पालकांनी बदलायला हवं

पालकांनी बदलायला हवं

परिसंवाद- ‘मूल घडवताना’

डॉ.मिनल सोहनी, होमिओपॅथी तज्ज्ञ आणि समुपदेशक

आज नव्याने पालकत्त्वाची भूमिका निभावणारी बहुतांश पिढी नकार न घेताच वाढली आहे. त्यांच्या लहानपणी सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे किंवा माझ्या मुलाकडे काही गोष्टींची कमतरता आहे, हे पालकांनाच स्वीकारता येत नाहीये. परिणामी मुलांनाही असे वाटू लागते की, माझ्याकडे एखादा व्हिडिओ गेम नसल्याचे पालकांना वाईट वाटत असेल तर, त्याचा अर्थ व्हिडिओ गेम हा सर्वांकडे असलाच पाहिजे. पालकांच्या या दृष्टिकोनामुळे, वागणुकीमुळे मुलांचाही प्रत्येक गोष्टीबाबत दृष्टिकोन बदलणार नाही का? थोडक्यात मुलांकडे ही मानसिकता, पालकांकडूनच येत असते, हे लक्षात घेता पालकांमध्ये बदल झाला तर ते मुलांसमोर चांगला आदर्श ठेवू शकतात. त्यातून जर मुलांना काही अडचण आली तर पालक त्यांचे प्रश्न सहजपणे सोडवू शकतात. पण पालकांकडे हे वास्तव स्वीकारण्याची तयारी नसेल तर ते मुलांना मदत करणे अवघड ठरणे स्वाभाविक आहे.

मुलांमधील नैराश्य, हिंसकपणा वाढत चालल्याच्या घटना आणि त्यासंदर्भातील चर्चा अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळत आहे. यानिमित्ताने बदलत्या काळानुसार मुलांची मानसिकता कशी बदलेली आहे, हा एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे. केवळ मुलेच नाहीत तर आपण सगळेच अलीकडच्या काळात अधिक आत्मकेंद्री झालेलो आहोत. मला काय हवे आहे आणि मला कोणत्या गोष्टीमुळे सहजता, आरामदायी वाटते एवढाच विचार प्रत्येकजण करत आहे. मला जर एखादी गोष्ट पटली नाही तर, साहजिकच ती व्यक्ती त्याविरुद्ध काही तरी उपाय करते. दुसर्‍याला त्यामुळे त्रास होतो का? याचा विचार करण्याची एकंदर प्रवृत्तीच अलीकडील काळात कमी झालेली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना आत्महत्या करावीशी वाटणे किंवा खून करणे यांसारख्या भयंकर कल्पना कशा सुचतात, याचा आपण थोडा विचार केला पाहिजे. हा विचार करताना असे लक्षात येते की, या गोष्टी आज त्यांना सहजपणे आणि ठळकपणे दिसू लागल्या आहेत. यासाठी मीडिया हा सर्वांत मोठे कारण आहे. मोबाईल, इंटरनेट, टीव्हीच्या माध्यमातून शहरात, राज्यात, देशात इतकेच नव्हे तर जगभरात चालणार्‍या वेगवेगळ्या शोध मालिकांचे किंवा गुन्हेगारीशी संबंधीत मालिकांचे सातत्याने दर्शन होत असते. तसेच संगणक, व्हिडिओ गेम्स यामधूनसुद्धा सातत्याने मुलांसमोर हिंसा दिसत असते. त्यातूनच खून करणे किंवा एखाद्याला इजा करणे वाईट असते याबाबतची मानसिक जाणीव मुलांमध्ये हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे.

