यशाचा भुलभुलैय्या आणि मुले

यशाचा भुलभुलैय्या आणि मुले

परिसंवाद- ‘मूल घडवताना’

डॉ.ऋतु सारस्वत, सामाजिक क्षेत्राच्या अभ्यासक

भारतीय शिक्षणपद्धती केवळ तीन तासांना वाहिलेली आहे, असे म्हणता येईल. हेच तीन तास विद्यार्थ्याचे भवितव्य निश्चित करतात आणि भविष्यात तो यशस्वी होणार की नाही, हेही निश्चित करतात हे वास्तव आहे. तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षणव्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा.

विद्यार्थ्यांच्या परीक्षांची धामधूम सुरू झाली आहे आणि परीक्षा जणू आपलीच सुरू आहे, असे पालकांना वाटत आहे. शाळकरी मुलांना त्यांचे पालक हल्ली खूपच सुविधा उपलब्ध करून देतात; परंतु त्या मोबदल्यात त्यांना हवे असतात जास्तीत जास्त गुण! वस्तुतः काही विषय मुलांना कळतसुद्धा नसतात आणि पालकांना वाटते की, जितका अभ्यास मुले करतील तितके अधिक गुण त्यांना मिळतील. त्यामुळेच देशातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना परीक्षेपेक्षा अधिक ओझे वाटते ते पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांचे. परिणामी, मुले प्रचंड दबावाखाली अभ्यास करीत आहेत.

वरवर पाहता हा अगदी साधा-साधा तणाव दिसतो; परंतु त्याचे रूपांतर कधी नैराश्यात होईल, हे सांगता येत नाही. या नैराश्यातून विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून आले होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या 2020 च्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत 81 हजार 758 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 2019 मध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण असह्य झाल्याने आत्महत्या केली होती. राज्यवार आकडेवारी पाहिली असता, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक होता, हे याठिकाणी लक्षात घ्यायला हवे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत बरेच काही अनपेक्षित आहे आणि त्यात लवकरात लवकर बदल केला पाहिजे, असेच यातून सूचित होते.

वास्तविक भारतीय शिक्षणपद्धती केवळ तीन तासांना वाहिलेली आहे, असे म्हणता येईल. या तीन तासांत विद्यार्थी परीक्षा देतात. हेच तीन तास विद्यार्थ्याचे भवितव्य निश्चित करतात आणि भविष्यात तो यशस्वी होणार की नाही, हेही निश्चित करतात ही अत्यंत आश्चर्यजनक गोष्ट असली, तरी हेच वास्तव आहे. आपल्या संपूर्ण शिक्षणव्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. अपयशालाही जीवनात महत्त्वाचे स्थान असते आणि अपयश जर आपण लज्जास्पद बनविले तर ते जीवनावर सखोल परिणाम करू शकते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मुले पालकांच्या अपेक्षांमुळे तणावाखाली आहेत. जर्मनीतील के डायचे वेले यांच्या एका अहवालातून मुलांची घुसमट मध्यंतरी जगासमोर आली होती. या अहवालात दक्षिण कोरियातील एक विद्यार्थिनी किम युन असे म्हणते की, ज्या मुलांना चांगले गुण मिळत नाहीत किंवा ज्यांना चांगल्या शाळा-कॉलेजात प्रवेश मिळत नाही, त्यांच्याकडे अत्यंत हीन दृष्टिकोनातून पाहिले जाते. भारतातील विद्यार्थ्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तीन तासांच्या परीक्षेचे केलेले मूल्यांकन हे संपूर्ण जीवनातील यशापयश मोजण्याचे परिमाण होऊ शकत नाही, हे मानायलाच पालक तयार नाहीत. असे खरोखर असते, तर शाळा-कॉलेजात सर्वाधिक गुण मिळविणारे विद्यार्थी देशातील सर्व प्रतिष्ठित पदांवर विराजमान झाल्याचे दिसले असते आणि कमी गुण मिळविणारे विद्यार्थी सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरले असते. परंतु असे दिसत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणजेच खरे यश होय.

जी मुले तासन्तास अभ्यास करतात, तीच यशस्वी होतात, असे पालकांना वाटते. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये घडलेल्या घटनेतून याला पुष्टी मिळते. चीनच्या झोजियांग प्रांतातील शिक्षण विभागाकडून पालकांना असे निर्देश देण्यात आले होते की, सर्व शाळकरी मुले रात्री दहापूर्वी झोपलेली असली पाहिजेत. त्यांचा गृहपाठ पूर्ण झाला किंवा नाही झाला तरी त्यांनी दहाच्या आत झोपले पाहिजे. पालकांनी या निर्णयाला ‘होमवर्क कर्फ्यू’ असे नाव दिले. अशा निर्णयांमुळे मुले स्पर्धेत मागे पडतील, असे पालकांचे मत आहे. वस्तुतः दिवसातील सात ते आठ तास झोपणे मुलांच्या मानसिक विकासासाठी आवश्यक आहे, हे सिद्ध झाले आहे. वायलर युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसच्या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षानुसार, आठ तास झोप घेणारे विद्यार्थी पाच ते सहा तासच विश्रांती घेणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण मिळवतात. शालेय अभ्यासक्रमापुरती आणि पाठ्यपुस्तकापुरती आपण आपली दृष्टी कैद करून ठेवली आहे.

