निराशेच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी...

डॉ. रोहन जहागिरदार, प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ
 निराशेच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी...

जगभरात दर पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कमी-अधिक प्रमाणात डिप्रेशन म्हणजेच नैराश्याने ग्रासले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. कोरोनाकाळात निराशा, औदासिन्य, खिन्नता यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. याची कारणे अनेक आहेत; ती समजून घेऊन जगणे आनंददायी करण्यासाठी काय करता येऊ शकतं. अगदी निश्चित करता येईल. काय करायला हवं त्यासाठी...?

गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात नैराश्याने ग्रस्त असणार्‍यांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेने खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आकडेवारीतच सांगायचे झाल्यास जगभरातील 10-12 टक्के लोकांना नैराश्याने ग्रासले आहे, असे अनेक पाहण्यांमधून दिसून आले आहे.

असंही म्हटलं जातं की जगभरातील 18-20 टक्के लोक अगदी हलक्या किंवा कमी प्रमाणात का होईना पण नैराश्याला सामोरे जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पाचपैकी एक जण निराशेचा सामना करत आहे. यामध्ये चिंता, कमी पातळीवरील नैराश्य, अपेक्षाभंग, अँडजेस्टमेंट डिसऑर्डर अशा अनेक प्रकारच्या नैराश्याचा समावेश होतो.

ढोबळमानाने किंवा बोलीभाषेत सांगायचे झाल्यास, नैराश्य हा एक मूडचा आजार आहे. पण मूड म्हणजे काय हेच लोकांना स्पष्ट झालेले नसते. मला जी भावना सातत्याने आणि दीर्घकाळ जाणवते त्याला मूड म्हटले जाते. मानसशास्रीय भाषेत सांगायचे तर खूप जास्त वेळ आणि जास्त दिवस आपण जी भावना अनुभवतो तो मूड. पण एखाद्या व्यक्तीला कुणी गोड खायला दिले आणि त्याला बरे वाटले म्हणून त्याचा मूड किंवा मनोवस्था चांगली आहे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण ती स्थिती अगदी तात्कालिक असते.

एखाद्या व्यक्तीला जर आठवडाभर निष्कारण आनंदी वाटत असेल तर त्याचा मूड हायपर आहे, असे म्हटले जाते. तशाच प्रकारे कोणालाही नैराश्य किंवा डिप्रेशन आहे असे म्हणण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस त्याच्या भावना नकारात्मक असणे गरजेचे आहे.

पण केवळ नकारात्मक विचार मनात येणे म्हणजे नैराश्य नव्हे ! कशात रस नसणे, रडू येणे, उदास वाटणे, थकवा वाटणे, काही काम करू नये असे वाटणे, अतिझोप येणे किंवा झोप न लागणे, मनात टोकाचे विचार येणे ह्या सर्व गोष्टी पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ होत असेल तर त्या व्यक्तीला नैराश्याची लक्षणे आहेत असे म्हणता येऊ शकते.

यासाठी काही डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहेत. नैराश्य नेहमी उदासीमुळेच येते असे नाही. बरेचवेळा त्यात काही सामान्य गोष्टीही असतात. काही वेळा चिंताग्रस्तता आणि नैराश्य एकत्र असते. नैराश्य हे वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकते. चाळीशीच्या आतल्या मंडळींना बरेचदा नैराश्याच्या काळात चिडचिडेपणा, बेचैनी जाणवते.

दुसरीकडे चाळिशीनंतरच्या मंडळींना काहीतरी वेगळे म्हणजे जोरात गाणी लावली तर एकदम चिडचिड होणे किंवा आवाज सहन न होणे, अतिशय थकवा येणे अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात. थोडक्यात, डिप्रेशन किंवा नैराश्य अनेक प्रकारे येऊ शकते आणि त्याची अनेक कारणे असतात.

नैराश्याची मनोवस्था निर्माण होण्यास काही वैद्यकीय कारणेही असू शकतात. मधुमेह, हायपोथायरॉईडिझम, हृदयविकार, थायरॉईड यांसारख्या व्याधी जडलेल्या रुग्णांमध्ये थोड्या फार प्रमाणात तरी नैराश्य आलेले दिसून येते. मधुमेह आणि थायरॉईडमध्ये तर ते हमखास आढळते. म्हणजेच वेगळे काही घडलेले नसले तरीही जैवशास्त्रीयदृष्ट्या शारीरिक पातळीवरील आजारामुळे नैराश्य येऊ शकते.

