
परिसंवाद- ‘मूल घडवताना’
अरुणा सरनाईक
मुलीनं तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं की आईच्या मनात नाना प्रकारच्या काळज्या निर्माण होऊ लागतात. अशावेळी तिच्यातील प्रेमळ, कनवाळू आई बाजूला पडून अनेकदा मुलीला बारीकसारिक गोष्टीत धारेवर धरलं जातं. त्यामुळे आई आणि मुलीच्या नात्यातील मैत्रीचा पडदा विरळ होऊ लागतो आणि आई ही आपली शत्रू आहे, अशी भावना मुलीच्या मनात निर्माण व्हायला लागते. त्यासाठी आईने मैत्रीचं नातं जपत तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या विश्वाची कल्पना मुलींना द्यायला हवी.
मुलींचं फुलणं आईने बघणं हे खूप आनंदाचं असतं. पण त्याचवेळी तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्या मुलीची तिला काळजीही वाटत असते. धोके, खाचखळगे, अवघड ठिकाणं, निसरडया वाटा याची जाणीव मुलींना जरूर द्यावी. पण त्यातुन भीती, घाबरलेपण, गोंधळलेपण, न्यूनगंड, बावरलेपणाचं व्यक्तिमत्व तयार होणार नाही याची काळजी आईनं घेणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. एखा़द्या सकाळी एकदम जाणवून जातं, अरेच्चा! ही तर एकदम मोठी दिसू लागली आहे. स्वत:शी लेकीचं बोलणं, आरशात स्वत:ला वारंवार निरखणं, मैत्रिणींशी फोनवर तासन्तास बोलणं, सैरभैर होणं, भुरूभुरू उडणार्या केसांना न सावरणं किंवा उगाच सावरत असल्याचा आभास करणं, हे सारं आईच्या कधी नकळत तर कधी समोर सुरू असतं. याच काळात मुलींच्या हालचालींना गोलावा येतो.
कपडयाचा विशिष्ट आकार, रंग आवडू लागतो. स्वत:तील चांगल्या-वाईट गुणांची प्रकर्षानं जाणीव होते. आईच्यात रमण्यापेक्षा बाहेरील मैत्रिणी जवळच्या वाटू लागतात. स्वत:च्या नावाचं, आडनावाचं विशेषत्वानं भान येतं. आपल्या प्रत्येक कामाचीं दखल प्रत्येकानं, म्हणजे घरातल्यांनी आणि आजूबाजूच्यांनी घेतलीच पाहीजे, असा दुराग्रही हट्ट वाढीला लागतो. मैत्रिणींचा कंपू करून खा,खा, खि, खिची बाराखडी आळवत बसायला आवडतं. कोणाची तरी टांग खेचायची आणि खूप हसायचं. एखाद्या फिल्मी हिरोवर जीव टाकायचा. तसाच कोणीतरी आजूबाजूला दिसतो का याचा कॉलेजला जाताना नकळत शोध घ्यायचा. कोणीतरी रोडरोमिओ याची वाट पाहत असतो आणि मग भावनेच्या भरात नको त्या घटना घडतात. काही वेळा आयुष्यातून उठण्याची वेळ येते. आज दर दिवसाआड वृत्तपत्रात एकतर्फी किंवा दुतर्फी प्रेमाच्या शोकांतिका वाचायला मिळतात.
आपण म्हणतो, हे तर वयच असं असतं. अगदी साहित्यिक भाषेत म्हणायचं झालं तर फुलपाखरी वय ! या वयात मुलीला आईपेक्षा मैत्रिण जवळची वाटते. हे किती आयांनी ओळखलेलं असतं? न ओळखण्यातून किंबहुना ही मुलींची मानसिकता न जाणून घेण्यातून आई दुष्ट स्त्रीसारखी वाटायला लागते. कारण ती वर्तनाचे कडक नियम लावू पाहते. ‘हे चांगलं नाही, ते बरं दिसत नाही, पाय पसरून बसू नकोस, बाजारातून हे घेऊन ये, कामं झालीत तर उगाच रेंगाळू नकोस, सात वाजण्यापूर्वी घरात आलंच पाहीजे, ही मैत्रिण नवीन दिसते, एवढ्यातच मैत्री झालेली दिसते, तिच्या घरी कोण कोण आहेत, मला फारशी नाही पटली नाही,’ असे अनेक प्रश्न आईच्या मनात निर्माण व्हायला लागतात. नन्नाचा पाढा वाढवणारी आई शत्रूपक्षातील बनते. मग नकळत आईपासून गुपितं चोरली जाऊ लागतात हीच का आपली आई? आधी अशी नव्हती. मग आताच का असा फरक? एकसारखी धारेवर धरते? प्रत्येक गोष्टीत हिच्या मनाचा नकारात्मक अडसर का? एवढ्या तेवढ्या गोष्टींचा सतत जाब का विचारते? प्रेमळ आई अंतर्धान पावली नि त्या जागी हातात छडी आणि मनात संशय घेऊन वावरणारी एक शिस्तीची मॅडम झालीय, अशा अनेक भावना मुलीच्या मनात निर्माण व्हायला लागतात.