टीव्हीवरील गुन्हेगारीशी संबंधित मालिका तर घराघरांमध्ये पालक मुलांना सोबत घेऊन पहात असतात. त्यामुळे या गोष्टींना मोठ्यांची संमती आहे असा एक अर्थ मुलांच्या दृष्टीने काढला जातो. ती कृती त्यांना इतकी सोपी वाटू लागते की त्यातले गांभीर्यच मुलांच्या लक्षात येत नाही. एखाद्या व्यक्तीला मारून टाकणेे एवढ्या सहज विचाराने ते कृती करतात. मारणार्‍या माणसाचे पुढे काय होते हे त्या मालिकेमध्ये दाखवले जात नाही. केवळ कुणाला तरी मारून त्याने आपला मार्ग शोधला, एवढेच त्यामध्ये दाखवले जाते. त्यामुळे मला जर काही हवे असेल तर ते हिसकावून घ्यायचे, त्यासाठी कोणताही हिंस्र मार्ग अवलंबता येतो हा पर्याय मुलांसमोर सातत्याने येत आहे आणि त्यातून मुलांची मानसिकताही तशीच बनत चालली आहे. मालिकांमध्ये, शोंमध्ये दाखवली जाणारी कृती अथवा मार्ग योग्य आहे वा एकमेव आहे असे त्यांच्या मनावर नकळतपणे बिंबले जात आहे.

दुसरीकडे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चाललेला आहे. आजच्या प्रचंड वाढलेल्या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतः पालकच आपल्या भावना योग्य प्रकारे हाताळण्यामध्ये असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांना योग्य ती मदत होणे दुरापास्तच ठरू लागले आहे. नोकरी, पैसा, स्पर्धा यांमध्ये गुरफटलेल्या पालकांकडून मुलांवर होणारे संस्कार कमी पडत आहेत. एखादी गोष्ट आता नाही मिळाली तर त्याशिवाय मला राहता आले पाहिजे, तडजोड करता आली पाहिजे, परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे हे संस्कारच आता मुलांवर होताना दिसत नाहीत. उलटपक्षी मुलांना जे पाहिजे आहे, जे मागितले जात आहे ते मिळतच आहे. या सहजउपलब्धतेमुळे, मुबलकतेमुळे मुलांमध्ये नकार पचवायची ताकदच राहिलेली नाही. उलट नकार कशाला पचवायचा, जे हवे आहे ते हिसकावून घ्यायचे, त्यासाठीचे मार्गही माहीत आहेत, टीव्हीवर ते पाहिले आहेत, अशी मानसिकता मुलांमध्ये आहेत. अशा प्रकारे या गोष्टी मुलांवर नकळतपणे लादल्या जात आहेत.

ही परिस्थिती खरोखरच पालकांना बदलावीशी वाटत असेल, तर सर्वप्रथम मुलांना नकार स्वीकारण्यास, नकार पचवण्यास शिकवले पाहिजे. तसेच मुलांना दुसर्‍यांचा विचार करायला शिकवले पाहिजे. आपल्या भावना मुलांना योग्य प्रकारे व्यक्त करता आल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी शिकल्यास त्यातून आपल्याला वाट मिळेल, असे मुलांना वाटते.

हल्ली स्पर्धा वाढली आहे, असे सातत्याने बोलले जाते. ही स्पर्धा केवळ बौद्घिक पातळीवर राहिलेली नसून भौतिक पातळीवर आलेली आहे. बरेचदा आपल्या आजूबाजूच्या किंवा शाळेतील मित्र-मैत्रिणींकडे एखादी वस्तू आहे, मग ती माझ्याकडे का नाही असा हट्ट मुलांकडून धरला जातो. पालकही मुलांचा तो हट्ट तत्काळ पूर्ण करतात. आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे राहावेच लागते, असे कारण या कृतीमागे दिले जाते. पण वास्तविक पाहता पूर्वीच्या काळीही समाजामध्ये असमानता होती. पूर्वीदेखील श्रीमंत आणि गरीब होते. काही लोकांकडे काही गोष्टी होत्या आणि काहींकडे त्या नव्हत्या. पण त्याकाळी नसलेल्या गोष्टींबाबतची हाव अथवा अतिदुःख आजच्याइतके पालकांकडे आणि पर्यायाने मुलांकडे नव्हते. पालक समाधानी होते. आजची परिस्थिती पाहिली तर मुलांना काही देता आले नाही तर पालक अस्वस्थ असतात. त्यांना मनातून खूप अपराधी वाटत असते.

