
अतुल कहाते, संगणकतज्ज्ञ
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे आपण आपल्या आयुष्यात असे काही बघितले नव्हते आणि इथून पुढे बघणार नाही, असे म्हणतो. यातून कोण वाचेल आणि कोण तरेल हेही कुणीच सांगू शकत नाही. असे असताना आपणच निर्माण केलेल्या जनुकीय आणि एआय या शाखांच्या एकत्र येण्याने पुन्हा लवकरच अशा प्रकारचे महाभयंकर संकट येऊ शकणार नाही असे कसे म्हणणार? याचे कारण म्हणजे हे सगळे उपलब्ध आहे का, हा प्रश्नच नाही. फक्त ते कुणाच्या हाती पडते आणि त्याचा वापर संबंधित मंडळी नेमक्या कशा प्रकारे करतात एवढाच प्रश्न आहे.
स्विडीश अभ्यासक निक बॉस्ट्रॉम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले मोठे विचारवंत मानले जातात. कृत्रिमरीत्या जीवशास्त्रामधल्या घटकांमध्ये बदल घडवण्याच्या संदर्भातलं त्यांचं विधान वाचण्यासारखं आहे ः ’नजीकच्या काळात जीवशास्त्रामध्ये कृत्रिमरीत्या घडवून आणले जाणारे बदल अस्वस्थ करून सोडणारे आहेत.’ आपल्याला नेमके हवे तसे सूक्ष्म जीव तयार करणे आपल्याला शक्य होत चालले आहे. ’तसेच अनेक साथीच्या आजारांविषयीची बारीकसारीक माहिती जाहीररीत्या उपलब्ध आहे.’ देवीचा रोग किंवा 1918 सालची ’स्पॅनीश फ्ल्यू’ची साथ यांना कारणीभूत असलेल्या विषाणूंचा जनुकीय आराखडा कुणीही इंटरनेटवरून मिळवू शकतं.
न्यूयॉर्कमधली जिनस्पेस किंवा कॅलिफोर्नियामधली बायोक्युरियस यांच्यासारख्या गटांचं मुख्य कामच विज्ञानाविषयी कुतूहल असलेल्या सर्वसामान्य लोकांना जीवशास्त्रामधले निरनिराळे प्रयोग करून बघणे आणि एकमेकांकडून शिकणे याला मदत करण्याचे आहे. हे काम फक्त सगळ्यांना ज्ञात असलेले प्रयोग करून बघण्यापुरते मर्यादित नसून निर्माण झालेल्या जीवसृष्टीमध्ये कृत्रिमरीत्या बदल करून बघण्याचेही आहे. जीवशास्त्रामध्ये असे प्रयोग करून बघणारे गमतीने आपल्या अस्तित्वाचा अत्यंत तपशीलवार आराखडा ज्यामध्ये असतो त्या ‘डीएनए’ला जगातली पहिलीवहिली ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ असे म्हणतात. इथवरच हे न थांबता खरोखरच जशी हॅकर मंडळी संगणकामधली एखादी ऑपरेटिंग सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न करतात त्याच धर्तीवर या डीएनएला हॅक करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयोग सुरू आहेत.
कित्येकदा कुठलाही कुटील हेतू मनात न बाळगता सूक्ष्म जिवांवर अशा प्रकारे केले जात असलेले प्रयोग अचानकपणे विलक्षण धोकादायक ठरू शकतात. यामुळेच जवळपास दोन दशके लुप्त झालेला ’स्वाईन फ्ल्यू’चा विषाणू 1977 साली अचानकपणे पुन्हा अवतरला. 1950च्या दशकापासून प्रयोगशाळेत गोठवण्यात आलेला एक सूक्ष्म जिवीय नमुना एका सर्वसामान्य कर्मचार्यााच्या हातून चुकून बाहेर पडल्याचा हा परिणाम असल्याचे नंतर निष्पन्न झाले! अशा दुर्घटना नंतर ग्वानारिटो, सार्स अशा विषाणूंच्या बाबतीतही घडल्या. आपल्याला गेल्या दीड वर्षापासून सुन्न करून सोडलेल्या कोरोना विषाणूच्या बाबतीतही असे काहीतरी घडले असल्याचा संशय वारंवार व्यक्त केला जातो. यामागे चीनचा हात असल्याचेही बोलले जाते. अर्थातच यामधले सत्य पडताळून बघणे तसे सोपे नसल्यामुळे त्याविषयी काही भाष्य करणे कठीण आहे.
सूक्ष्म जिवांसंबंधीचे हे प्रयोग, माणसाच्या डीएनएची तपशीलवार माहिती यांची उपलब्धता इथून पुढे आणखी किती घातक विषाणूंना जन्म देणार आहे हा विचारसुद्धा धडकी भरवणारा आहे. चुकून आणि जाणूनबुजून अशा दोन्ही प्रकारे यामुळे जगभरात थैमान घालू शकणारे जिवाणू आणि विषाणू जन्मू शकतात हे निर्विवाद आहे. कुठल्याही पारंपरिक शस्त्रास्त्रांविना आपल्या शत्रूंना जेरीला आणण्यासाठी या सूक्ष्म जिवांचा वापर केला जाऊ शकतो. हे शक्य आहे का याविषयी चर्चा करण्याची गरजसुद्धा नाही. फक्त ते किती सफाईने आणि यशस्वीरीत्या जमू शकते एवढाचा त्यामधला प्रश्न आहे.