आता आपण कोरोनाकाळातील नैराश्याचा विचार करुया. कोव्हिड ही आजघडीला संपूर्ण जगावर आलेली एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आपत्ती आहे. कोरोनाकाळात तीन कारणांमुळे नैराश्याचे रुग्ण वाढले आहेत. यातील पहिले कारण म्हणजे आयसोलेशन किंवा विलगीकरण, दुसरे म्हणजे चिंतारोग किंवा एंग्झायटी आणि तिसरे कारण म्हणजे अनिश्चितता.

कोरोनाच्या काळात प्रदीर्घ काळ लॉकडाऊनचा सामना करावा लागला. तसेच या विषाणूचा संसर्ग झालेल्यांना विलगीकरण करण्यात येते. यामुळे झाले काय, तर कोरोनाच्या महाप्रसारामुळे आधीपासूनच काहीसे उदास असणार्‍या व्यक्तींमध्ये औदासिन्य आणखी वाढत गेले. कारण लॉकडाऊमुळे बाहेरच्या जगाशी प्रत्यक्ष संपर्क खंडित झाला. परिणामी ते या विचारांबरोबरच राहिले.

‘मला बाहेर जाता येत नाही, मला कोणाची मदत घेता येत नाही, इतकेच नव्हे तर मला दैनंदिन जीवनही सुरळितपणाने जगता येत नाही, अशा परिस्थितीत मी अडकलो आहे’ अशी भावना दीर्घकाळ राहिल्यामुळे अनेक व्यक्तींमध्ये उदासीनता-नैराश्यभावना वाढीस लागली आहे. हे आयसोलेशनमुळे झालेले परिणाम आहेत. ज्या घरांमध्ये नवरा बायको यांचे पटत नाही, सासू सुनांचे पटत नाही, भांडणे होतात अशा घरांतील व्यक्तींना लॉकडाऊनच्या काळात त्याच व्यक्तींबरोबर घराबाहेर न जाता, 24 तास राहावे लागले. यामुळे हे नैराश्य दुप्पट झाले. याला फोर्सड अ‍ॅडजेस्टमेंट असे म्हटले जाते.

दुसरे कारण चिंताग्रस्तता. कोरोनाकाळात अवघे जग चिंतेत होते. अगदी लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत चिंतेचे स्वरूप वेगळे होते. आजही ते कायम आहे. शाळकरी मुलांना शाळा कधी सुरु होणार, परीक्षा कशी होणार याची चिंता आहे. कारण ते घरात बसून कंटाळले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासंबंधी आणि पर्यायाने पुढील करिअरविषयी चिंता वाटते आहे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी खूप तयारी केली, अभ्यास केला; पण परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. काहींनी निकालानंतरची स्वप्ने पाहिली होती, परदेशात जायचे होते; पण त्याला खिळ बसली आहे. या सर्वांची गोळाबेरीज होऊन निराशा वाढत गेली.

मध्यमवयीन वयोगटाचा विचार केला तर या काळात अनेकांचे रोजगार गेले, ज्यांचे आहेत त्यांना नोकरीचे काय होणार याची भीती आहे, व्यावसायिकांना व्यवसाय सुरळित कधी होणार याची चिंता आहे, अनेकांची आजवर साठवलेली बचत संपली आहे, कर्जाचे हप्ते सुरु झाले आहेत, त्यामुळे ते भयभीत झाले आहेत. वयोवृद्ध व्यक्ती तर गेल्या आठ महिन्यांपासून अक्षरशः घरांमध्ये बंदिवान आहेत. अशा सर्व गोष्टींमुळे लोकांमध्ये नैराश्य वाढत गेले.

तिसरे कारण अनिश्चितता. कोरोना संक्रमणामुळे जगाच्या अर्थकारणात प्रचंड बदल झाले आहेत. आजची स्थिती पाहता कोरोनाची दुसरी-तिसरी लाट येण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. यामुळे अनिश्चितता वाढली आहे. ही अनिश्चितता मनावर नकारात्मक परिणाम करणारी असते. स्थिर किंवा निश्चित स्थिती मनासाठी उपकारक ठरते. पण आज जगभरात सर्वत्र अनिश्चितता भरुन राहिली आहे. देशविदेशातील कोरोनाचा वाढता पुनःप्रसार, नव्याने केली जाणारी लॉकडाऊन्स, रुग्णांचे वाढते आकडे यांमुळे दिवसागणिक ही अनिश्चितता वाढली आहे आणि पर्यायाने लोकांच्या मनावरील नैराश्याचे सावट गडद होताना दिसत आहे.

