला आठवतंय 15 किलोची साडी नेसायला मला सव्वा तास लागत असे. पण या मेहनतीनंतर जी स्री आरशात दिसली ती पाहून प्रेमात पडायला झाले. चित्रपटामध्ये बालगंधर्व यांनी साकारलेल्या स्री भूमिका सत्वयुक्त व्हाव्यात, सौंदर्ययुक्त, शालीन व्हाव्यात यासाठी खूप काळजी घेतली. बाईपणाचे उसणे अवसान आणता आणता मी बाई झालो आणि यश मिळाले.

लोकमान्य टिळक करतानाही मी तयार नव्हतो. कारण मी कुठल्याच अँगलने टिळकांसारखा दिसत नव्हतो. ते सावळे होते. शरीरयष्टीने बळकट होते. आमच्यात काहीच साम्य नाही. त्यांचा चेहरा आणि माझा चेहराही वेगळा होता. त्यामुळे रंगभूषाकार विक्रम गायकवाडलाही मी विचारले की, मला का घेता आहात? तो म्हणाला,“ मला माहितीये तु बरोब्बर साकारशील!’ जो पर्यंत विक्रम गायकवाडचे हात डेस्कला माझ्या चेहर्‍यावर फिरले नाहीत तोपर्यंत मी मान्यच करायला तयार नव्हतो. विक्रम गायकवाड हा मेकअपच्या दुनियेतला जादूगार आहे. त्याचा हात फिरला की काही होते. शुटींगच्या दीड महिना आधी माझी लूक टेस्ट झाली. दोन अडीचतास मेकअप चालला होता. कारण त्यावेळी माझ्या डोक्यावर केस होते. टक्कल केले नव्हते. मग विक्रमने मला टक्कल लावले. माझा रंग बदलला. मिशी लावली. कपडे घातले. नंतर मी बाहेर आलो. बाहेरची मंडळी मला पाहून अवाक झाली, काही जण माझ्याकडे पाहून अक्षरशः रडू लागली.

माझ्या मते, कुठलाही बायोपिक किंवा चरित्रपट तुमच्याकडे आला आणि अभिनेता म्हणून तुम्ही कितीही उत्तम असाल; तरी त्या व्यक्तिमत्वावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. ‘लोकमान्य’ केल्यानंतर मी माझ्या निर्मात्यांना सांगितले होते की मला आता बायोपिक करायचा नाही. पण दिग्दर्शक-लेखक अभिजित देशपांडेची भेट झाली आणि त्याने काशिनाथ घाणेकरांवर बायोपिक करण्याचा विचार बोलून दाखवला आणि मीच ही व्यक्तिरेखा साकारावी असा आग्रह धरला. त्यामुळे काशिनाथ घाणेकर साकारण्याचे सर्व श्रेय अभिजितचे आहे, असे मला वाटते. फार वर्षांपूर्वी फोटोग्राफर भरत पवारने घाणेकरांसारखा गेट अप करून माझं फोटोशूट केले होते. कारण आपण भविष्यात कधीतरी घाणेकरांची भूमिका साकारू असा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता.

डॉ. काशिनाथ घाणेकर हे नाव आजच्या पिढीला फारसे परिचयाचे नसले तरी मराठी सिनेसृष्टीतील सुवर्णकाळ पाहिलेला आणि जगलेला महान अभिनेता असे त्यांचे वर्णन केले जाते. ‘धर्म पत्नी’, ‘पाठलाग’, ‘मराठा तितुका मिळवावा’, ‘मधुचंद्र’, ‘देव माणूस’, ‘अजब तुझे सरकार’, ‘हा खेळ सावल्यांचा’ असे एकापेक्षा एक सिनेमे त्यांनी आपल्या जादुई अदाकारीने सुपरहिट केले आहेत. घाणेकरांबद्दल, त्यांच्या अभिनयशैलीबद्दल बर्‍याच दिग्गजांकडून ऐकून होतो, पण त्यांना कधी पाहिले नव्हते. कारण माझा जन्म 1975 चा आणि घाणेकर 1986 मध्ये गेले. त्यावेळी माझा अभिनयाशी संबंधही नव्हता. अशा व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिरेखा साकारण्याचे एक वेगळेच आव्हान होते. यासाठीची ऑफर आली, तेव्हा खरे तर माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. पण अभिजीतने त्यांचा पूर्ण अभ्यास केल्याने त्याच्या सांगण्याप्रमाणे काम गेल्याने हा प्रवास खूप सोपा झाला. घाणेकरांचा स्वभाव माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होता. त्यामुळे अशा व्यक्तिरेखेसाठी माझी निवड करण्याचे श्रेय पूर्णपणे अभिजीतला जाते. पण माझ्यासाठी ही भूमिका साकारणे खूप कठीण होते. कारण परस्पर भिन्न स्वभाव असलेल्या एका महान कलाकाराची व्यक्तिरेखा पडद्यावर जीवंत करायची होती. कॅमेरा फेस करण्यापूर्वी घाणेकर समजावे यासाठी काही पुस्तकेही वाचली. त्यातूनही घाणेकरांचे स्वभावविशेष समजत गेले. प्रतिभा ही वीजेसारखी असते. वीज चमकताना जसा लख्ख प्रकाश पडतो तसे प्रतिभेचे असते. तो प्रकाश एकदा का दिसला की, पुढे सर्व सोपे होते. नंतर केवळ मेहनत घेणे आपल्या हाती असते. बायोपिकच्या ऑफर्स येण्यामागे लोकांचा माझ्यावरील विश्वास असल्याचे मी मानतो.

बालगंधर्व, लोकमान्य आणि काशिनाथ घाणेकर यांच्यावरील जीवनपट साकारल्यानंतर माझ्यावर बायोपिकची छाप उमटली. त्यामुळे मला आज यापुढील काळात कोणते व्यक्तिमत्त्व साकारायला आवडेल असे सातत्याने विचारले जाते. त्यादृष्टीने विचार करता आज माझ्यासमोर तीन व्यक्तीरेखा आहेत.

यातील एक म्हणजे बाजीराव पेशवे. पण त्यांची छोटीशी भूमिका मी केलेली आहे. तसेच हिंदीमध्ये यावर चित्रपटही तयार करण्यात आला आहे. दुसरी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका. कारण माझे छत्रपती शंभूराजेंवर विलक्षण प्रेम आहे. याखेरीज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवारसाहेबांची भूमिका मला करायला आवडेल. ही बाब मी स्वतः पवार साहेबांच्या कानावरही घातली आहे. सगळ्या गोष्टी स्क्रीप्टमध्ये जुळून आल्या, पवारसाहेबांंनी मान्यता दिली तर मला करायला आवडेल. कारण एक राजकीय नेता म्हणून इतकी वर्षे ते स्वत:ची क्षमता टिकवून आहेत. आजही त्यांच्या मनाचा थांग लागत नाही. सर्व क्षेत्रांबाबत त्यांचा दांडगा अभ्यास आहे. सगळ्या क्षेत्रातील माणसांशी त्यांचा संवाद असतो, परिचय असतो. तरी सुद्धा समोरच्याला काहीच अंदाज लागत नाही. हे सगळे फार विलक्षण आहे. माझ्यासाठी एक अभिनेता म्हणून खूप आव्हानात्मक आहे. तर असे कोणी छान पद्धतीने केले तर मला या चित्रपटात काम करायला आवडेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com