हे सगळे आपल्याला धक्का देणारे वाटत असले तरी त्याच्या जोडीला आता संगणकशास्त्रामध्ये अत्याधुनिक समजल्या जाणाऱया ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’, ’मशीनलार्ंनग (एमएल)’, ’बिगडेटा’ अशा तंत्रज्ञानांची भर पडलेली असल्यामुळे या दोन्हींच्या एकत्रीकरणामुळे काय घडू शकते ही गोष्ट तर अवाक् करून सोडणारी आहे. या तंत्रज्ञानाचा सोपा अर्थ म्हणजे प्रचंड मोठया प्रमाणात उपलब्ध होत चाललेल्या माहितीचे विश्लेषण आणि पृथक्करण करून त्या माहितीच्या आधारेच संगणक आपोआप शिकत जातो. म्हणजेच आपण संगणकाला समजतील असे प्रोग्राम्स लिहून देण्याऐवजी संगणकच स्वतः शिकत राहतो आणि आपल्या कामातल्या चुका कमी करत जातो. यामुळे संगणकाकडून मिळणारे निष्कर्ष अधिकाधिक अचूक होत जातात. याचा परिणाम काय होऊ शकतो?
2002 साली एकर्ड विमर नावाच्या अभ्यासकाने डीएनएनसंबंधीची उपलब्ध असलेली माहिती विकत घेऊन पोलिओच्या रोगाला कारणीभूत असलेल्या जनुकाचा आराखडा तयार करून दाखवला. तेव्हा या कामाला तीन लाख डॉलर्स एवढा खर्च येत असे. आज यासाठी अगदी किरकोळ खर्च येतो. जगभरात पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यात आलेले असले तरी भविष्यात एखादी अतिरेकी संघटना, मानवताविरोधी सरकार किंवा एखादा माणूस वैयक्तिक पातळीवरसुद्धा हळूच हा विषाणू पुन्हा आपल्यावर हल्ला करण्यासाठी सोडू शकतो.
इतकेच नव्हे तर एआय आणि संबंधित तंत्रज्ञानांच्या मदतीने पोलिओप्रतिबंधक लसीशी कसे लढायचे, अत्यंत वेगाने हा विषाणू पसरवण्यासाठी काय करायचे, नेमक्या कोणत्या वातावरणात, तपमानात, परिस्थितीत तो जास्त तग धरू शकतो हे ठरवायचे अशा गोष्टीही सहजपणे साध्य होऊ शकतात. त्या कशा? एखाद्या विषाणूचा जनुकीय क्रम नेमका कसा आहे, माणसाच्या डीएनएमध्ये बिघाड निर्माण करण्यासाठी आत्तापर्यंतच्या प्रयत्नांचा वापर करून आपला हल्ला आणखी सुकर कसा करायचा अशा अनेक गोष्टी हल्लेखोर एआयच्या मदतीने शिकू शकतो. जनुकीय अभियांत्रिकीच्या क्षेत्राला एआयची जोड मिळाल्यावर अक्षरशः काही आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर एखादा संगणक आणि पुरेसं आर्थिक पाठबळ यांच्या जोरावर हे साध्य करणं अशक्य नाही.
याची झलक काही वर्षांपूर्वी बघायला मिळाली. ’बर्ड फ्ल्यू’ला कारणीभूत असलेल्या ’एच फाइव्ह एन वन’ या विषाणूसंबंधी अमेरिका आणि नेदरलँड्स इथे संयुक्त संशोधन सुरू होते. या विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये फक्त चार बदल म्हणजेच ’म्युटेशन्स’ घडवून आणून संशोधकांनी हा विषाणू खूप वेगाने पसरवू शकणारा, खूप जास्त घातक आणि माणसाला बाधू शकणारा असा बनवण्यात यश मिळवले तसंच हवेतून त्याचे प्रसरण होऊ शकेल असा भयंकर धोकाही त्यांनी निर्माण केला. यासाठी या विषाणूच्या रचनेत नेमके कोणते बदल केले पाहिजेत हे ठरवणे भाग होते. अर्थातच प्रचंड मोठया प्रमाणावर माहिती गोळा करून तिचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार घातकता निर्माण करणे याशिवाय हे शक्य नव्हते.
एआय आणि त्याच्याशी संबंधित असलेले तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले. आपले निष्कर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या महाघातक विषाणूची रचना याविषयीची माहिती छापण्यासाठी संबंधित गट उत्सुक होता. अर्थातच विज्ञानाने पुढे जात राहावे यासाठीच त्यांनी हे करायचे ठरवलेले असले तरी यामुळे जागतिक पातळीवर हाहाकार माजवू शकणारा विषाणू खरोखरच कुणीतरी तयार करून पसरवू शकेल या भीतीपोटी ही माहिती गुप्त ठेवण्यात आली.
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे आपण आपल्या आयुष्यात असे काही बघितले नव्हते आणि इथून पुढे बघणार नाही, असे म्हणतो. यातून कोण वाचेल आणि कोण तरेल हेही कुणीच सांगू शकत नाही. असे असताना आपणच निर्माण केलेल्या जनुकीय आणि एआय या शाखांच्या एकत्र येण्याने पुन्हा लवकरच अशा प्रकारचे महाभयंकर संकट येऊ शकणार नाही असे कसे म्हणणार? याचे कारण म्हणजे हे सगळे उपलब्ध आहे का, हा प्रश्नच नाही.
फक्त ते कुणाच्या हाती पडते आणि त्याचा वापर संबंधित मंडळी नेमक्या कशा प्रकारे करतात एवढाच प्रश्न आहे. जसा अणुबॉम्ब केव्हापासूनच तयार आहे, फक्त त्याचा वापर मानवतेच्या नशिबाने केला जात नाहीय, तसाच हा प्रकार आहे. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या मानवतेसाठी हा आशेचा किरण नक्कीच नाही; पण म्हणून वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?