दिवाळीतली आंतरिक स्वच्छता

दिवाळीतली आंतरिक स्वच्छता

नवचैतन्य, सकारात्मकतेच्या ऊर्जेची जणू बरसातच दिवाळीत होते. भारतीयांचा आवडता सण कोणता या प्रश्नाचे एकमुखाने उत्तर दिवाळी असे येईल. भारतीय संस्कृतीत ऋतु, सण, आहार-विहार आणि आरोग्य यांची यथोचित सांगड घातलेली आपण पाहतो. ऑक्टोबर हिट संपून थंडी पडायला सुरुवात होते आणि चाहूल लागते ती दिवाळीची. वर्षा ऋतुत वाढलेला वात दोष व नंतर शरदात वाढलेला पित्त दोष यांच्या योगाने शरीरात वाढलेली उष्णता व रूक्षता कमी व्हावी या दृष्टीकोनातून आहार विहारासंबंधीत काही बदल करणे आवश्यक ठरते...

हिवाळ्यात (हेमंत व शिशिर) केवळ थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा वाढायला लागतो. त्वचा कोरडी होते. इतकेच नाही तर आतड्यांना देखील कोरडेपणा येतो. त्यामुळे दिनचर्येत, खाण्या-पिण्यात बदल करणे अपेक्षित असते. त्वचा हे पंचज्ञानेंद्रियांपैकी एक महत्वाचं इंद्रिय आहे जे सतत ऊन, वारा, पाऊस, प्रदुषण यांच्याशी थेट सामना करत असतं. कोरडेपणामुळे त्वचेची लवचिकता कमी होते. परिणामी टाचांना भेगा पडणं, ओठ फाटणं हे त्रास जाणवतात. त्वचेला रूक्षतेचा त्रास होऊ नये म्हणून अभ्यंग महत्त्वाचं असतं. अभ्यंग हे केवळ दिवाळीचे चार दिवसांपर्यंत मर्यादित न ठेवता दिवाळीपासून सुरू करून पुढे हिवाळ्याचे चार महिने करणं गरजेचं असतं.

आयुर्वेदानुसार त्वचा हे वाताचे स्थान समजले जाते. वात कमी करण्यासाठी तेलासारखे औषध नाही! हे तेलही कोणते असावे, ते कोणत्या द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे याबद्दल आयुर्वेदात सांगितले आहे. अभ्यंगासाठीच्या तेलाचा ‘बेस’ तिळाच्या तेलाचाच असावा. हे तेल वातघ्न आणि सुगंधी द्रव्यांनी सिद्ध करावे. लोध्र, दशमूळ, नागरमोथा, सुगंधी कचोरा, चंदन, यष्टीमधु, उपळसरी, विडंग, आंबेहळद ही द्रव्ये अभ्यंगासाठीच्या तेलात वापरतात. अभ्यंगामुळे त्वचारंध्र स्वच्छ होतात, शरीरातील अतिरिक्त कफदोष कमी होतो, अनावश्यक मेदाचे विलयन होण्यास मदत होते व कांती उजळते. केस हा अस्थीधातूचा एक भाग समजला जात असल्यामुळे केसांसाठीच्या तेलात अस्थिधातूचे पोषण करणारी भृंगराज, माका, ब्राम्ही ही द्रव्ये असावीत.

अभ्यंग करताना जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा त्वचा जेवढं तेल आवश्यक आहे तितकं शोषून घेते व उरलेलं जास्तीच तेल काढून टाकणं अपेक्षित असतं. तसेच त्वचेवर वरच्या मृत पेशी, धुळ, घाण काढून टाकणं आवश्यक असतं. साबणाने केवळ फेस होतो, त्वचा वरवर स्वच्छ होते. त्वचेची खोलवर स्वच्छता होत नाही. अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी उटणं लावणं आवश्यक असतं. आयुर्वेदीक तज्ज्ञ जे उटणं बनवतात त्यात चंदन, वाळा, कपुरकाचरी, नागरमोथा अशा सुगंधी, त्वचेसाठी उपयुक्त आणि उत्कृष्ट परिणामकारक वनस्पतींचा वापर केला जातो. त्वचेवर किंचित घासलं जाईल (स्क्रब) अशा रवाळ स्वरूपाचं हे उटणं असतं.

घरी उटणं तयार करण्यासाठी साहित्य

मसुर डाळीचे रवाळ पीठ = 100 ग्रॅम

सुगंधी कचोरा चूर्ण = 10 ग्रॅम

त्रिफळा चूर्ण = 10 ग्रॅम

सारिवा चूर्ण = 10 ग्रॅम

मंजिष्ठा चूर्ण = 10 ग्रॅम

नागरमोथा चूर्ण = 10 ग्रॅम

ज्येष्ठमध चूर्ण = 10 ग्रॅम

वाळा चूर्ण = 10 ग्रॅम

तुळस चूर्ण = 10 ग्रॅम

आंबेहळद चूर्ण = 2 ग्रॅम

भीमसेनी कापूर = 1 ग्रॅम

वरील सर्व साहित्य एकत्र करून चाळणीने गाळून घेऊन हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

आतड्यांना आलेला कोरडेपणा दुर करण्यासाठी स्निग्ध, तेल, तुप, खोबरं यांचा यथोचित वापर करून तयार केलेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घ्यावा. पण प्रमाणापेक्षा अधिक सेवन टाळावे. कणाकणात प्रकाश भरणारी दिवाळी साजरी करताना जाठराग्नीला दीप्त ठेवण्यासाठी विधिपूर्वक आहाराचे नियोजन करणे महत्वाचे आहे.

आयुर्वेदात गोसेवा हा उपचाराचा एक भाग सांगितला आहे. गोवत्सद्वादशीच्या निमित्ताने पंचामृत पंचगव्यासारख्या औषधी पुरवणार्‍या गाय- वासरांच्या संपर्कात येता येते. नरकचतुर्दशीला सकाळीच ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करायची प्रथा आहे. नरकचतुर्दशीला रूपचतुर्दशी असेही म्हणतात. बलिप्रतिपदा व भाऊबीजेच्या दिवशी अनुक्रमे पत्नी पतिला आणि बहिण भावाला तेल लावून उटण्याने आंघोळ घालते व ओवाळते. यातही आपल्या प्रियजनांच्या आरोग्य रक्षणाचाच हेतू असतो.

दिवाळीत मन उदास होईल, असं काहीच नसंत. दिव्यांनी चकाकणारे रस्ते, सर्वत्र मिळणारी मिठाई, नातेवाईकांचा सहवास. सगळंच कसं मंगलमय वातावरण असतं. पण हे फक्त बाह्य का असावं? दिवाळीमध्ये फक्त बाह्य स्वच्छता नाही तर आंतरिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. अंतरीचा दीप प्रज्वलित करणं हे खरंतर दिवाळीत अपेक्षित असतं. त्यामुळं या सणाचा वापर सर्वत्र सकारात्मकता पसरवण्यासाठी आणि तन, मन स्वच्छ करण्यासाठी करू या.

- डॉ. शीतल सुरजुसे, आयुर्वेदाचार्य, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com