अंतहीन धावाधावीचा कडू डोस

संग्रहीत चित्र
संग्रहीत चित्र

परिसंवाद : धावाधाव वृत्तवाहिन्यांच्या पडद्यामागची

नितीन भालेराव, माजी संपादक

मुद्रित माध्यमांमधील पत्रकारितेत वृत्तवाहिन्यांसारखी डेडलाईन नसते. दिवसभरात घडलेल्या घटनांचा सविस्तर आढावा घेऊन रात्री त्याचे संपादन केले जाते. इलेक्ट्रॉनिक मीडियात मात्र घटना घडल्याक्षणी तात्काळ प्रेक्षकांसमोर मांडणे गरजेचे असते. हा डेडलाईनचा दबाव अंतहीन असतो आणि या क्षेत्रात काम करणार्‍यांना तो पेलावाच लागतो. दुसरीकडे ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्वानुसार बातमी समोर आल्यानंतर त्या क्षणाला जे जे उपलब्ध होईल ते मिळवत मांडत राहावे लागते. तिथे सबबी किंवा तक्रारी सांगून चालत नाही. साहजिकच या प्रचंड आणि सततच्या वर्कप्रेशरमुळे आरोग्यावर आणि कुटुंबावर अत्यंत नकारात्मक परिणाम होतात. पण त्याला पर्याय नसतो. म्हणूनच पॅशन असल्याखेरीज केवळ नोकरी म्हणून या क्षेत्रात येऊन चालत नाही.

मी मुद्रित माध्यमांमध्ये जवळपास दहा वर्षे काम केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे वळलो. या दोन्ही माध्यमांमधील मुलभूत फरक आहे तो डेडलाईनचा ! उदाहरणार्थ, सकाळी आठ वाजता अगदी महाप्रलय जरी आला तरी मुद्रित माध्यमातील पत्रकाराला ती बातमी रात्री आठ वाजेपर्यंत दिली तरी चालू शकते. यादरम्यान तो या घटनेच्या इतर अनेक पैलूंविषयीची माहिती मिळवून, त्याची खातरजमा करुन, तज्ज्ञांशी बोलून त्यांचे मत घेऊन, इतिहासातील संदर्भ शोधून ती बातमी अधिक विस्ताराने आणि प्रभावीपणाने व परिपूर्ण करुन देऊ शकतो. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये डेडलाईन नसते. एखादी घटना घडल्यानंतर किंवा काही वेळ घडत असतानाच वाहिन्यांवरील पत्रकारला त्या प्रत्येक क्षणाला जे जे घटक समोर येतील ते पुढे पाठवायचे असतात. प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचताना आधी मुख्य बातमी येते, त्यानंतर त्याचे इतर तपशील येतात, त्यापाठोपाठ घटनेशी संबंधितांचे फोनो घेऊन ते दाखवले जातात, यादरम्यान काही व्हिज्युअल्स किंवा ग्राफिक्स तयार केली जातात. अशा प्रकारे बातम्या आणि त्याच्याशी संबंधित उपघटकांचा हा प्रवाह अव्याहत सुरुच असतो.

त्यातील काही बातम्यांचे पॅकेजेस बनवले जातात आणि सायंकाळच्या किंवा रात्रीच्या बुलेटिनमध्ये दाखवले जातात. थोडक्यात, चक्रधरस्वामींनी सांगितलेल्या हत्तीच्या उदाहरणाप्रमाणे कोणत्याही बातमीचा तेथील पत्रकाराला जो अँगल दिसतो त्यानुसार तो मांडत असतो. परिणामी, अनेकदा एकच बातमी वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळी दिसते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे पुलवामाचा हल्ला. या हल्ल्याच्या वेळी लष्करी ताफ्यामध्ये नेमका ट्रक घुसला, मारुती कार घुसली की दुसरी चारचाकी घुसली याचे तपशील प्रत्येक वाहिनीवर वेगवेगळे येत होते. ज्याला जिथून जी माहिती मिळत होती ती प्रेक्षकांपुढे सादर केली जात होती.