आता प्रश्न येतो तो यावर मात कशी करायची? यासाठी बरेच प्रकार आहेत. पण मुळात अनेकांना आपल्याला नैराश्य आले आहे हे कळतच नाही. चिडचिड होणे, राग येणे हा सर्व आपल्या आयुष्याच्या भागच आहे. नैराश्य येणारच, कारण परिस्थिती तशीच आहे, कोरोनाचा काळ असल्याने छान वाटणार नाहीच असा एक सूर सध्या दिसून येतो. मागील काही महिन्यांपासून सर्वच जण त्याच परिस्थितीत होते. एखाद्या आई-वडिलांचा मुलगा दहावीत नापास झाला तर ते निदान त्याच्याकडे लक्ष तरी देतील. परंतु आज सर्वजण एकसमान परिस्थितीत आहोत. प्रत्येक जण आपल्या सोयीने समोर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती नैराश्यग्रस्त होते आहे किंवा एखादी व्यक्ती गंभीर नैराश्यात आहे याकडे दुर्लक्ष होताना दिसते.

दुसरी गोष्ट म्हणजे व्यसन. समाजात वाढलेली व्यसनाधिनता हे एक मोठे आव्हान आहे. निराशा, उदासिनता आणि व्यसनाधिनता यांचे अप्रत्यक्ष नाते आहे. कोरोनाच्या काळात उदासपणा घालवण्यासाठी व्यसन वाढत गेल्याची अनेक उदाहरणे आम्ही पाहिली आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांत पहिली पायरी आहे ती म्हणजे नैराश्याची मनोवस्था ओळखणे. अचानक आलेला कुठलाही बदल हा यासाठीचा एक सोपा मार्ग.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पूर्वी गाणी आवडायची; पण अचानकपणे तो गाणी म्हणत नसेल किंवा त्याला गाणी लावलेली आवडत नसतील; किंवा एरवी शांत असलेला मुलगा अचानक चिडचिडा बनला असेल; खूप बोलकी असणारी व्यक्ती गप्पगप्प राहात असेल; व्यसने वाईट मानणारी व्यक्ती थोडे थोडे व्यसन करायला लागली असेल; तर त्याकडे कुटुंबातील इतर व्यक्तींनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. अचानक झालेला कुठलाही बदल हा मानसिक आजारांच्या लक्षणांपैकी पहिले लक्षण मानला जातो. याकडे दुर्लक्ष करू नये.

दुसरा टप्पा म्हणजे परिस्थितीचा स्वीकार. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांबाबत फार विचार न करणे उचित असते. उदाहरणार्थ, खूप दिवस तयारी करूनही परीक्षा कधी होणार माहीत नसेल तर उगाचच चिडचिड करण्यात अर्थ नाही. याबाबत समंजसपणा येणे फार महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही त्या मनमोकळेपणाने स्वीकारल्या पाहिजेत.

कारण हे काही आपल्या एकट्यावर, वैयक्तिक टार्गेट ठेवून केलेले नाही. सर्वांनाच याचे परिणाम सोसावे लागत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात बरीच मंडळी अशी तक्रार घेऊन येतात की बघा आमच्या आयुष्यात काय झाले आहे! मी त्यांना हेच सांगतो की, आजची स्थिती किंवा संकट तुमच्या एकट्यावर ओढवलेले नाही. सर्वदूर तीच स्थिती आहे. सर्वांचीच आयुष्ये यामुळे बाधित झाली आहेत. एखाद्या नदीला पूर आल्यास एकाच घराचे वा शेतीचे नुकसान होते असे होत नाही. त्याचा फटका अनेकांना बसतो. म्हणून या अशा परिस्थितीकडे भावनिक दृष्ट्या न पाहता वास्तववादीपणाने, व्यावहारिकपणाने पाहिले पाहिजे.