फिनलँड, सिंगापूर, जपान आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये यापेक्षा वेगळी मानसिकता पाहायला मिळते. 1947 मध्ये शिक्षण क्षेत्रातील सुधारणेसाठी जपानने जेव्हा शिक्षण हा मूलभूत अधिकार असल्याचा कायदा तयार केला, तेव्हा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाची रूपरेषा तयार केली. त्यातील अनुच्छेद 10 मध्ये म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीवर अप्रत्यक्ष नियंत्रण मिळविणे हा शिक्षणाचा अर्थ नाही. संपूर्ण समाजासाठी उत्तरदायी बनणे हा शिक्षणाचा हेतू आहे. मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेची आपण मात्र अवहेलना करतो. आपली संपूर्ण शिक्षणपद्धती समस्याकेंद्रित नसून ती उत्तरकेंद्रित बनली आहे. आपण ठरविलेल्या प्रश्नांची आपण ठरविलेली उत्तरे मुलांनी देणे अपेक्षित मानल्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता त्याच चौकटीत खुंटते. त्यामुळे मुलांमध्ये भीती आणि संभ्रमाची स्थिती निर्माण होते.

महत्त्वाचा प्रश्न असा की, पालक जर मुलांना सायकल चालवायला शिकवताना तो वारंवार पडणार आणि त्यामुळेच त्याला उत्तम सायकल चालवता येणार, हे गृहित धरतात (आणि तसे घडतेही) तर शालेय परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळालेच पाहिजेत, असा आग्रह हेच पालक का धरतात? अति सजगता आणि अति सावधगिरी यामुळे मुलांच्या मार्गात नकळत काही अडथळे येतात, हेच खरे आहे.

यासंदर्भात जॉन हॉल्ट यांनी त्यांच्या ‘हाउ चिल्ड्रन लर्न’ या पुस्तकात एक उदाहरण दिले आहे. ते लिहितात, लंडनच्या हॉलंड पार्कमध्ये मुले अनेक झाडांवर चढू शकतात. या झाडांवर त्यासाठी दोर्‍याही बांधल्या आहेत. मुले झाडावर चढू शकतात; झाडावर झुलूही शकतात. मुलांचा खेळ पाहणार्‍यांशी बोलून हॉल्ट यांनी तेथे खेळणार्‍या किती मुलांना जखमा होतात, याची माहिती घेतली. त्यांना असे समजले की, जेव्हापासून पालकांना बागेत येण्यास मनाई करण्यात आली,

तेव्हापासून तेथे एकाही मुलाला अथवा मुलीला जखम झालेली नाही. मुलांच्या आया नेहमी ‘सांभाळून... पडशील’ असे ओरडत राहतात. या ओरडण्यामुळे मुलांचे संतुलन बिघडून ती खरोखर पडतात. काही पालक मुलांच्या क्षमतेपेक्षा अधिक काहीतरी करावे म्हणून सूचना देतात. ती मुलेही पडतात. आपल्या मुलांची क्षमता समजून न घेता, आपल्या अपेक्षांनुरूप त्यांना आकार देण्याचा प्रयत्न केल्या मुलांची आवड, आत्मविश्वास आदींचा मुलांनाच विसर पडतो. खरी गोष्ट अशी की, जेव्हा मुले नव्या कामाचा प्रारंभ करतात तेव्हा त्यांच्या डोक्यात यशापयश हा विषयच नसतो. ते केवळ आपली आवड आणि आवडीप्रमाणे एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न एवढ्यातच रमलेली असतात. परंतु जेव्हा घरातील मोठ्या माणसांना खूश करणे महत्त्वाचे ठरते, तेव्हा यश आणि अपयशात एक मोठी दरी निर्माण होत जाते.

मुलांमध्ये सातत्याने वाढत असलेली निराशा आणि परीक्षेचा तणाव रोखायचे असेल तर गंभीर चिंतनाची गरज आहे. पालक, शिक्षक, शिक्षण प्रणाली आणि परीक्षा पद्धती यांचे योग्य समायोजन विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत परिस्थिती अशीच राहील. केंद्रीभूत स्पर्धा आणि मूल्यांकनावर आधारित शिक्षणाला फिनलँडने नकार दिला आहे. तेथील शिक्षणव्यवस्थेत ‘शिकवण्या’वर भर दिला जातो. त्यामुळेच हायस्कूलपर्यंत एकही परीक्षा घेतली जात नाही. 15 वर्षे वयाच्या मुलांचे गणित, विज्ञान आणि एकंदर शिक्षणाची क्षमता यांचे मूल्यांकन करणार्‍या प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टूडंट्स असेसमेन्ट (पीआयएसए) या उपक्रमात फिनलँडचे विद्यार्थी नेहमी अव्वल स्थानावर असतात.

तेथे भाषा आणि गणित शिकविण्यासाठी संगीत आणि खेळांचा आधार घेतला जातो. त्याचप्रमाणे सिंगापूरने 2019 पासून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. शिकण्याची क्षमता मुलांनी वाढवावी, तुलनात्मक विचार त्यांच्या मनात येऊ नये आणि त्यातून चिंताग्रस्त होऊ नये, एवढाच हेतू त्यामागे आहे. जॉन हॉल्ट यांच्या ‘हाऊ चिल्ड्रन फेल’ या पुस्तकात लिहिले आहे की, मुलांना अशा प्रकारचे प्रश्न किंवा गणिते घालू नयेत ज्यांचे उत्तर स्वयंचलित यंत्रासारखे देता येईल. मुलांना जे समजले आहे ते शब्दांत मांडण्याची क्षमता मुलांमध्ये यायला हवी. जे समजले आहे, त्याची उदाहरणे त्यांना देता यावीत. जे शिकले आहे ते प्रत्येक रूपात, प्रत्येक स्थितीत समजून घेण्याची आणि त्याचा विचारांशी संबंध जोडण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये यायला हवी. यासाठी पालकांनी आपला दृष्टिकोन रुंद करणे अत्यंत आवश्यक आहे. तीन तासांची परीक्षा हाच यशाचा एकमेव निदर्शक नाही, हे समजून घ्यायला हवे आणि मान्यही करायला हवे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com