मुद्रित माध्यमांपेक्षा वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा तणाव प्रचंड मोठा असतो. वेगही अफाट असतो. यामुळे अनेकदा अचूकतेकडे दुर्लक्ष होते. वास्तविक पूर्वी असे नव्हते. उदाहरणार्थ, चंद्रपूरच्या पत्रकाराने एखाद्या अपघाताची बातमी दिली. तर तेथील पोलिसांना फोन करुन बातमीची सत्यासत्यता तपासली जायची, अधिक तपशील घेतला जायचा आणि मग ती बातमी फ्लॅश केली जात होती. साधारणतः पाचेक वर्षांपूर्वीपर्यंत सर्वच वृत्तवाहिन्यांचा हा शिरस्ता होता. पण आता वाहिन्यांमध्ये अक्षरशः गळेकापू स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणी किंवा खातरजमा करण्याचा टप्पा दुसर्‍या स्थानावर गेला आहे; आधी बातमी देणे याला महत्त्व आले आहे. पण अनेकदा त्यामुळे तोंडावर पडण्याचे प्रसंगही उद्भवतात. वाहिन्यांच्या सुदैवाने, प्रेक्षकही आता सुजाण झाला आहे किंवा सरावला असल्याने तोही समजून घेतो. परंतु हे चुकीचे आहे. कारण यामुळे काही वेळा अनर्थ ओढावण्याचीही शक्यता असते.

मी वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात मी स्ट्रिंजर, रिपोर्टर, ब्युरो चिफ, ब्युरो एडिटर ते प्रोड्युसर अशा सर्व टप्प्यांवर मी काम केले आहे. त्यामुळे ऑन स्क्रीन आणि स्टुडिओ या दोन्हींचाही मला अनुभव आहे. या प्रवासात आव्हानात्मक ठरलेल्या अनेक आठवणी आहेत. ‘एबीपी माझा’मध्ये काम करत असताना एकदा तपास कार्यात अडथळा आणल्याचा आरोप करत माझ्या विरोधात पोलिसांनीच एक अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. जवळपास चार दिवस मी तणावाखाली होतो. नंतर रिलॅक्सेशनसाठी मी आठ दिवस गोव्याला निघून गेलो. परतताला मला विमानाचे तिकिट न मिळाल्यामुळे रस्तेमार्गाने मी गोव्याहून नाशिकला परतलो. साधारणतः सकाळी सहा-सातच्या सुमारास मी नाशिकला पोहोचलो आणि बातमी आली की मालेगावला दंगल झाली आहे. अशी घटना घडली की, त्या भागातील पत्रकाराला ‘मी सुट्टीवर आहे, मी इतका लांबचा प्रवास करुन आलो आहे’ यांसारख्या सबबी देण्याची मुभा नसते. त्यामुळं मी साडे सात वाजता मालेगावला जाण्यास निघालो. नाशिक ते मालेगाव 106 किलोमीटर अंतर आहे.

त्यावेळी हा रस्ता चौपदरीकरण झालेला नव्हता. रस्त्याची कामे सुरू असल्याने मालेगावला पोहोचण्यास दोन तास लागायचे. मालेगाव हे संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली. त्यामुळे मला ‘स्टार न्यूज’साठी हिंदीमधून आणि ‘स्टार माझा’साठी मराठीतून असे दोन्हीकडे वार्तांकन करावे लागले. नाशिकहून निघाल्यानंतर मी मोबाईलसाठी चार्जर घेतला, एके ठिकाणी चहा घेतला आणि असे करत सलग अडीच तास माझे मोबाईलवरुन वार्तांकन सुरू होते. मालेगावची सामाजिक परिस्थिती काय, तिथल्या दंगलींचा इतिहास काय आदी सर्व माहिती मी त्यामध्ये विषद करत होतो. विशेष म्हणजे त्याच वेळी मी स्वतः गाडीही चालवत होतो. मध्येच जर एखादा फोनो आल्यामुळे माझा कॉल होल्डवर ठेवला गेला तर तेवढ्या वेळात मी प्रत्यक्ष घटनास्थळावरची माहिती जमवत होतो. पुन्हा ती माहिती मराठीबरोबरच हिंदीतून देत होतो. आयुष्यातील तो अडीच तासांचा काळ अक्षरशः अविस्मरणीय होता.