प्रत्येकालाच स्वतःच्या समस्या मोठ्या आणि त्रासदायक वाटतात. त्या असतातही; पण त्याचा विचार करण्यापेक्षा किंवा आपल्याला बसलेली झळ कमी की अधिक यावर चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यातून बाहेर कसे येणार हे सर्वांत महत्त्वाचे आहे. यासाठी दोन निकष फार महत्त्वाचे आहेत. कोरोना काळासंदर्भात विचार करता, एक म्हणजे कोव्हिड न होण्याची काळजी घेणे, घरच्यांची काळजी घेणे, त्यांना सुरक्षित ठेवणे हा पहिला निकष. दुसरा म्हणजे आजच्या आज किंवा आत्ताच्या आत्ता ही समस्या सुटली पाहिजे असा हट्ट न धरणे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळे नीट होणार आहे. शेवट आहे तिथे नवी सुरुवातही आहे.

प्रत्येक सूर्यास्तानंतर सूर्योदय होतच असतो, रात्रीनंतर दिवस येतच असतो. ही वाक्ये तत्त्वज्ञानाच्या अंगाने नसून ते वास्तव आहे आणि ते स्वीकारलेच पाहिजे. कोरोनाने ज्याप्रकारे परिस्थिती बिघडली आहे तशाच प्रकारे कोरोना गेल्यानंतर ती पूर्ववत होणार आहे. हा एक प्रवास आहे. त्यात भावनिक होऊन हारुन जाणे, निराश होणे योग्य नाही. उलट सकारात्मकतेने विचार करत मार्गक्रमण केल्यास नैराश्य कमी होण्यास निश्चित मदत होते. प्रकाशाचा एक किरण अंधार दूर करतो, हे नेहमी लक्षात ठेवावे. त्यामुळे एका सकारात्मक विचाराने याची सुरुवात करता येईल.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकाची स्वतःची एक नियमित दैनंदिनी असली पाहिजे. यामध्ये शारिरीक व्यायाम - मग तो कोणत्याही प्रकारचा असो- नियमितपणाने केला गेला पाहिजे.

तिसरा मुद्दा म्हणजे लहान लहान गोष्टींतला आनंद घ्यायला शिकले पाहिजे. दहा गाड्या हव्यात, हे स्वप्न म्हणून चांगले; परंतु त्या मिळत नाहीत तोपर्यंत खंत व्यक्त करत न राहता असलेल्या दोन गाड्यांमध्ये आनंद मानला पाहिजे.

गेल्या काही वर्षांत प्रचंड पैसे हवेत यासाठीच्या रॅट रेसमध्ये आपण सारे धावत होतो. त्याला कोव्हिडने मोठा ब्रेक लागला आहे. हा संधीकाळ आहे. आज धावपळ कमी झाली असेल तर पैसे असूनही ज्या गोष्टी कधी विकत घेऊ शकत नाही, त्या गोष्टींचा आनंद घ्या. कुटुंबाबरोबर राहा. आईवडिलांना वेळ द्या. मुलाबाळांबरोबर वेळ घालवा. आपल्याला नेमके काय आहे ह्याचा विचार करण्यासाठी मिळालेली ही संधी आहे असे समजून विचार करा.

माणसाच्या आयुष्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती अ‍ॅटीट्यूड किंवा दृष्टिकोन. निगेटीव्ह व्यक्ती सर्वच गोष्टीत नकारात्मकता शोधते. याउलट एखादी सकारात्मक व्यक्ती असेल तर तो प्रत्येक अडचणीतही तो सकारात्मकता शोधतो. बंद पडलेले घड्याळही दिवसातून दोन वेळा बरोबर असते, हे विसरु नका. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठीची ही गुरुकिल्ली आहे.

आताचा काळ ही संधी मानून तो वेळ स्व-विकासासाठी वापरा. जे आपल्या हाती नाही त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपडू नका. आनंदी राहाण्यासाठीची नवी कारणे शोधा. आपली लक्ष्ये उद्या गाठता येतीलच. त्यासाठी आजचा क्षण वाया घालवू नका. आनंदी राहाण्यासाठी जे काही करता येईल ते करा. नैराश्य तीव्र स्वरूपाचे असेल तर भीड न बाळगता डॉक्टरांना भेटा आणि उपचार घ्या.

(शब्दांकन : सुनीता जोशी)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com