अशावेळी मुलीचं आईपासून दुरावणं टाळण्यासाठी आईनं मुलीला समजावून घ्यायला हवं. मुलींच्या भूमिकेतुन विचार करून सामंजस्य, नैतिक समजावणी यांचा भावनिक पूल तयार करायला हवा. सूचना सकारात्मक हव्यात. आज्ञा, आदेश धमकीवजा नसाव्यात. कधी जवळ घेऊन तर कधी दुष्परिणामांची जाणीव देऊन आईपण निभावायला हवं. ते गाजवू नये तर बरोबरीचं नातं जपत पुढे न्यायला हवं. कडक शब्दांपेक्षा पे्रमळ मातेची भूमिका, कनवाळू मन आणि रास्त मन, सुनावतानाही आवाज सौम्य पण त्यातील सच्चेपणा आणि त्यातील वास्तव जरूर जाणवेल असा असावा.
ज्या दिवशी मासिक पाळी येते तेव्हा तो शरीरधर्म, निसर्गक्रम, स्वीकारणं आईमुळेच सहज शक्य झालंय हे मुलींना कळताच आईविषयीची पूर्वीची भावना बदलते. शिस्तीची मॅडम जाऊन मैत्रीचं नातं मनात उमलून येतं आणि मग ते नातं मात्र कायमस्वरूपी राहतं. त्या नात्याचा मान आईच्या म्हातारपणात तिची आई होऊन सेवा करण्यापर्यंत मुली मनात जपतात. आता कडक आई मवाळ होत असली तरी ती मुलीची चिंता करत राहते. कडकपणाची जागा चिंतेनं घेतल्याचं जाणवतं. सारी काळजी मुलींनीच घ्यायची, असं सांगणं, समजावणं सुरू होतं. खरं तर आजची पिढी हुशार आहे. त्यांना बर्याच गोष्टी माहित असतात. नेटवर तर नको इतकी माहिती सापडते. हे जरी असलं तरी आईच्या काळजीचं तपमान नव्या-जुन्या आयांमध्ये सारखंच असतं. मुलगी न्हातीधुती झाली की, आईचं प्रोटेक्टिव्ह होणं हा धर्म काही चुकत नाही. मात्र आजच्या 21 व्या शतकातील आईनं नितीमत्तेचा अनावश्यक बागुलबुवा करू नये. नकारात्मक द़ृष्टीकोन आणि संशयी मन यावर मर्यादा घालायला हव्यात.
स्त्रीत्व जपणं ही गोष्ट भितीदायक नसून एक सुंदर अनुभव आहे. ती एक संपूर्ण जीवनाची सकारात्मक सृजनशील अवस्था आहे. हे हळुवारपणे मुलींना समजावणं, आत्मविश्वासानं त्याला सामोरं कसं जावं हे सांगणं हे आईचं सर्वात महत्वाचं काम आहे. तारूण्याचा खुला स्वर मारणं यासाखा दुसरा अन्याय नाही. कारण कदाचित एखादी चूक झाली तर एखादा निर्णय चुकूही शकतो. स्वनिणर्यातून मुली पुढे जातील, चुकतीलही आणि ठेचकाळतील. तेथे सावरायला आईचाच हात कोणत्याही परिस्थितीत पुढे यायला हवा. पोटातल्या गाभार्यापासून सुरू झालेल्या मैत्रीला नेहमी मैत्रीचीच ओढ असते.