दुसरा एक असाच प्रसंग मला सांगावासा वाटतो. मी ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीमध्ये नुकताच संपादक म्हणून पदभार स्वीकारला होता. या पदासाठीचा अनुभव मला नव्हता. ऋषी कपूर यांचे निधन झाले तेव्हा आम्ही विविध सेलीब्रेटींचे फोनो घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु हा चॅनेल अगदीच नवीन असल्यामुळे सेलीब्रेटी कोणी फारसे फोन उचलत नव्हते. प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत होते. मग आम्ही सामान्य प्रेक्षकांसाठी फोनलाईन खुल्या केल्या आणि ऋषी कपूरविषयीच्या तुमच्या आठवणी सांगा असे आवाहन केले. या आवाहनाला इतका तुफान प्रतिसाद मिळाला की पुढील तीन दिवस यासाठी फोन येत होते.

यामुळे लोकांपर्यंत आमच्या वाहिनीचे नाव पोहोचले. यातील सांगण्याचा मुद्दा म्हणजे त्या-त्या क्षणी असलेल्या दबावाच्या वेळी तुम्हाला चटकन मार्ग काढून पुढे जाता आले पाहिजे. किंबहुना जावेच लागते. कारण इथे ‘थांबला तो संपला’ अशी स्थिती असते. त्यामुळे तात्काळ भूमिका घेऊन पुढे जावेच लागते. घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य याचा विचार करत बसायलाही वेळ नसतो. सुदैवाने या दोन्ही प्रसंगात मी घेतलेले निर्णय हे यशस्वी ठरले. मुद्रित माध्यमांमध्ये इतक्या प्रचंड दबावाचा सामना करावा लागत नाही. अलीकडील काळात तर बहुतांश मोठ्या दैनिकांमध्ये सेंट्रल डेस्क’सारखी व्यवस्था कार्यरत झाली आहे. त्यामुळे या माध्यमातील प्रेशर खूप कमी झाले आहे.

वृत्तवाहिन्यांमध्ये प्रचंड दबाव असूनही त्याच्या व्यवस्थापनासाठी फारशी यंत्रणा कार्यरत नसते. मला आठवतंय, मुकेश अंबानी यांच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या भरलेली गाडी सापडल्याची बातमी आली तेव्हा त्याच्या पाच-दहा मिनिटे आधी मी तेथून निघालो होतो. बाळासाहेब थोरातांची मुलाखत घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो. अँटेलिनापासून पाच मिनिटांच्या अंतरावर त्यांचा बंगला आहे. त्यावेळी आमच्या डेस्कवरुन मला कळवले असते तर मी तातडीने तिथे पोहोचून वार्तांकन करु शकलो असतो. परंतु मी तिथून निघून आलो आणि दक्षिण मुंबईत आमचा वार्ताहरच नव्हता. सगळीकडे बातम्या झळकू लागल्यावर मला फोन आला. अशा वेळी चिडून जाण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे मी अँटेलिनाचे संग्रहित फुटेज दाखवा, पोलिसांची दृश्ये दाखवा आणि बातमी झळकवत अर्धा तास कसा तरी काढा असे सांगितले. पण रिपोर्टरला पोहोचायला जवळपास एक तास लागला. त्यानंतर त्याचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाले. अशा वेळी मग मान्यवरांचे फोनो घेणे, इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत का त्याची माहिती संग्रहित करुन दाखवणे यांसारख्या क्लृप्त्या कराव्या लागतात. कारण काहीही झाले तरी ‘शो मस्ट गो ऑन’...

वृत्तवाहिन्यांमध्ये अँकरची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी अँकर हा सतत अपडेटेड आणि अभ्यासू असणे गरजेच असते. परंतु अलीकडील काळात त्याला त्याच्या कानात बसवलेल्या ईअरफोनमधून डेस्कवरुन प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. पूर्वी त्याला केवळ मुद्दे दिले जायचे. पण आता म्हणजे फोनवरुन एखाद्याची प्रतिक्रिया घ्यायची असेल तर त्याला काय प्रश्न विचारावेत हेही डेस्कवरुन सांगितले जाते. त्यामुळे आज अँकर हा कठपुतली बाहुलीसारखा बनला आहे. तीन-चार वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. अँकर असो किंवा या क्षेत्रातील सर्वांनाच वर्तमानपत्रे वाचणे गरजेचे वाटायचे आणि ते आहेच. कारण केवळ बातम्यांसाठी नव्हे तर त्यातील लेख, संपादकीय आणि अन्य माहितीतून कोणत्याही गोष्टीचे विविध पैलू समजतात. मी संपादक असताना प्रत्येक अँकरला अभ्यासासाठी दोन-तीन विषय द्यायचो. बातम्या देण्यापलीकडे जात विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळविश्व, कृषी यांसारख्या क्षेत्रात नवीन काय सुरू आहे, प्रवाह कोणते आहेत याचा अभ्यास करण्यास सांगायचो. याचा फायदा म्हणजे त्या क्षेत्रातील एखादी बातमी आली की अँकरला थोडेसे इनपुट दिले की तो अत्यंत प्रभावीपणाने ती सादर करू शकतो. पण आता तशी स्थिती राहिली नाही. आज अनेक अँकर सातचे बुलेटीन असेल तर पाच-साडेपाच पर्यंत स्टुडिओत पोहोचतात, आल्यानंतर मेकअपला जातात आणि साडे सहा वाजता हजर होतात. परंतु आज रोलऑर्डर कोणती आहे, बातम्या कोणकोणत्या आहेत याची नीटशी माहिती घेत नाहीत. पण यामुळे अनेकदा ध चा मा होण्याची शक्यता असते. आज सोशल मीडिया सक्रिय असल्यामुळे अशी एखादी छोटीशी चूक झाली तरी ती चटकन व्हायरल होते. हे लक्षात घेता अँकरनी अत्यंत अपडेटेड राहण्याची गरज आहे. पण वास्तवात तसे दिसत नाही.