अगदी माझ्या मुलाकडे एखादा व्हिडिओ गेम नाही, याबाबतही पालकांना खेद वाटत असतो. या भौतिक गोष्टी आत्मसंतुष्टतेच्या आणि प्रतिष्ठेच्या वाटतात. माझ्या मुलाकडे व्हिडिओ गेम, लॅपटॉप नाही किंवा महागडे बूट नसले तरी काही हरकत नाही, अशी भावना पालकांमध्ये लोप पावत चालली आहे. पालकांकडेच वास्तव स्विकारण्याचा दृष्टिकोन असेल तर तो मुलांकडे येणे फारसे अवघड नाही. पण हे समाधान पालकांमध्येच नसेल तर मुलांमध्ये ते कोठून आणि कसे येणार? आज नव्याने पालकत्त्वाची भूमिका निभावणारी बहुतांश पिढी नकार न घेताच वाढली आहे. त्यांच्या लहानपणी सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे किंवा माझ्या मुलाकडे काही गोष्टींची कमतरता आहे, हे पालकांनाच स्वीकारता येत नाहीये. परिणामी मुलांनाही असे वाटू लागते की, माझ्याकडे एखादा व्हिडिओ गेम नसल्याचे पालकांना वाईट वाटत असेल तर, त्याचा अर्थ व्हिडिओ गेम हा सर्वांकडे असलाच पाहिजे. पालकांच्या या दृष्टिकोनामुळे, वागणुकीमुळे मुलांचाही प्रत्येक गोष्टीबाबत दृष्टिकोन बदलणार नाही का? थोेडक्यात मुलांकडे ही मानसिकता, पालकांकडूनच येत असते, हे लक्षात घेता पालकांमध्ये बदल झाला तर ते मुलांसमोर चांगला आदर्श ठेवू शकतात. त्यातून जर मुलांना काही अडचण आली तर पालक त्यांचे प्रश्न सहजपणे सोडवू शकतात. पण पालकांकडे हे वास्तव स्वीकारण्याची तयारी नसेल तर ते मुलांना मदत करणे अवघड ठरणे स्वाभाविक आहे.

अलीकडे मुलांमधील निष्पापपणा, निखळपणा झपाट्याने कमी होत चाललेला दिसतो. चौथीमधील अनेक मुले आज पॉर्न व्हिडिओ अथवा अश्लील वेबसाईट पाहतात. त्यामुळे या मुलांकडे निष्पापपणा राहिलेलाच दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेटवर आज सर्व गोष्टी नको इतक्या प्रमाणात मुबलक उपलब्ध आहेत. एखादी बातमी पेपरमध्ये आली की त्याबाबतचा सखोल तपशील लोक लगेच इंटरनेटवर पाहतात आणि या सर्व गोष्टी मुलांच्या समोर घडतात. एखादी बलात्काराची घटना घडल्यानंतर त्या संदर्भातला व्हिडिओ लाखोंच्या संख्येने इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित होतो. असे व्हिडिओ पाहताना आपले मूल सोबत नसावे, याची पालक काळजी घेतात का? त्यांच्या कानावर या गोष्टी पडू नयेत, यासाठीची दक्षता घेतात का? मुलांच्या कानावर या गोष्टी पडल्यास घरामध्ये त्याबाबत वैचारिक चर्चा होते का? एखाद्याला त्रास देणे, जखमी करणे वाईट असते, अशा गोष्टी सभोवताली घडल्या तर आपली भूमिका काय असली पाहिजे, अशी चर्चा पालक आणि मुलांमध्ये होते का? या प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे गुन्ह्याची चर्चा करताना गुन्हा करणार्‍या माणसाचे नंतर काय होते, हे मात्र मुलांना ठाऊक होत नाही. कारण त्याची फारशी चर्चा होत नाही. परिणामी, मुले फक्त गुन्हा बघतात. पालक मुलांसमोर एखादी गोष्ट पाहतात, तेव्हा ती गोष्ट नेहमी ‘संमती’ म्हणून मुलांकडून स्विकारली जाते. ही गोष्ट पालकांच्या लक्षातच येत नाही. एखादी मालिका पालक मुलांसमोर पहात असतील तर अशा प्रकारच्या मालिका पाहण्याला पालकांची संमती आहे, असा अर्थ मुले त्यातून घेतात.

मनोरंजन आणि पालकांचा पाठींबा या दोन्हीमधील फरक कळण्याइतकी विचारशक्ती मुलांमध्ये नसते. त्यामुळे अशी एखादी मालिका मुलांबरोबर पाहताना जगात हे जे काही भयानक घडत आहे, ते घडता कामा नये, त्यावर आपला असा दृष्टिकोन असला पाहिजे, त्याबाबत लोकांना अशी मदत केली पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे, या गोष्टी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. अशी चर्चा मुलांसोबत केली नाही तर मुलांना नकळतपणे या गोष्टी योग्यच आहेत असे वाटू लागते. त्यातूनच मुले तोच मार्ग वा पर्याय अवलंबतात. उदाहरणार्थ, मनासारखी घटना घडली नाही, प्रेमभंग झाला म्हणून एखाद्याला उडी मारताना पाहिले तर मुलांना या समस्येवरील हाच उपाय आहे असे वाटते. मी अशी उडी मारली तर माझी समस्या संपेल, एवढेच त्याला समजते. पुढे हाडे तुटून मी काही महिने हॉस्पिटलमध्ये राहू शकतो, हे चित्र त्याला दिसतच नाही. मी लोकांचे लक्ष केंद्रीत करू शकतो किंवा माझी समस्या सोडवू शकतोे एवढेच त्यांना त्या कृतीतून अभिप्रेत असते. त्यामुळे असे मार्ग ते सहजपणे स्विकारतात. म्हणजे, मुलांसमोर हे अर्धवट एक्सपोजर आहे.

ज्या वयात ही मिळालेली माहिती हाताळताच येत नाही, त्या वयात ती माहिती मिळाली तर तिचे करायचे काय त्याला माहितच नसते. त्यामुळे आपल्या विचारशक्ती, कल्पनाशक्तीनुसार मुले त्या माहितीचा उपयोग करतात. पण इथे पुन्हा त्याची अपरिपक्वता असते. हेच आजचे वास्तव आहे. यावर खरोखरच उपाय हवा असेल तर, पालकांनी प्रत्येक बाबतीत अतिशय जागरूक राहाणे अत्यंत गरजेचे आहे. ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. पण दुर्दैवाने ज्या पालकांना या गोष्टी समजावून सांगण्याची गरज असते, ते पालकच याबाबत अतिशय उदासिन दिसतात. आम्ही शाळांमधून जेव्हा या मानसिकतेच्या जागृतीबाबत कार्यशाळा घेतो तेव्हा, ज्या पालकांना याची गरज आहे, ते उपस्थितच नसतात.

यासाठी अनेकांना वेळच नसतो. कारण पालकत्व ही जागरूकपणे करण्याची गोष्ट आहे, असे त्यांना वाटतच नाही. ही जागरुकता निर्माण करण्यासाठी एक खुलेपणा आवश्यक असतो. माझ्यामध्ये हा बदल करणे आवश्यक आहे, हा खुलेपणा पालकांकडे दिसत नाही. माझ्या हातातील ही समस्या आहे आणि मी काही प्रयत्न केले तर ती सहजपणे सुटू शकते, एवढी जाणीव तरी किमान पालकांकडे असणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com