इलेक्ट्रॉनिक मीडियातील कामाला डेडलाईन नसते. 24 बाय 7 काम असल्यामुळे या क्षेत्रातील तणाव प्रचंड आहे. याचा अनेक गोष्टींवर परिणाम होत असतो. विशेषतः माझ्याच बाबतीत सांगायचे तर आरोग्य आणि कौटुंबिक आयुष्य या दोन्हीकडे माझे अक्षम्य दुर्लक्ष झाले. कारण डेडलाईनच नसल्यामुळे काम करत असताना रात्री 12 वाजताही फोन येऊ शकतो, मध्यरात्रीही आपल्याला फोन करुन विचारणा केली जाऊ शकते.

यामुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. याबाबतचा एक प्रसंग म्हणजे लग्नानंतर 25 वर्षांनी पहिल्यांदाच मी विदेशात फिरण्यासाठी गेलो होतो. ज्यादिवशी मुंबईत परतलो तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते. नाशिकला पोहोचायला मला पहाटेचे 5 वाजले. साडे पाच वाजता झोपलो असेन तितक्यात 8.30 वाजता संपादकांचा फोन आला की, गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आहे तुला बीडला जायचे आहे. मी थेट निघालो आणि आधी भगवानगडावर जाऊन तेथील प्रतिक्रिया घेतल्या. बीडला पोहोचलो तेवढ्यात असे समजले की मुंडेसाहेबांना आधी लातूर विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे बीडहून लातूरला जायला निघालो. हा रस्ता अत्यंत खराब होता. पण त्यामुळेच मी पोहोचू शकलो. अन्यथा रस्त्याकडेला गाडी लावून विश्रांती घेतली असती इतका मी थकून गेलो होतो. असे अनेक प्रसंग आहेत.

कोरोना काळात माझा अमेरिकेत असणारा मुलगा घरी आला होता. परंतु मला त्याच्यासाठी द्यायला वेळच नसल्याने तो खूप रागावून निघून गेला. ‘तू तुझं आयुष्य जगत राहा, मी माझे आयुष्य जगतो’ असं म्हणून तो गेला. ही बाब मला खूप वेदनादायी ठरली. दुसरीकडे, या सर्व धावपळीत खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव आणि कामाचे प्रेशर यामुळे मला उच्च पातळीचा मधुमेह झाला. तेव्हा मग मी ही धोक्याची घंटा मानली आणि या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नऊ वर्षे मी मुंबईत राहून अखेरीस मी नाशिकला परतलो. कारण तुम्ही 24 तास स्क्रिनसमोर असता. मग ते कॅमेर्‍याची स्क्रिन असो, मोबाईलची असो, टीव्हीची असो वा लॅपटॉपची. उच्च पातळीची अ‍ॅसिडिटी ही या क्षेत्राची देणगी आहे असेच म्हणावे लागेल. मुळात, ज्याला केवळ नोकरी करायची आहे किंवा दहा ते सहा काम करायचे आहे, त्याच्यासाठी हे क्षेत्र नाही. ज्याच्या अंगात पॅशन आहे त्यानेच या क्षेत्रात आले पाहिजे, असे मला वाटते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com